शब्दांच्या पलीकडलं

मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 11 जानेवारी 2018

हातांत शब्दकोश होता. नजर जाईल तिकडं शब्दार्थांच्या विविध छटा दिसत होत्या.

हातांत शब्दकोश होता. नजर जाईल तिकडं शब्दार्थांच्या विविध छटा दिसत होत्या. परिचित शब्द, अपरिचित शब्द, माहीत असलेले आणि माहीत नसलेले त्यांचे अर्थ, मृदू शब्द, कठोर शब्द, संयमित शब्द, हल्ला करणारे शब्द, गंभीर करणारे शब्द, हसविणारे शब्द, आठवणींचा पूर आणणारे शब्द, स्वागताचे शब्द, निरोपाचे शब्द, कमी अक्षरांचे शब्द, अधिक अक्षरांचे शब्द, साधे-सरळ शब्द, काना-उकार-मात्रा असलेले शब्द, जोडाक्षरी शब्द, फसविणारे शब्द, विश्वास दृढ करणारे शब्द, आधाराचे शब्द आणि निराधारपणाच्या वावटळीनं लपेटून टाकणारे शब्द, जोडणारे शब्द आणि तोडणारे शब्द, टीकेचे शब्द, स्तुतीचे शब्द, विनवणीचे शब्द, समजावणीचे शब्द, रागाचे शब्द, अनुरागाचे शब्द; आणि आणखी असलं बरंच काही. पानांमागून पानं उलटत जावं, तसं शब्दागणिक नवं जग साकार होत चाललेलं. काही शब्दांच्या चर्येवर ओळखीचं हसू; तर काहींच्या डोळ्यांत आश्‍चर्यांचे अर्थ भरलेले. काही शब्दांना सुरांचं कोंदण; तर काहींना कर्कशपणाचं काटेरी कवच. काही शब्दांच्या उच्चारांत जोर; तर काहींच्या उच्चारांत नुसतीच कुजबूज. काही शब्द म्हणजे जणू एखादी कविता; आणि काही शब्द तर कादंबरीसुद्धा. काही शब्दांना रचनेचं आणि अर्थाचंही सौष्ठव लाभलेलं. अर्थ जाणून घेण्यासाठी यापूर्वी अनेकदा हाताळलेल्या शब्दकोशाची ही एवढी रूपं कधी जाणवलीच नव्हती. खरंच, शब्द म्हणजे नेमकं असतं तरी काय? केवळ अक्षरांचा समूह की अक्षरांची जोडणी? वाक्‍याचे गणगोत की अर्थांचे सहकारी? वळणांचे आणि उभ्या-आडव्या रेषांचे गुंते की अनेक गुंते सोडविणारे सरळ मार्ग? आवर्तांचे गरगरते गोलाकार की पाण्यातले बांधून ठेवणारे भोवरे?

शब्दांच्या चक्रव्यूहात शिरावं आणि बाहेर पडण्याचे रस्ते बंद व्हावेत, तसं काहीसं झालं. संख्येनं भलं मोठं सैन्य चाल करून यावं, तसे अनेक शब्द त्यांच्या अर्थांसह धावून येताहेत, असं वाटू लागलं. शब्दांच्या उच्चारांच्या दुंदुभी आजूबाजूनं वाजू लागल्या आहेत; आणि त्यांच्या कोलाहलानं आपल्याला गुरफटून टाकलं आहे, असा भास होऊ लागला. शब्दकोश बाजूला ठेवला, तरीही त्यातले शब्द जणू पानांच्या चौकटींचा भेद करून बाहेर पडत होते. मनातल्या मनात मग शाब्दिक चकमकी झडू लागल्या. खरे अर्थ, खोटे अर्थ यांची सरमिसळ झाली. कोणत्या दिशेनं कोण येतं आहे, कोणाचे काय हेतू आहेत, काहीच कळेनासं झालं. शब्दांचे गट-तट दिसू लागले. हेवेदावे, रागलोभ, मत्सर, क्रोध, असूया, सूडभावना हे माणसांचे विकार शब्दांनाही असतात की काय? माणसांच्या सहवासानं शब्द बिघडले की शब्दांच्या जवळिकीनं माणसं बदलली? शब्दांचे पूल उभारून शत्रूच्या भूमीवर सैन्यही पाठविता येतं; आणि समझोत्याच्या बोलण्यांचा मार्गही शब्दांच्या पुलावरूनच जातो. शब्दांचा वडवानल भडकतो, तशीच त्यावर फुंकरही घालता येते. शब्दांनी दुखावलेली माणसं शब्दांनीच जोडता येतात; मात्र अशी जोडणी करणारे शब्द आपल्या वर्तनात यावे लागतात.
शब्दांच्या पलीकडलं हे जग गवसलं, तर आयुष्याची लज्जत का नाही वाढणार?

Web Title: editorial malhar arankalle wirte article phahatpaul