हसण्यावारी नेऊ नका! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

दुसऱ्याच्या जिव्हारी लागेल असा विनोद सहसा करू नये, हा संस्काराचा भाग आहे, कायद्याचा नव्हे! दुसऱ्याचे विडंबन करणारा विनोद हा हीन दर्जाचा असतो, याचे तारतम्य ठेवायला हवे. तसे ते ठेवले तर खळाळत्या हास्याला बाधा येण्याची गरज नाही. 
 

दुसऱ्याच्या जिव्हारी लागेल असा विनोद सहसा करू नये, हा संस्काराचा भाग आहे, कायद्याचा नव्हे! दुसऱ्याचे विडंबन करणारा विनोद हा हीन दर्जाचा असतो, याचे तारतम्य ठेवायला हवे. तसे ते ठेवले तर खळाळत्या हास्याला बाधा येण्याची गरज नाही. 
 

हसणारा प्राणी अशी मनुष्यप्राण्याची व्याख्या गेल्या शतकात कुणीतरी केली होती. पण, विज्ञान जसजसे विस्तारत गेले, तसतसे डॉल्फिन, चिपांझी, काकाकुवा आदी टवाळ सजीवही हसू लागल्याचे मनुष्यप्राण्याच्या लक्षात येऊ लागले. अर्थात ह्या हसणाऱ्या प्राण्यांची यादी फार मोठी नाही आणि यादीत अग्रभागी मनुष्यप्राणीच आहे, हे खरे असले तरी हसण्याचा संसर्ग वैश्‍विक आहे, हे तरी त्यातून सिद्ध होतेच. मनुष्य खळखळून हसू शकतो, हसण्यासाठी निमित्ते शोधत असतो, हा शोध जुना असला तरी स्वत:च्या ह्या हसण्याच्या क्‍वालिटीकडे पाहून हसावे की रडावे, असा प्रश्‍न हल्ली हल्ली काही माणसांना पडू लागला आहे, असे दिसते.

संता-बंता फेम सरदारजी जोक्‍सच्या लाटा अधूनमधून सोशल मीडियाच्या किनाऱ्यावर धडकत असतात. त्या लाटांचा मन:पूत आस्वाद जगभरातले टवाळ घेत असतात. तथापि, संता-बंता यांच्यावरील विनोदामुळे काही सरदारजी मंडळींनी डोक्‍यात राख घालून घेत थेट सर्वोच्च न्यायालयातच धाव घेऊन 'शीख अल्पसंख्याक संप्रदायाचीच ही विटंबना आणि अपमान असून असल्या विनोदांवर बंदी आणावी' अशी मागणी करणारी जनहित याचिकाच गुदरली.

दिल्ली शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या काही सदस्यांनी ह्या विनोदांना सपशेल बंदी घालावी, ह्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. माजी सरन्यायाधीश तीरथसिंग ठाकूर ह्यांच्या खंडपीठाने गेल्या वर्षी ह्या याचिकेवर विचार करण्याचे मान्य केले होते. विनोद कुठे आणि कसा करावा, याचे तारतम्य शालेय पातळीपासून आले पाहिजे, असे मत काही महिन्यांपूर्वी ह्याच याचिकेच्या सुनावणीदरम्यान व्यक्‍त केले गेले होते.

गेले वर्षभर ह्या याचिकेवर बरीच भवति न भवति झाल्यावर नव्या खंडपीठाने मात्र संता-बंताच्या विनोदांवर अशी सरसकट बंदी घालणे शक्‍य नसल्याचे स्पष्ट करत या संदर्भात लोकांसाठी नीतितत्त्वे आणि निर्बंध लादणे अयोग्य ठरेल, असे स्वच्छ शब्दांत सांगितले आहे. असल्या विनोदांवर सरसकट बंदी घालणे ही बाब मुळात कायद्याच्या कक्षेत येतच नाही. अशी नीतितत्त्वे राज्य सरकारांनीच घातली, तर मार्ग निघू शकेल, असे न्या. दीपक मिश्रा आणि न्या. आर. भानुमती ह्यांच्या खंडपीठाने सुचवले. ह्याच न्या. मिश्रा ह्यांनी चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजविण्याचा आदेश जारी होता, ही जाता जाता नमूद करण्याजोगी बाब. 

