भाषा अभ्यासाची प्रभावशाली पावले...

प्रा. डॉ. केशव देशमुख
शनिवार, 10 डिसेंबर 2016

भाषेच्या प्रयोगशाळेद्वारे नव्या पद्धतीने व्याकरण चिंतन तर होऊ शकेलच, पण छंदोबद्ध प्राचीन काव्याचा, त्यातील माधुर्याचा, उच्चारांचा अभ्यास अधिक खोलातून करता येईल. भाषा प्रयोगशाळा ही बोली शिक्षणावरील व भाषा चिंतनावरील आनंदाची शिदोरी ठरू शकेल.

भाषेच्या प्रयोगशाळेद्वारे नव्या पद्धतीने व्याकरण चिंतन तर होऊ शकेलच, पण छंदोबद्ध प्राचीन काव्याचा, त्यातील माधुर्याचा, उच्चारांचा अभ्यास अधिक खोलातून करता येईल. भाषा प्रयोगशाळा ही बोली शिक्षणावरील व भाषा चिंतनावरील आनंदाची शिदोरी ठरू शकेल.

आता गतिमान काळ समजून घ्यावा लागेल. शिवाय सांप्रत स्थितीत उपलब्ध सोयी व साधनांचेही ज्ञानवाचक उपयुक्तता संशोधन आणि कृतीत उतरविणे जास्त हितावह आहे. वर्गात तुम्ही शिकवणे आणि विद्यार्थ्यांनी एकतर्फी केवळ "ऐकणे' ही बाब आता कालबाह्य ठरणारी म्हणायला हवी. प्रयोगाच्या पातळीवर जाऊन भाषांचा, बोलींचा आणि बोलीतील उच्चारसौंदर्याचा अभ्यास एव्हाना आपल्याकडे सुरू झाला आहे. खरे तर पुस्तकी शिक्षणाला विरोध करण्याचेही दिवस सुरू झाले आहेत. या उलट वर्षभरात काही विद्यार्थ्यांचे संघ स्थापीत करून व विद्यापीठ वा महाविद्यालयांभवतालची वसाहत निवडून अथवा ग्रामसंस्कृती पूर्णतः सांभाळून असलेली गावे निवडून बोलींचा, भाषिक लहेजांचा चांगला अभ्यास शक्‍य आहे. आणि जो पुस्तकी ढाच्यापेक्षा नूतन व जिवंतसुद्धा ठरणारा अभ्यास आहे. याशिवाय श्रवण व उच्चार यांतूनही भाषा-बोलींचा सतत नवा अभ्यास करता येणे, या काळात अवघड नाही. भाषेची प्रयोगशाळा उभी करून त्याद्वारे व्याकरणचिंतन नव्या पद्धतीने होऊ शकते. छंदोबद्ध प्राचीन काव्याचा, गेयतेचा, त्यातल्या माधुर्याचा, उच्चारांचा अभ्यास भाषेच्या प्रयोगशाळेतूनच अधिक खोलातून व अधिक आनंदाने करता येईल.

आज, गीतांचा अभ्यास, गीतिकाव्यांचा अभ्यास, किशोरांची बोली, प्रौढांची भाषा, तरुणांचीही एक भाषा कानी पडत असते. अशा भाषा किंवा केवळ श्रम व शेती निवडून या क्षेत्रातील भाषा जशास तशी जतन करण्याच्या कामी भाषेची प्रयोगशाळा खूपच प्रभावी करणारी चिंतनशाखा ठरू शकेल. खरे तर आपल्याकडे मराठीसारख्या विषयात विद्यापीठाच्या दोनपेक्षा जास्त पदव्या मिळविणारे विद्यार्थी हजारो हरसाल बाहेर पडतात. पण लेखन व उच्चार पातळीवर काळजी वाटावी अशा चुका या विद्यार्थ्यांकडून होतात. ग्रेससारख्या कवींच्या कवितेचे वाचन आणि नारायण सुर्वेंच्या वेगळ्या कवितेचे वाचन या दोन्ही वाचनामध्ये आंतरिक व बाह्य कमालीचा फरक असतो. तो पुष्कळांना कळत नाही. याचे कारण उच्चार श्रवणातील दोषस्थळे हेच आहे. भाषांची प्रयोगशाळा त्यासंबंधीचा सशक्त उपाय ठरू शकतो. असे शिक्षणाचे बोथटीकरण जास्तच चिंता वाढवू पाहते ही वस्तुस्थिती आहे. आपल्या मराठी स्वरमाला-वर्णमाला यांत असणारे वर्ण उदा. ऋ, लृ, ङ, न, ण, ष, श, ज्ञ आणि क्ष यांचे उच्चार सर्रास चुकीचे, गंमतशीर केले जातात. ब-भ मध्ये किंवा त-थ या सर्व वर्णोच्चारांमध्ये आपण लीलया चुका करत असतो आणि याच वळणाने चुकीचे शिकत पिढ्या बाहेर पडतात. कारण वाचन, उच्चार यांकडे न दिलेले लक्ष. "इ-ई' मधील फरक न दाखविण्याचाच जणू चंग बांधला जातो.

