नद्यांचे आक्रंदन (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

जीवनदायिनी नद्यांचे आरोग्य चांगले राहावे, त्या स्वच्छ-प्रवाही असाव्यात, त्यातील परिसंस्था सुरक्षित असाव्यात यासाठी आपण काय करतो, हा प्रश्‍न प्रत्येक जबाबदार नागरिकाने स्वतःला विचारला पाहिजे.

जीवनदायिनी नद्यांचे आरोग्य चांगले राहावे, त्या स्वच्छ-प्रवाही असाव्यात, त्यातील परिसंस्था सुरक्षित असाव्यात यासाठी आपण काय करतो, हा प्रश्‍न प्रत्येक जबाबदार नागरिकाने स्वतःला विचारला पाहिजे.

सं स्कृती आणि नद्या यांचा घनिष्ठ संबंध आहे. नद्यांच्या काठावरच संस्कृती विकसित झाली आणि मानवी व्यवहारांचे उगमस्थानही नद्याच राहिल्या आहेत. प्राचीन काळापासून नद्या भारतीयांच्या भावजीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे गंगा, नर्मदा आणि अन्य नद्यांना ‘मैया’ म्हणजे आई म्हणून संबोधले जाते. एकुणातच भारतीयांची नद्यांबद्दलची उदात्त, कोमल भावना अन्यत्र क्वचितच कोठे दिसेल. नद्यांच्या काठाने विकसित झालेल्या संस्कृतीचा उल्लेख करताना भारतीय म्हणून आपली छाती अभिमानाने फुगते, पण दुसरीकडे या जीवनदायिनी नद्यांचे पाणी खळाळते आणि स्वच्छ राहावे, तेथील परिसंस्था टिकाव्यात याबाबत आपण इतके उदासीन आहोत की मान खाली घालण्याची वेळ यावी. घरातील देव्हाऱ्यात स्थान दिलेल्या गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा आदींची प्रत्यक्षातील स्थिती अत्यंत भयंकर आहे. त्यांच्यासह असंख्य नद्यांचा श्‍वास कोंडला गेला आहे. कारण कचरा, निर्माल्य, सांडपाणी, घातक रसायने आपण बिनदिक्कतपणे थेट नद्यांमध्ये टाकत आहोत. अनेक शहरांतील शेकडो दशलक्ष लिटर सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडले जाते. कारखान्यांमधील टाकाऊ रसायने तशीच नदीच्या पाण्यात सोडली जातात. त्यातून नद्या वेगाने प्रदूषित होत आहेत. हे चित्र विषण्ण करणारे आहे. नद्यांचे आरोग्य चांगले राहावे, त्या स्वच्छ, प्रवाही असाव्यात यासाठी आपण काय करतो, हा प्रश्‍न प्रत्येक जबाबदार नागरिकाने स्वतःला विचारला पाहिजे.
महाराष्ट्रातून वाहणाऱ्या प्रमुख २१८ नद्यांपैकी ४९ नद्यांचे पाणी प्रदूषित झाले आहे, ही केंद्रीय जल आयोगाने नुकतीच जाहीर केलेली आकडेवारी आपल्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. राज्यातील नद्यांची एकूण लांबी १८ हजार किलोमीटर असून, त्यातील आठ हजारांवर किलोमीटर लांबीच्या नद्यांना प्रदूषणाचा विळखा पडला आहे. पवित्र मानल्या जाणाऱ्या गंगेचा मुख्य प्रवाह अडीच हजार किलोमीटरचा आहे. गंगेच्या प्रवाहाच्या जवळपास तिप्पट प्रवाहात आज सांडपाणी वाहत आहे, हे चित्र महाराष्ट्रासाख्या पुरोगामी राज्याला निश्‍चितच शोभणारे नाही. देशभरात रोज ६१ हजार ७५४ दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते. त्यात सात हजार २९७ दशलक्ष लिटर म्हणजे ११ टक्के वाटा महाराष्ट्राचा असतो. ‘सर्वाधिक सांडपाणी तयार होणारे राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. पुण्यातील मुठा, कोल्हापूरची पंचगंगा, नाशिकची गोदावरी आणि मुंबईची मिठी या नद्यांमध्ये खरेतर पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहापेक्षा सांडपाण्याचा प्रवाह अधिक आहे. शहरीकरणामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे नद्या आक्रंदत आहेत, दिवसेंदिवस त्या अत्यवस्थ होत आहेत. एका-एका श्‍वासासाठी या नद्यांमधील जलचर संघर्ष करत आहेत. त्यांचा आक्रोश आपल्यापर्यंत कधी पोचणार? राज्यातील नद्या प्रदूषित करण्यास शहरे अधिक जबाबदार आहेत. राज्यातील नद्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यांपैकी ८५ टक्के सांडपाणी २७ महापालिकांच्या क्षेत्रातून सोडले जाते. त्यातही दहा महापालिकांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी कोणतीच यंत्रणा अस्तित्वात नाही, ही धक्कादायक बाब आहे. महाराष्ट्र हे सर्वाधिक धरणे असलेले राज्य आहे आणि पिण्यासाठी, शेतीसाठी, तसेच उद्योगांसाठी लागणाऱ्या पाण्याकरिता ही धरणे आवश्‍यकच आहेत. मात्र नद्यांचे प्रवाह अडविताना त्यांची पात्रे प्रदूषणकारी घटकांनी भरून जाता कामा नयेत, याकडे आपले दुर्लक्ष झाले आहे. कचरा, सांडपाणी, तसेच प्रदूषित घटक नदीपात्रात टाकले जाणार नाहीत, यासाठी सरकारने ठोस कृती कार्यक्रम तातडीने हाती घेण्याची गरज आहे. ‘नमामी गंगे’च्या धर्तीवर राज्यात सुरू केलेले ‘नमामी चंद्रभागा’ अभियान हे त्या दिशेने टाकलेले योग्य पाऊल आहे. नद्यांना प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ वेगवेगळे प्रयोग करत आहे. त्यामुळे प्रदूषणाची तीव्रता काही अंशी कमी होत आहे. हा आशेचा किरण असला, तरी हा प्रयोग फक्त सरकारी यंत्रणापुरताच आहे. त्याला व्यापक लोकसहभागाची जोड मिळणे आणि गावोगावी नद्यांच्या संरक्षणासाठी लोकचळवळ उभी राहणे ही काळाची गरज आहे. खरेतर मुळातच नद्यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी सर्वांनी सजग राहणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे, हे अधिक महत्त्वाचे आहे. तसा विचार रुजला, तरच जीवनदायिनी नद्यांचा श्‍वास मोकळा होऊ शकेल.

Web Title: editorial river water and health