दहशतवादाची पत्रकारितेलाही झळ

विजय साळुंके
मंगळवार, 19 जून 2018

काश्‍मीरमधील विभाजनवादाला धार्मिक संदर्भाची किनार आहे. मात्र उर्वरित भारतातील धार्मिक राष्ट्रवादाच्या उन्मादी आक्रमकतेने काश्‍मीरमधील पत्रकारांच्या तटस्थतेला आणखी तडे गेले आहेत. त्यांना तर दोन्ही बाजूंकडून निष्ठेची परीक्षा द्यावी लागत आहे.

काश्‍मीरमधील विभाजनवादाला धार्मिक संदर्भाची किनार आहे. मात्र उर्वरित भारतातील धार्मिक राष्ट्रवादाच्या उन्मादी आक्रमकतेने काश्‍मीरमधील पत्रकारांच्या तटस्थतेला आणखी तडे गेले आहेत. त्यांना तर दोन्ही बाजूंकडून निष्ठेची परीक्षा द्यावी लागत आहे.

जम्मू- काश्‍मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, अशी सरकारची भूमिका आहे. काश्‍मीरच्या नैसर्गिक सौंदर्याची अनुभूती घेण्यासाठी, तसेच वैष्णोदेवी, अमरनाथ यात्रेसाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने जाणाऱ्या लोकांचीही हे राज्य आपल्या हातून जाता कामा नये, अशीच भावना असते. १९८७ मधील वादग्रस्त निवडणुकीनंतर तेथील विभाजनवादाने दहशतवादाचे वळण घेतले. बुऱ्हाण वाणी २०१६ मध्ये मारला गेल्यानंतर सुरक्षा दलांवर थेट हल्ले सुरू झाले व या लढ्याला ‘इस्लामिक स्टेट’चा आशय प्राप्त झाला. त्यामुळे काश्‍मीरमधील हिंसाचाराबाबत उर्वरित देशात घृणा आणि उपेक्षा दिसू लागली. तेथील हिंसाचारात नागरिक, अतिरेकी व सुरक्षा दलाचे मिळून ७० हजार लोक गेल्या तीस वर्षांत मारले गेले. पंजाबमध्ये १९८३ ते ९३ या दहा वर्षांत खलिस्तान चळवळीने ३५ हजार लोकांचा बळी घेतला. त्यात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, अकाली नेते संत लोंगोवाल, मुख्यमंत्री बेअंतसिंग, तसेच विविध पक्षांच्या नेत्यांचा अंत झाला. काश्‍मीरमध्येही मिरवैझ फारूख, अब्दुल गनी लोण या नेत्यांचा बळी गेला. परंतु, त्याचे पडसाद देशाच्या इतर भागांत तेवढ्या तीव्रतेने उमटले नाहीत. कर्नाटकात पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर वैचारिक वर्तुळात ज्या प्रकारे प्रतिक्रिया आली, तशी काश्‍मीरमधील नामवंत पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येनंतर पत्रकारितेच्या क्षेत्रातूनही आलेली दिसत नाही. व्यावहारिक पातळीवर काश्‍मीर खोरे आपल्यापासून किती तुटले आहे, हे यातून दिसले.
बुखारी यांच्या हत्येमागे कोण आहे, याविषयी विविध तर्क आहेत. पाकिस्तानी लष्कर, ‘हुरियत’चे विभाजनवादी, तसेच काही दहशतवादी गटांची नावे चर्चेत आहेत. तपासातून आलेच तर सत्य बाहेर येईलही. परंतु, या निमित्ताने उर्वरित भारतातील लोक काश्‍मीरमधील पत्रकारांविषयी संशयाच्या भावनेतून उदासीन बनल्याचे दिसले. दहशतवादग्रस्त प्रदेशात पत्रकारिता म्हणजे विस्तवावरून चालणे. दहशतवाद फोफावण्यात प्रसारमाध्यमे प्राणवायूचे काम करतात, असे म्हटले जाते. मर्यादित अर्थाने त्यात तथ्य असले, तरी व्यवसायाशी प्रामाणिक, निष्ठा असलेले पत्रकार विविध बाजूंनी संशयाने पाहिले जात असले, तरी आपले कर्तव्य पार पाडीत असतात. एक व्यक्ती म्हणून प्रत्येकाची धार्मिक, राजकीय मते असतात. सभोवतालची परिस्थिती त्यात दबाव टाकून व्यावसायिकतेची परीक्षा बघत असते. शुजात बुखारी आपल्या भूमिकेशी प्रामाणिक होते. त्यांचा अग्रक्रम शांतता प्रस्थापित होणे, भारत-पाक संवाद सुरू करणे, काश्‍मिरींना त्यात स्थान असणे व त्यातून सर्वमान्य तोडगा काढणे, असा होता. अर्थात त्यांच्या हेतूंविषयी दोन्ही बाजूंना संशय होता. त्यातच त्यांचा बळी गेला.

