निर्मळ सुरांचं चित्र

मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

रसिकांना रंगीबेरंगी चित्रंच आवडतात, हा समज परवा पाहिलेल्या चित्रप्रदर्शनानं खोटा ठरविला. त्या प्रदर्शनात केवळ काळ्या रंगात केलेली रेखाटनं होती. म्हटलं, तर सारी रंगहीन चित्रं. उभ्या-आडव्या, तिरप्या, गोलाकार, लंबवर्तुळाकार, त्रिकोणी-चौकोनी असल्या आकारांना हातांत घेऊन उभी असलेली चित्रं. कॅनव्हासच्या चौकटीत कृष्णरंगी चाहुली जाग्या करणारी ती चित्रं विलक्षण बोलकी होती. एरवी नजरेला नकोसा वाटणारा रेषाकारांचा गुंता तिथं आकर्षक होऊन बसला होता. त्यांत एक चित्र होतं वेळूच्या बनाचं. जवळ-दूर असलेल्या उभ्या रेषांचं. त्यांतून तयार झालेल्या विविध आकारांचं.

रसिकांना रंगीबेरंगी चित्रंच आवडतात, हा समज परवा पाहिलेल्या चित्रप्रदर्शनानं खोटा ठरविला. त्या प्रदर्शनात केवळ काळ्या रंगात केलेली रेखाटनं होती. म्हटलं, तर सारी रंगहीन चित्रं. उभ्या-आडव्या, तिरप्या, गोलाकार, लंबवर्तुळाकार, त्रिकोणी-चौकोनी असल्या आकारांना हातांत घेऊन उभी असलेली चित्रं. कॅनव्हासच्या चौकटीत कृष्णरंगी चाहुली जाग्या करणारी ती चित्रं विलक्षण बोलकी होती. एरवी नजरेला नकोसा वाटणारा रेषाकारांचा गुंता तिथं आकर्षक होऊन बसला होता. त्यांत एक चित्र होतं वेळूच्या बनाचं. जवळ-दूर असलेल्या उभ्या रेषांचं. त्यांतून तयार झालेल्या विविध आकारांचं. काहींचे बुंधे चांगलेच पुष्ट; काहींचं अस्तित्व अधेमधे मिळालेल्या जागेत अवघडून बसलेलं. एकसारख्या आकारांची पेरं. वरवर निमुळती होत गेलेली. एका झाडाचा बुंधा नजरेनं पकडावा; आणि त्या वाटेनं उंच जात राहावं, तर रेल्वेगाडीनं रूळ बदलून दुसरा मार्ग पकडावा, तसे आपण दुसऱ्याच झाडाच्या शेंड्यावर गेलेलो आहोत, असं लक्षात येई. बुंधा ते झाडाचा शेंडा हा प्रवास नजरेच्या चिमटीतून अलगद सुटून गेला आहे; आणि ते झाड वाकुल्या दाखवीत उभे आहे, असे भास आजूबाजूनं अनेकदा झुळझुळत राहिले. काही चित्रांतल्या टोकदार रेषांच्या जखमा अंगावर जाणवत राहिल्या. काही चौकटींतले पाण्याचे प्रवाह ओढीनं धावत राहिले. काही चित्रांच्या चौकोनांबाहेरची वादळं आपल्यापर्यंत घोंघावत येत असल्याचं वाटू लागलं.
संयोजकांनी रसिकांसाठी एक स्पर्धा ठेवली होती ः त्यांच्या दृष्टीनं त्यांतलं उजवं चित्र कोणतं, ते ठरविण्याची. पट्टीच्या प्रेक्षकांनी हे आव्हान स्वीकारलं. रेषाकारांच्या सौंदर्यानं भारावलेल्या काही नजरा चित्रचौकटींसमोरून पुनःपुन्हा भिरभिरत जाऊ लागल्या. माना कलत्या करून, चित्रांपासूनचं अंतर कमी-जास्त करून, दृष्टीचे कोन बदलून चित्रांची प्रतवारी करण्याचा प्रयत्न करू लागल्या. हे चित्र उत्कृष्ट की ते चित्र उत्कृष्ट, अशा संभ्रमात त्यांतल्या कित्येक नजरा बराच काळ हेलकावत राहिल्या.
अनेकांना अनाकर्षक वाटणारं वेळूच्या बनाचं चित्र मी उत्कृष्ट ठरवून टाकलं आणि संयोजकांकडं तसं कळविलंही. स्पर्धेत उतरलेल्या बरोबरीच्या काहींना माझा निर्णय पहिल्या फेरीतच बाद ठरणारसं वाटू लागलं. काहींच्या चेहऱ्यांनी आणि उडविलेल्या भिवयांच्या धनुष्यांनी ते बोलूनही दाखविलं.

संयोजक त्यांचा निर्णय शेवटी जाहीर करणार होते. ते शब्द झेलून घेण्यासाठी सहभागी झालेल्यांनी कानांच्या ओंजळी उघडल्या होत्या. अखेर संयोजकांचा निर्णय जाहीर झाला. अर्थातच तो वेगळा होता. वेळूच्या बनाचे सूर त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोचलेच नव्हते. दुसरंच कुठलं तरी चित्रं त्यांनी उत्कृष्ट ठरविलं होतं; आणि ज्यानं त्यावर शिक्कामोर्तब केलं होतं, त्याचा सत्कारही नंतर केला गेला. समारंभ संपला, परतीच्या वाटेवरून येताना तिथलं वेळूचं बन आपल्याबरोबर निघालं आहे, असं वाटू लागलं. वास्तविक, वेळूचं बन साकारलेल्या रेषांमध्ये कमालीचा साधेपणा होता. त्यांत गुंता नव्हता. आकारांची सरमिसळ नव्हती. साधेपणातलं सौंदर्य कळायलाही चांगली दृष्टीच लागते.

 काही वेळानं वेळूच्या या बनातून वाऱ्याची बोटं फिरू लागल्याचं जाणवलं. त्याचे निर्मळ सूर लडिवाळ पक्ष्यासारखे त्या लहरींवर भिरभिरत राहिले; आणि निर्मळ सुराचं अप्रतिम चित्र साकार झालं.

Web Title: editorial malhar arankalle wirte article phahatpaul