पानगळीचे दिवस

पानगळीचे दिवस

पानगळीचे दिवस सुरू झाले आहेत. एरवी सावलीची भलीमोठी छत्री उघडून धरलेली झाडं एकेक काडी मोडून पडताना कापडाचा गोल बिघडलेली जीर्ण छत्री दिसावी, तशी भासू लागली आहेत. विरळ होत चाललेल्या पानांच्या पाऊलवाटांतून उन्हाचे कवडसे जमिनीवर उतरू लागले आहेत. झाडावर मिरवणारं हिरवं चैतन्य पौर्णिमेनंतर मंदावत जाणाऱ्या चांदण्यासारखं फिकट होऊ लागलं आहे. पानांचे टोकदार पंखे पकडून ठेवलेल्या झाडाच्या मुठी खुल्या होऊ लागल्या आहेत. उघडलेल्या बोटांच्या रेषा झाडाला लगडून राहिल्या आहेत. पानांच्या कडा नागमोडी होत चालल्या आहेत. त्यांची टोकं आतल्या बाजूला दुमडू लागली आहेत. झाडाची पानं जणू अंतर्मुख होऊन कसला तरी शोध करू लागल्यासारखी वाटत आहेत. सुकत चाललेल्या पानांचे आकार उघडलेल्या तळव्यासारखे दिसत आहेत. कसलं ना कसलं दान त्यात पडावं म्हणून हे तळवे पुढं-मागं होत आहेत. दानशूर कर्णासारखं व्रतस्थ असणारं झाड लक्ष तळव्यांनी कसलं दान मागत असावं, त्याचं कोडं वेढून राहिलं आहे.

पानांचे रंग बदलत चालले आहेत. पोपटरंगी पानं हळदिवी कधी झाली, त्याचा शोध करता करता काही पानांवर कषायवस्त्राचं पावित्र्य पसरत असल्याचं लक्षात आलं. कुठं तपकिरी रंगाचे तुकडे उतरून बसल्याचंही जाणवू लागलं. वाऱ्याच्या हलक्‍या झुळकांनीही पानांचे रंगीबेरंगी पक्षी झाडावरून निसटत होते. वाऱ्याचा दोरा तुटला, की पक्ष्यांचे हे पतंग तिथंच कुठं कुठं स्थिरावत होते. खाली उतरताना हेलकावत होते. भिरभिरत होते. वाऱ्याच्या वाटांशी काही क्षण खेळत होते; आणि क्षणात खेळ संपवून टाकीत होते. झाडावरची एकेक पानं तळाशी गोळा होत चालली होती.
झाडाझाडांवर नवनिर्माणाचा सोहळा सुरू झाला होता. भरलेल्या झाडाचं सौंदर्य अनुपम असतं; तसंच शुष्क झाडाचंही वेगळं सौंदर्य असतं. लहान- मोठ्या फांद्यांच्या झाडांवर विविध चित्राकृतींची देखणी प्रदर्शनंच भरलेली असतात. उभ्या, आडव्या आणि तिरप्या रेषांचे किती आकार होऊ शकतात, त्याचा शोध या झाडांवरच घेता येईल; इतके आकार, इतकी त्यांची गुंतागुंत आणि तितकाच त्यांचा खुलेपणाही. झाडाच्या बुंध्याशी अंथरलेल्या नक्षीदार रुजाम्याचं सौंदर्य तरी किती मनोहारी असतं! त्याच्या तुकड्यातुकड्यांवर वेगळा रंग आणि वेगळी नक्षी.

पानगळ म्हणजे झाडांची एखादी नैष्ठिक साधना किंवा तपाचरण तर नसेल? तसंच काहीसं असणार, कारण नवनिर्माणासाठी अनेक कृतींचा यज्ञ करावाच लागतो. झाडांची पानं गळून जातात आणि पाऊसथेंबांच्या जोडीनं तिथं नवं चैतन्य हसू लागतं. झाडाचं लोभस रूप आकाराला येऊ लागतं. पानगळीसारखे आपल्याला स्वतःचे दोष बाजूला करता यायला हवेत. राग, लोभ, माेह, क्रौर्य यांची घट्ट धरून जपून ठेवलेली पानं आपण उतरवून ठेवायला हवीत. या ओझ्यानं आपलं माणूसपण हरवत चाललं आहे. अशी पानगळ झाली, तर आपल्याला स्वतःचाच नवा शोध लागेल.
निसर्गातली पानगळ हेच सत्य सांगते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com