पंजाब आणि जम्मू-काश्‍मीरमधील विभाजनवादी चळवळ सुरवातीपासून अभ्यासल्यास या दोन राज्यांतील पत्रकारांनी आपल्यापुढील आव्हानांचा कसा मुकाबला केला, हे लक्षात येईल. काश्‍मीरमध्ये तीस वर्षांच्या  दहशतवादाने चार पत्रकारांचा बळी घेतला. ‘बीबीसी’चे प्रतिनिधी युसूफ जमील १९९५ मधील हल्ल्यात बचावले, मात्र ‘एएनआय’चे छायाचित्रकार मुश्‍ताक अली मारले गेले. शुजात बुखारी हे सर्वांत मोठे नाव. पंजाबात मात्र पत्रकारांनी फार मोठी किंमत मोजली. ‘पंजाब केसरी’चे संपादक व ज्येष्ठ पत्रकार लाला जगतनारायण, त्यांचे पुत्र रमेशकुमार यांच्या हत्येनंतरही ‘खलिस्तान’वादी थांबले नाहीत. या चळवळीविरोधात खंबीर भूमिका घेणाऱ्या या वृत्तपत्राचे बलवीरसिंग सग्गू, नरेंद्रसिंग या बातमीदारांना प्राण गमवावे लागले. काश्‍मीरमध्ये जे दिसत नाही ते पंजाबात दिसले. पंजाबातील वृत्तपत्रे, त्यांचे मालक, कर्मचारी व पत्रकार यांनी विभाजनवादी शक्तींशी तडजोड केली नाही. ‘खलिस्तान’ चळवळीच्या विरोधात ते ठामपणे उभे राहिले. काश्‍मीरमध्ये मात्र वृत्तपत्रे व पत्रकारांनी विभाजनवादाबाबत निश्‍चित भूमिका घेतली नाही. त्यातील बहुसंख्य भावनिकदृष्ट्या लढ्याशी सहमतच होते. पंजाबात शीख पत्रकारांची संख्या लक्षणीय असूनही, काही अपवाद वगळता मोठी किंमत मोजून त्यांनी विभाजनवादाच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतली. काश्‍मीर खोऱ्यात तसे ठळकपणे जाणवले नाही. बऱ्याच जणांनी कुंपणावर राहून दोन्ही बाजू पाहून स्वतःचा बचाव करीत आपले अस्तित्व टिकविण्याचा, तसेच मिळेल ते लाभ पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला.
पंजाबातील दहशतवादाच्या काळात वृत्तपत्रे, रेडिओ हीच प्रसिद्धीची माध्यमे होती. काश्‍मीरमध्ये मात्र गेल्या दहा-बारा वर्षांत इलेक्‍ट्रॉनिक प्रसारमाध्यमांबरोबरच सोशल मीडियानेही दहशतवादाच्या प्रसाराला हातभार लावला आहे. काश्‍मिरी मुस्लिमांमधील सूफी संस्कार पुसून ‘इस्लामिक स्टेट’ची निर्दयता आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सोशल मीडियातून झाले. त्यातूनच लष्कराच्या सेवेतील काश्‍मिरी मुस्लिमांची निर्दयतेने हत्या करण्यात आली. याचा धसका घेऊन काश्‍मिरी पत्रकारांनी तटस्थ राहणे थांबविले. पंजाबमधील पत्रकारांचा निडरपणा काश्‍मीरमध्ये अभावानेच दिसला.
दहशतवाद वा विभाजनवादाला जगातला नवा ‘उद्योग’ असेही संबोधले जाते. त्याचा प्रत्यय अफगाणिस्तान, पाकिस्तानात येत होताच. काश्‍मीर खोऱ्यातही ते लोण पसरले आहे. या ‘उद्योगा’चे लाभार्थी म्हणून राजकीय नेते, मध्यस्थ, व्यापारी, पत्रकार व काही सुरक्षा कर्मचारी यांचे संदर्भ येत असतात. गेली तीस वर्षे काश्‍मीर खोऱ्यात हिंसाचार, ‘बंद’-हरताळ, हत्याकांडे होत असूनही १९८८ मधील परिस्थिती २०१८ मध्ये दिसत नाही. मधल्या काळात पर्यटकांचा ओघ आटूनही काश्‍मीर खोऱ्यात प्रचंड प्रमाणात सुबत्तेची चिन्हे दिसतात. ‘हुरियत’च्या नेत्यांकडे उपजीविकेची साधने नसताना त्यांच्या मालमत्ता वाढल्या. तीच बाब पत्रकारांमध्येही दिसली. सर्वसामान्यांमध्ये पत्रकार हे दोन्ही बाजूंना विकले गेल्याची भावना वाढली. परिणामी या व्यवसायाची विश्‍वासार्हता कमी होत गेली. दगडफेकीसाठी, हातबाँबसाठी तरुणांना पैसे दिले जातात, तसे स्थानिक पत्रकारांनाही विविध स्रोतांकडून नियमितपणे प्राप्ती होते, असा प्रवाद निर्माण झाल्याने शुजात बुखारींसारख्यांचे काम अधिकच अवघड होत गेले.

 देशाच्या अन्य भागांत अनेक प्रसारमाध्यमे, पत्रकार हे वैचारिकता, श्रद्धा अथवा स्वार्थापोटी सत्ताधारी, राजकीय पक्षाचे नेते, धनदांडगे व भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आश्रयास गेलेले दिसतात, तसेच काहीसे चित्र काश्‍मीरमध्ये आढळते. ‘खलिस्तान’वाद्यांत अनेक गट होते. त्यांच्यात आपसात वैर होते. लोंगोवाला, बर्नालांसारखे तडजोडवादीही होते. तसेच काश्‍मीरमध्येही पाकिस्तानवादी, स्वातंत्र्यवादी, भारत-पाक समन्वयवादी शक्ती आहेत. त्यांच्यापासून समान अंतर राखून व्यावसायिक निष्ठेने काम करणारे अभावानेच असतील. त्यामुळेच कदाचित बुखारींच्या हत्येबद्दल तीव्र प्रतिक्रिया दिसली नाही.

Web Title: editorial vijay salunke write jammu kashmir article