भाषा प्रयोगशाळा त्यावरील उत्तम औषध आहे. उच्चार शिकणे, ते जतन करणे, ते पुनः पुनः ऐकणे व त्यांचा सराव करणे हे सारे भाषानामक प्रयोगशाळेतून आत्मसात करता येईल. किंवा या प्रयोगशाळेमार्फत खूप प्रयोग करून एखाद्या विद्यापीठास भाषेच्या प्रयोगशाळेतून जागतिक ओळख संपादन करता येते. उदा. सातपुडा पर्वतरांगाजवळील लोकवस्तीतील बोली, कोकणी प्रांतातील सागरतीरी राहणाऱ्या लोकांची बोली किंवा खास मराठवाडी, बीड, लातूर, नांदेड, औंढा भूप्रदेशातील विविध समाजबोली किंवा जळगावशेजारची अहिराणी तावडीबोली, विठ्ठल वाघांसारख्या कवीने वापरलेली वऱ्हाडी अशा अगणित बोलींचा वाङ्‌मयीन, भाषिक, सांस्कृतिक व सामाजिक संदर्भात अनुभवरूप अभ्यास जो प्रयोगशाळांतून होईल, तेवढा पुस्तके उत्पन्न करून होणार नाही. जतन दोन्हीमार्फत होईल; पण जिवंत अनुभव व प्रत्यक्षात भाषेसोबत ज्ञानसमृद्ध 'खेळणं' हे प्रयोगशाळेतूनच शक्‍य आहे. ध्वनी, उच्चार, व्याकरण, गेयता वा रोखठोकपणा, शब्द, वाक्‍य, ओळी यांची विशिष्ट फेक, मुलायमता वा कठोरता, आरोह-अवरोह आणि त्यातून साधणारा एकसंध प्रभाव विद्यार्थ्यांना शिकायला मिळताना दिसत नाही. भाषा प्रयोगशाळा हे त्यावरील नक्कीच उत्तर आहे.

ध्वनी या अत्यंत महत्त्वाच्या, पण अवाढव्य विषयाचा अभ्यास मराठी शिकणाऱ्या मुलांचा होतोच कुठे? उलट संगीत विषयात मात्र होतो. ध्वनीशास्र हे प्रयोगाशिवाय सुव्यवस्थित अवगत करणे अशक्‍य. महाराष्ट्रातील विद्यापीठे भाषा विभागांचा या संदर्भात सकारात्मक विचार करू शकतात. एकूण महाविद्यालयांना मात्र ही खर्चिक बाब झेपणे जरा अशक्‍य वाटते. तथापि, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात परदेशास्थित "अनुभव ट्रस्ट' (डॉ. मोहन कुलकर्णी) यांच्या निधीतून भारतातील सर्वश्रेष्ठ भाषा प्रयोगशाळा सुरू होऊ घातली आहे. येत्या नव्या वर्षाच्या आरंभीच ही प्रयोगशाळा उभी राहील. या प्रयोगशाळेचा उपयोग मराठवाडा, तसेच संपूर्ण राज्यालाही निर्धारित केलेल्या अटींच्या पूर्ततेसह करून घेता येईल. "लॅब' हा शब्द मराठी विषयासाठी आश्‍चर्याचा वाटतो. कारण "घोका आणि ओका' या सवयी आपण प्रधान मानल्या आणि भाषेतले ध्वनीसौंदर्य परित्यक्त ठेवले. उच्चारशास्र बाजूला काढून ठेवत भाषा शिकली जाते. छंद, वृत्त, अलंकार, मात्रा, गणवृत्ते यांनाही भातात दिसणाऱ्या खड्याप्रमाणे उचलून आपण बाजूला ठेवत आहोत.

भाषा रुक्षतेजवळच आपण नेऊन ठेवत आहोत. भाषा प्रयोगशाळा म्हणूनच बोली शिक्षणावरील व भाषा चिंतनावरील आनंदाची प्रत्यक्ष शिदोरी ठरू शकते. आमची अवघी विद्यापीठे भाषाप्रेमी जरूर आहेत. आमची सगळी विद्यापीठे बहुभाषा अध्ययनांच्या बाजूने काम करणारी आहेत. पण मराठीसाठी वा इतरही भाषांसाठी प्रयोगाचे सार ही विद्यापीठे समजून घेतील आणि भाषांच्या प्रयोगशाळांचा विचार सत्वर मनावर घेतील. ही तरुणपिढी सज्ज आहे. ती वाटेल तेवढे श्रम वेचायलाही तयार आहे. फक्त शास्र, कला म्हणून ध्वनींचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आतला 'आवाज' मात्र चटकन विद्यापीठांना ओळखता यायला हवा.

Web Title: effective steps for language study