‘हिटलर’ आणि ‘औरंगजेब’! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

आणीबाणीला ४३ वर्षे झाल्याच्या निमित्ताने भाजपने काँग्रेसच्या मानसिकतेवर टीका केली, तर अघोषित आणीबाणीचा उल्लेख करीत काँग्रेसने सरकारवर निशाणा साधला. यातून ज्याच्या त्याच्या चष्म्यातून इतिहासाची उजळणी होण्यापलीकडे काही झाले नाही.

आणीबाणीला ४३ वर्षे झाल्याच्या निमित्ताने भाजपने काँग्रेसच्या मानसिकतेवर टीका केली, तर अघोषित आणीबाणीचा उल्लेख करीत काँग्रेसने सरकारवर निशाणा साधला. यातून ज्याच्या त्याच्या चष्म्यातून इतिहासाची उजळणी होण्यापलीकडे काही झाले नाही.

दिवस आनंदाचा असो की दु:खद आठवणी घेऊन येणारा, त्याच्या स्मृती जागवण्याची पद्धत आहे आणि विशिष्ट टप्प्यावर म्हणजे २५, ५०, ६० वा ७५ अशा वर्षांत या आठवणी विशेषत्वाने जागवल्या जातात. तो पायंडा मोडून यंदा भारतीय जनता पक्षाने आणीबाणीच्या कटू आठवणी ४३ व्या वर्षांत मोठ्या गाजावाजा करून जागवल्या आणि हे आताच का घडले, असा प्रश्‍न अनेकांना पडला. खरे तर तीन वर्षांपूर्वी आणीबाणीला चार दशके झाली, तेव्हा त्या आठवणींचा जागर केला असता, तर ते एकवेळ समजले असते. मात्र, यंदा भाजपच्या नेत्यांनी ब्लॉग, पत्रकार परिषदा आदी माध्यमांतून त्या आठवणींना उजाळा दिला. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय राजधानीऐवजी, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीतील एका ‘जनसंवादा’च्या माध्यमातून हा दिवस काँग्रेसवर घणाघाती टीका करून जागवला. त्याचे नेमके कारण हे वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुका हेच आहे, याबद्दल शंका नसावी. मोदी यांना पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेऊन आता चार वर्षे लोटली आहेत. ‘पन्नास दिवसांत यंव करू, काँग्रेसला ६० वर्षे दिली, आम्हाला ६० महिने द्या,’ असा प्रचार २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने केला. त्या साठ महिन्यांपैकी ४८ महिने पूर्ण झाले आहेत. या काळात सरकारने काय काय केले, याचे डिंडीमही यंदा फार जोराने वाजवले गेले. तरीही नव्याने लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना, भाजपचा भर हा ‘आपण काय केले?’ यापेक्षा काँग्रेसच्या दुष्कर्मांचा पाढा वाचण्यावरच आहे, हे गेल्या वर्षभरात झालेल्या गुजरात व कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दिसून आले आहे. आणीबाणीचा जागर हे त्याच मार्गावरून टाकलेले आणखी एक पाऊल आहे.

इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये देशात लागू केलेली आणीबाणी हा आपल्या लोकशाहीच्या इतिहासातील निश्‍चितच काळा कालखंड आहे. आणीबाणी जारी होताच, जयप्रकाश नारायण यांच्यापासून मोरारजी देसाईंपर्यंत आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यापासून तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांना गजाआड केले गेले. अभिव्यक्‍ती स्वातंत्र्यावर गदा आणली गेली. मात्र, त्यानंतर दोनच वर्षांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने इंदिरा गांधी यांची एकाधिकारशाही उधळून लावली! नंतर इंदिरा गांधी यांनी त्याबद्दल माफी मागितली आणि जनतेनेही त्यांना माफ केल्याचा पुरावा १९८० मधील निवडणुकीत त्यांना मिळालेल्या दणदणीत विजयाने समोर आला! लोकशाही राज्यव्यवस्थेत व्यक्‍तीकेंद्रित राजवट ही एकप्रकारे हुकूमशाहीच असते आणि आणीबाणीत त्याचे जसे प्रत्यंतरही आले होते, तसेच मोदी यांच्या राजवटीतही वारंवार येत आहे. आणीबाणीप्रमाणेच आताही भीतीचे वातावरण आहे. तेव्हा संजय गांधी यांच्या युवक काँग्रेसच्या फौजा थैमान घालत होत्या, तर आता तथाकथित गोरक्षकांची दंडेली जागोजागी सुरू आहे आणि त्यात अनेकांचे बळी गेले आहेत. चित्रपटांवर आक्रमकपणे सेन्सॉरशिप लादली जात आहे आणि ‘एअर इंडिया’च्या विमानप्रवासात सामिष भोजन बंद करण्यात आले आहे. याचाच अर्थ आपण काय बघावे, काय खावे, काय वाचावे आणि काय शिकावे, हे सरकार ठरवू पाहत आहे. या पार्श्‍वभूमीवर अरुण जेटली यांनी आपल्या ‘ब्लॉग’मध्ये इंदिरा गांधींची तुलना ही थेट हिटलरशी केल्यानंतर काँग्रेस गप्प बसणे शक्‍यच नव्हते! ‘आताची राजवट ही औरंगजेबाची आहे!’ अशा तिखट शब्दांत काँग्रेसने त्यांना प्रत्युत्तर दिले. या निमित्ताने ज्याच्या त्याच्या चष्म्यातून इतिहासाची उजळणी होण्यापलीकडे काही झाले नाही.

खरा प्रश्‍न हा देशातील तरुणांचा आहे. आजमितीला देशात तरुणांची संख्या ६० कोटींच्या घरात आहे आणि पुढच्या दोन वर्षांत आपला देश हा जगातील सर्वाधिक तरुणांचा झालेला असेल, असा ‘ब्लूमबर्ग’चा अहवाल आहे. बहुतांश तरुणाई ही आणीबाणीनंतर जन्मलेली आहे. त्यामुळे तिला त्या इतिहासात फारसे स्वारस्य नाही. त्यांचे प्रश्‍न वेगळे आहेत आणि त्यांच्या आशा-आकांक्षांना जागवण्याचे काम मोदी यांनीच चार वर्षांपूर्वीच्या प्रचारमोहिमेत केले आहे. त्यांना ‘अच्छे दिन!’ हवे आहेत आणि सुशेगाद जीवन जगायचे आहे. त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून केवळ राजकीय स्वार्थासाठी भाजप असो की काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सुरू केलेल्या, ‘कुणी हिटलर घ्या, कुणी औरंगजेब घ्या!’ या खेळात या तरुणाईला रस नाही, हे सर्वच राजकारण्यांनी लक्षात घेतलेले बरे!

Web Title: Emergency 43 year bjp congress and politcs