अजीर्णानंतरचे लंघन (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

एखादी गोष्ट वास्तवाच्या जवळ येणे हे हितावह असते. शेअर बाजारात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे गुंतवणूक करणाऱ्यांनी घाबरून जाऊ नये; पण सावध नक्कीच राहिले पाहिजे, हाच मोठ्या घसरणीचा संदेश आहे.

एखादी गोष्ट वास्तवाच्या जवळ येणे हे हितावह असते. शेअर बाजारात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे गुंतवणूक करणाऱ्यांनी घाबरून जाऊ नये; पण सावध नक्कीच राहिले पाहिजे, हाच मोठ्या घसरणीचा संदेश आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेची तब्येत कशी आहे, हे ओळखण्यासाठी ज्या निकषांचा आधार घेतला जातो, त्यात एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी), वित्तीय तूट, औद्योगिक उत्पादन, चलनवाढ, परकी गंगाजळी अशा महत्त्वाच्या घटकांबरोबरच शेअर बाजाराचा निर्देशांक हाही एक प्रतिबिंबासारखा पुढे येतो. हा घटक किती महत्त्वाचा, यावर मतभेद जरूर आहेत; पण त्यात होणाऱ्या मोठ्या चढ-उतारांची चर्चा गुंतवणूक वर्तुळात नेहमीच होत असते. गेल्या काही दिवसांत जागतिक आणि आपल्या देशातील शेअर बाजारात होत असलेली पडझडही अशा प्रकारे चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनली आहे.  मुळात वर जाणारी कोणतीही गोष्ट कधीतरी खाली येत असतेच; इतकेच नव्हे, तर ती ज्या गतीने वर जाते, तितक्‍याच वेगाने खाली येत असते, हा निसर्गनियम आहे. शेअर बाजारही त्याला अपवाद नसावा; मग तो जगातील अन्य देशांचा असो किंवा आपल्या देशातील. त्यातच आपली अर्थव्यवस्था आता जगाशी जोडली गेलेली असल्याने त्याचे जसे फायदे होत असतात, तसेच त्याचे फटकेही बसू शकतात. त्याचमुळे बाहेरच्या देशातील घटना-घडामोडींचा आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. शेअर बाजारही त्यातून सुटत नाही. गेल्या काही दिवसांत, विशेषतः केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आपल्या शेअर बाजारात अचानक पडझड सुरू झाली आणि मंगळवारी तिला आणखी तीव्र धार लागली. आधी ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘ब्लॅक मंडे’ म्हणता म्हणता रोजचा वार घसरणीचा वेग वाढवत गेला आणि दलाल स्ट्रीटवर एकप्रकारे ‘रक्तपात’ (ब्लडबाथ) अनुभवास आला. हा अनुभव गुंतवणूकदारांसाठी जसा काळजीचा तसाच गोंधळाचा ठरताना दिसतोय. म्हणूनच कोणत्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहायचे, हे महत्त्वाचे आहे. नव्या गुंतवणुकीची भविष्यवेधी संधी या दृष्टीनेही त्याकडे पाहता येते. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून म्हणजे २०१४ पासून आपल्या शेअर बाजाराचे जे ‘दक्षिणायन’ सुरू होते, त्याला अशा मोठ्या घसरणीच्या ‘उत्तरायणा’ची सवयच राहिलेली नव्हती. या तेजीने बाजाराच्या ‘सेन्सेक्‍स’ आणि ‘निफ्टी’ या निर्देशांकांना ३६ हजार आणि ११ हजार अंशांच्या विक्रमी पातळीपुढे नेऊन फेकले. या तेजीच्या सुटलेल्या वारूने सर्वसामान्यांना जसे आकर्षित केले, तसे जाणकारांच्या तोंडून सावधगिरीचा सल्लाही द्यायला लावले. साधारणपणे गेल्या पाच वर्षांत ‘सेन्सेक्‍स’चा पीई रेशो सरासरी १९.२० होता, जो परवाच्या जानेवारीअखेर म्हणजे अर्थसंकल्प जाहीर व्हायच्या आधी २५.६९ वर पोचला होता.

‘फंडामेंटल्स’पासून फार पुढे जाऊन ‘ओव्हरव्हॅल्यूड’ झाला होता आणि खरेदीच्या सपाट्याने ‘ओव्हरबॉट’ही झाल्याचे स्पष्टपणे दिसू लागले होते. अलीकडेच म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल सादर करताना केंद्रातील अर्थ सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी शेअरचे भाव हे आर्थिक विकासावर अवलंबून असणे आवश्‍यक असल्याचे मत नोंदविताना वाढत्या शेअर बाजाराबाबत सावधगिरीचा सल्लाही दिला होता. त्यातच केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्र्यांनी शेअर आणि म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन भांडवली नफ्यावर १० टक्के कर लागू करण्याचा प्रस्ताव मांडला. बाजाराच्या घसरणीला हे आणखी एक निमित्त मिळाले; पण निव्वळ या कारणांमुळे सध्याचा बाजार घसरतोय का, तर त्याचे उत्तर ठामपणे ‘नाही’ असे देता येईल. कारण, या वेळच्या घसरणीला जागतिक बाजारांतील घसरण हे प्रमुख कारण दिसत आहे. देशातील घटना हे निव्वळ योगायोगाने घडलेले दुय्यम निमित्त आहे. याचे कारण म्हणजे शेअर बाजारातील नफ्यावर कर लावण्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू होती व त्याचा धक्का बाजाराने बऱ्यापैकी पचवला होता. अर्थसंकल्पाच्या दिवशी उत्तरार्धात सावरलेला बाजार हे त्याचेच निदर्शक होते.
आपल्याप्रमाणे जगातील, विशेषतः अमेरिकेतील शेअर बाजारात गेल्या ७-८ वर्षांत अशीच तेजी सुरू होती. तिथे घसरण सुरू झाली आणि त्याचा ‘रिपल इफेक्‍ट’ आशियाई आणि पर्यायाने आपल्या देशावरही झाला. भावनांवर चालणाऱ्या बाजारांना घसरणीसाठी ‘निमित्त’ मिळाले. यात परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) आणलेला विक्रीचा दबाव; त्याशिवाय चलनवाढीच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेच्या बैठकीत ‘रेपो रेट’ वाढविला जाण्याची शक्‍यता आणि जोडीला अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे झालेले अवमूल्यन याही गोष्टी घसरणीला पूरक ठरत गेल्या इतकेच! मोठ्या तेजीच्या (बुल) बाजारात विक्रीच्या माऱ्याने होणाऱ्या अशा घसरणीला ‘हेल्दी करेक्‍शन’ असे म्हटले जाते आणि ते ‘ओव्हरड्यू’देखील झाले होते. चढ-उतार हेच बाजाराचे वैशिष्ट्य आहे आणि तसे होत राहणे गरजेचेही असते. बाजाराच्या पुढच्या वाढीला अशी घटना पूरक ठरणारी असते. त्यामुळे शेअर बाजारात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे गुंतवणूक करणाऱ्यांनी घाबरून जाऊ नये; पण सावध नक्कीच राहिले पाहिजे, हाच या घसरणीचा संदेश आहे.

Web Title: editorial sensex share market gdp