हॉर्न नॉट ओके प्लीज! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

ज्या गोष्टी विवेकबुद्धीने साध्य होऊ शकतात, त्यासाठी कायदेकानू करावे लागणे, हे दुर्दैवी आहे; पण विनाकारण हॉर्न वाजवून प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा आवश्‍यकच आहे.

विनाकारण वाहनाचे कर्णे नि भोंगे वाजवून गोंगाटात भर घालण्याचा भारतीय वाहनचालकांचा जणू छंदच आहे, किंबहुना वाहनाचा अन्य एखादा भाग नादुरुस्त असलेला भारतीय वाहन-चालकाला चालतो; परंतु, हॉर्न बंद पडला की चालकाचा आत्मविश्‍वासच जणू मुका होतो, असे एक निरीक्षण एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात नोंदवण्यात आले होते. विकसनशील देशांमध्ये हे हॉर्न प्रकरण हल्ली हाताबाहेर जाऊ लागल्याची चिंता ध्वनिप्रदूषणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी अनेकदा व्यक्‍त केली आहे. या समस्येवर उपाय शोधून काढण्यासाठी, म्हणजेच हॉर्नचा वापर चालकाने कमीत कमी करावा, यासाठी अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी वेळोवेळी सुधारणा करीत नेल्या. हॉर्न टाळण्याच्या एकमेव उद्देशापायी या उत्पादक कंपन्यांचे अब्जावधी डॉलर आजवर खर्ची पडलेले आहेत. तथापि, वाहनचालकांचे हे हॉर्नचे व्यसन घालवण्याच्या इराद्याने आता राज्याच्या परिवहन विभागानेच कडक पावले उचलण्याचे ठरवले असून, विनाकारण हॉर्न वाजवल्यास ५०० रुपये इतका जबर दंड वाजवून वसूल करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. अर्थात, हा प्रस्ताव तूर्त विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला आहे. त्यावर बरीच चर्चा-प्रतिवाद होऊन मगच तो नियम रस्त्यांवर लागू होणार आहे. त्याला अर्थात समाजाच्या विविध स्तरांवरून विरोध होईल, हेही ओघाने आलेच. कारण, हेल्मेटसक्‍ती असो, किंवा गाडीत बसल्यानंतर सीटबेल्टची सक्‍ती असो, ‘ऑड-इव्हन’चा नियम असो, किंवा साधा एकदिशा मार्गाचा नवा फतवा असो, कुठल्याही वाहतूकविषयक सक्‍तीला विरोध हा ठरलेलाच असतो; परंतु या सक्‍तीच्या शांततेचा फायदा समाजालाच अधिक आहे, हे आधी आपण सुज्ञपणे समजून घेणे आवश्‍यक आहे.

तसे पाहू गेल्यास इस्पितळे, शाळा, महाविद्यालये आदींच्या परिसरात हॉर्न टाळण्याच्या सूचना आजही असतात; पण त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. वाहन हाकताना सतत हॉर्नचा वापर करणे, हा आपला जन्मसिद्ध हक्‍क असल्याच्या आविर्भावातच सारा गोंगाट चालू असतो. सडक मधूनच पार करणाऱ्या चुकार पादचाऱ्यास इशारा देण्यासाठी किंवा दुर्घटना टाळण्याचा एक अंतिम पर्याय म्हणून हॉर्न वाजवणे समजू शकते; पण आपल्याकडे पुढील वाहनाने साइड देण्यासाठीही कर्णा वाजवला जातो. आपल्या गाडीच्या पुढे तोऱ्यात गाडी काढणाऱ्या वाहनाच्या चालकाला शेलक्‍या शिव्या देण्यासाठीही हॉर्नची भाषा वापरली जाते. टोल नाक्‍यावरील कारकुनाने उशीर लावल्यास त्याला लाखोली वाहण्यासाठीही हॉर्नच्या बटणावरच तळहात आपटला जातो. काहीवेळा तर तरुणांचे टोळके अपरात्री रिकाम्या रस्त्यांवर भरधाव जाताना गोंगाट करत आपल्या अस्तित्त्वाचा पुरावा देणे कर्तव्य समजते. हॉर्न नावाच्या यंत्राचा हा शुद्ध दुरुपयोग असतो. विनाकारण हॉर्न वाजवून थोडाफार त्रास होईल, बाकी काही नाही, असा एकंदरीत भारतीय दृष्टिकोन असावा. प्रत्यक्षात अलीकडे शहरभागामधील प्रदूषणाच्या पातळीत झालेल्या धोकादायक वाढीतला बराच मोठा वाटा या हॉर्नचा आहे, हे लक्षात घेणे आवश्‍यक आहे. मुंबईसारख्या महानगरात तर वर्दळीच्या काळात हॉर्नचा गोंगाट अनेकदा दीडशे डेसिबलच्या वर गेलेला आढळला आहे. वास्तविक तो ७० डेसिबल्सच्या वर जाणे योग्य नाही, असे नियम सांगतो. मुंबईचे शांघाय करण्याच्या गप्पा मध्यंतरी झडल्या होत्या; परंतु याच शांघायमध्ये हॉर्न वाजवल्यास जबरदस्त दंड आणि शिक्षा होते, हेही नमूद करायला हरकत नाही. शांघायचे सोडा, शेजारील नेपाळची राजधानी काठमांडू येथील गजबजलेल्या रस्त्यांवर हॉर्न वाजवण्यावर बंदी आहे. विकसित देशांमध्ये तर हा निर्बंध वाहनचालक स्वत:हूनच काटेकोरपणाने पाळतात. ज्या गोष्टी साध्या विवेकबुद्धीने साध्य होऊ शकतात, त्यासाठी आपल्या देशात कायदे आणि नियम करावे लागतात, हेच तर मोठे दुर्दैव आहे. सारांश इतकाच की, पुढे-मागे परिवहन विभागाच्या या प्रस्तावाचे नियमात रूपांतर झाले तर त्याचे स्वागत करणेच समाज म्हणून आपल्या हिताचे आहे.

Web Title: editorial please not horn