एकंदरीतच समाजातील सहिष्णुता कमी कमी होत चाललेली आपण पाहतो आहोतच. लहान-मोठ्या, भल्याबुऱ्या अनेक घटनांवर तत्काळ विखारी प्रतिक्रिया उमटताना दिसतात. अशा परिस्थितीत योग्य ते समाजभान ठेवण्याचे काम सुजाण नागरिकांचे असते. दुसऱ्याच्या जिव्हारी लागेल असा विनोद सहसा करू नये, हा संस्काराचा भाग आहे, कायद्याचा नव्हे! दुसऱ्याची विडंबना करणारा विनोद हा हीन दर्जाचा असतो, हे जागतिक सत्य आहे.

विनोदाचे यश दिलखुलासपणात असते आणि तो उभयपक्षी असावा, ही त्याची पूर्वअट. विनोद करणारा आणि त्याचा आस्वाद घेणारा दोघेही निर्मळ मनाने हसले, तर विनोद सत्कारणी लागला असे म्हणायचे. पण विनोद हा प्राय: अपमान किंवा अवहेलना करण्यासाठी वापरला गेला की मग तो विनोद राहत नाही. त्याचे धारदार शस्त्र होते. व्हॉट्‌सऍप, फेसबुक आदी समाज आणि संपर्काची माध्यमे ज्या प्रकारे हसण्याची निमित्ते पुरवत असतात, त्याला तोड नसली तरीही विनोदबाजी हे काही ह्या माध्यमांचे विहीत कर्तव्य नव्हे, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. त्याचबरोबर संता-बंताच्या विनोदांना थांबविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने असमर्थता दर्शविली असली, तरी सरदारजींवर वाट्टेल ते विनोद करण्याचे मुभा दिलेली नाही, हेही तारतम्य आपण ठेवायला हवे. 

गेल्या शतकात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडच्या नागरिकांनाही असल्याच प्रकारच्या विनोदहल्ल्याला तोंड द्यावे लागले होते. पोलिश हे मूर्ख, भंपक आणि गुलामी वृत्तीचे असतात, हे दर्शविणाऱ्या ह्या चेष्टामस्करीमागे नाझी राजवटीची कुटील नीती होती, ह्याचे इतिहासात दाखले आहेत. पण त्याही आधी 19व्या शतकात फ्रेडरिक द ग्रेट आणि झार निकोलसच्या पाशवी राजवटीच्या काळात पोलिश निर्वासितांचे लोंढे अमेरिकेत दाखल होऊ लागले. सारे काही गमावून आलेली ही मोठी मेहनती मंडळी होती. यथावकाश त्यांनी अमेरिकेतही जम बसवला. परंतु, त्यांच्यावरचे विनोदाचे लोण मात्र चढतेच राहिले. इतके की सत्तरीच्या दशकात पोलंड सरकारने अमेरिकेकडे त्याबद्दल रीतसर नाराजी नोंदवली होती. जर्मनीमध्ये पोलिश जोक्‍स आजही खूप चालतात. जर्मनीतील मोटारचोरीचे धागेदोरे नेहमी पोलिश गुन्हेगारांशी जोडले जातात. त्यावरचा एक जोक पर्यटनविषयक जाहिरातमंत्रासारखा वाटतो. 'कभी तो पधारो हमारे पोलंड में...तुमची मोटार तुमच्या आधीच इथे पोचली आहे!' असो. सारांश इतकाच की विनोदात सगळेच हसण्यावारी नेण्याजोगे नसते. चिडवणारा, दुखवणारा, रडवणारा विनोद टवाळालासुद्धा आवडत नाही.

Web Title: Editorial Santa Banta Jokes Supreme Court