क्षण एक पुरे तेजाचा!

उमेश घेवरीकर
बुधवार, 17 जानेवारी 2018

आयुष्यात एखादा क्षण, एखादी घटना, एखादा अनुभव असा येतो की त्यामुळे त्या व्यक्तीचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलतो. जग जिंकायला निघालेल्या सम्राट अशोकाने पाहिलेला रक्तपात, युद्धाचे भयानक परिणाम त्याला अंतर्मुख करून शांततेकडे घेऊन गेले! आफ्रिकेतील रेल्वेप्रवासातील वर्णावरून मिळालेली वागणूक मोहनदास करमचंद गांधींना पुढे ‘महात्मा’ बनवून जाते. विदेशातील ऐषारामी जीवन जगणाऱ्या मार्गारेट एलिझाबेथ नोबल या विदुषीला स्वामी विवेकानंदांचे विचार भारतीयांसाठी समर्पित ‘भगिनी निवेदिता’ व्हायला निमित ठरले!

आधुनिक काळातही, आपल्या आसपास असा परीस स्पर्श लाभून आयुष्य चंदनासम झालेल्या व्यक्ती आहेत. वेश्‍यावस्तीतून जाताना तेथील दुर्दैवी बाया दिसताच, यांच्या जागी माझी आई किंवा बहीण असती तर, असा विचार मनात येऊन हादरलेले नगरचे गिरीश कुलकर्णी स्वतःच्या घरात त्या बायकांच्या मुलांना आणून ठेवतात आणि वंचित, अनाथ ‘एचआयव्ही’बाधित मुलांसाठी ‘स्नेहालय’ नावाचे भारतातील आदर्श संकुल उभे राहते. (कै.) सदाशिव अमरापूरकर यांच्या सामाजिक कामाचा वारसा लाभलेला त्यांचा अमेरिकेतील अकरावीतील नातू ओम जहागीरदार स्वतः नेत्रदोष असल्याने त्या वेदना समजून घेतो आणि लहान भावाच्या- आत्मनच्या मदतीने भारतातील सरकारी शाळांमधील गरिबांच्या मुलांची मोफत नेत्रतपासणी व चष्मेवाटप करण्यासाठी अमेरिकेत omnisight international ही संस्था स्थापन करून निधी जमवतो. कॅनडामधील रेयान हर्लजॅक हा विद्यार्थी आपल्या शिक्षकांकडून युगांडातील पाण्याचे दुर्भीक्ष, त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांच्या आरोग्य व शिक्षणावर होणारे परिणाम याची हृदयद्रावक कहाणी ऐकतो आणि आपल्या खाऊचे पैसे त्यांना पाठवतो. इतकेच नव्हे तर त्यांच्यासाठी झटणाऱ्या ‘वॉटरकॅन’ या संस्थेसाठी निधी गोळा करत त्या संस्थेचा दूत बनतो. युगांडातील एका प्राथमिक शाळेत त्याने जमा केलेल्या निधीतून विहीर खणली जाते आणि तिला नाव दिले जाते ‘रायन्स वेल’! पुढे ‘रायन वेल फाउंडेशन’च्या माध्यमातून जगभरात विहिरी व स्वच्छतागृहे बांधली जातात. कर्नाटकातील बंगळूरमधील किशन श्रीकांत हा चित्रपटांच्या वेडाने झपाटलेला मुलगा जाहिराती, चित्रपट यात कामे करताना दिग्दर्शक होण्याचा ध्यास घेतो. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी पदपथावरील मुलांच्या समस्या अधोरेखित करणारा ‘केअर ऑफ फूटपाथ’ हा चित्रपट दिग्दर्शित करतो आणि थेट राष्ट्रपती पारितोषिकाला गवसणी घालतो. अरुणिमा सिन्हा ही ऐन विशीतील युवती रेल्वेप्रवासात चोरट्यांबरोबरील झटापटीत पाय गमावते. त्यानंतरही न खचता ती मोठे स्वप्न पाहते. कृत्रिम पायाच्या मदतीने माउंट एव्हरेस्ट सर करणारी ती पहिली व्यक्ती ठरते आणि आपण ‘अपंग’ नाही, तर ‘अभंग’ आहोत हे सिद्ध करते!

‘क्षण एक पुरे प्रेमाचा’ म्हणणारे लाखो भेटतील, पण जीवनाला कलाटणी देणाऱ्या या परिसस्पर्शाचे वरदान लाभलेले हे भाग्यवान मोजकेच ! या क्षणांमुळे अंतर्मुख आणि सकारात्मक होत त्यांनी आपले आयुष्य समाजासाठी अर्पण करताना उभारलेली ही कर्मक्षेत्रे तीर्थक्षेत्रांइतकीच महत्वाची आहेत. असे भाग्यवान लोक आपल्या समाजाची आणि संस्कृतीची मानचिन्हे ठरावीत आणि जीवन उजळून टाकणाऱ्या या तेजोमय क्षणांचा स्पर्श आपल्यालाही व्हावा.

Web Title: editorial umesh ghewarikar write article in pahatpawal