भाष्य : उद्योजकीय गरजा आणि अभ्यासक्रम

नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चर्चेत आल्यापासून अन् तत्पूर्वी देखील एक विषय सारखा चर्चेत असतो. आपले शाळा, महाविद्यालयातील अभ्यासक्रम कालबाह्य झाले आहेत.
Education
Educationsakal

- डॉ. विजय पांढरीपांडे

कोणताही अभ्यासक्रम यशस्वी व्हायचा असेल, त्याची उपयुक्तता सिद्ध व्हायची असेल, तर तो कालसुसंगत आणि उद्योजकीय गरजांची पूर्तता करणाराच पाहिजे. नेमके त्याकडेच अभ्यासक्रम बनवताना दुर्लक्ष होते आहे.

नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चर्चेत आल्यापासून अन् तत्पूर्वी देखील एक विषय सारखा चर्चेत असतो. आपले शाळा, महाविद्यालयातील अभ्यासक्रम कालबाह्य झाले आहेत. नोकरी देणारे उद्योजक तक्रार करतात की, आजचे पदवीधर नोकरीतल्या, उद्योगातल्या आजच्या गरजांसाठी उपयुक्त नाहीत. त्यांना नीट प्रशिक्षण मिळत नाही.

आजकाल महाविद्यालय, विद्यापीठाचा दर्जा ठरविताना गुणवत्तेचा एक निकष किती विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले, किती वार्षिक पॅकेज मिळाले, यावरून ठरतो. हा निकष योग्य आहे का? विद्यार्थ्यांना चांगली नोकरी मिळवून देणे ही विद्यापीठाची जबाबदारी आहे का? आपले अभ्यासक्रम उद्योजकांना विचारून ठरवायचे का? हा खरा प्रश्न आहे.

आपण हे योग्य आहे असे गृहीत धरले, तर आपण नेमक्या कोणत्या उद्योगासाठी पूरक शिक्षण घेतलेले (रेडिमेड) विद्यार्थी तयार करणे अपेक्षित आहे? वेगाने बदलणाऱ्या विज्ञान-तंत्रज्ञानमुळे उद्योग, सेवा क्षेत्र, कामाचे म्हणजे नोकरीचे स्वरूप आरपार बदलले आहे. ते बदलतच आहे. त्या वेगाने वरचेवर अभ्यासक्रम बदलणे, म्हणजेच परीक्षेचे स्वरूप बदलणे शक्य तरी आहे का?

आज अवती-भवतीच्या उद्योग क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता, त्यातील वैविध्य लक्षात घेता अभ्यासक्रम नेमका कोणत्या उद्योगाला पूरक ठरवायचा? टीसीएस, इन्फोसिस, गुगल, फेसबुक, एल अँड टी, डीआरडीओ, इस्रो, खासगी बँका, विमाकंपन्या, वित्तकंपन्या किंवा मार्केटिंग कंपन्या इत्यादी. या सर्वांच्या कामाचे स्वरूप सर्वथा भिन्न आहे. मग अभ्यासक्रम कोणाला अनुरूप ठरेल असा तयार करायचा?

दुसरे असे की, कोणती नोकरी स्वीकारायची याचे पूर्ण स्वातंत्र्य विद्यार्थ्याला आहे. ते महाविद्यालय किंवा विद्यापीठ ठरवत नाही. आपल्या असे लक्षात येईल की, ९० टक्के विद्यार्थी त्यांना जे शिकवले त्याचा शिक्षणेतर आयुष्यात मुळीच प्रत्यक्ष उपयोग करीत नाहीत. देशातल्या नाणावलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच ‘आयआयटी’तून केमिकल इंजिनियरिंगची पदवी घेतलेला विद्यार्थी संगणक क्षेत्रात काम करतो.

मोठ्या कंपन्यांच्या उभारणीमध्ये योगदान देतो. अन् शेवटी हे सारे सोडून मराठीत मोठमोठे सुलभ ग्रंथ लिहितो! चेतन भगत मेकॅनिकल इंजिनिअर. पण त्याने काम केले ते परदेशी बँकेत. नंतर चक्क कादंबरी, चित्रपटलेखनाचे क्षेत्र निवडले.

‘आयआयटी’तून शिक्षण घेतलेलेच काही विद्यार्थी चक्क आध्यात्मिक गुरू, व्यक्तिमत्व विकासाचे मार्गदर्शक झाले आहेत. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. महाविद्यालय सोडताच नोकरीत, व्यवहारात आपण जे काही ज्ञान, विज्ञान वापरतो ते सारे अभ्यासक्रमाबाहेरचे असते. मग उद्योगाच्या गरजा ओळखून अभ्यासक्रम तयार करा, हा अट्टाहास कशासाठी?

कोणत्याही विषयाचा अभ्यासक्रम सर्वंकष असावा लागतो. त्या-त्या विषयाबाबतच्या मूलभूत संकल्पना, त्याची व्यावहारिक उपयोगिता म्हणजेच ॲपलिकेशन, व्यावहारिक उदाहरण, समस्यांचे आकलन, विश्लेषण, मिळून काम करण्याचे धोरण, नैतिक मूल्यांचे महत्त्व, स्वतंत्र, तार्किक विचार करण्याची पद्धत, क्षमता हे सारे शिकवायचे असते.

प्रत्येक प्रश्नाचे एकच एक ठोकळेबाज उत्तर या भ्रमातून बाहेर पडून, एकापेक्षा जास्त उत्तरांची संभाव्यता तपासायची असते. त्या अनेक उत्तरातून सर्व दृष्टीने उत्तम, कमी खर्चिक, सोपे उत्तर कोणते, हा शोध व्यवहारात जास्त महत्त्वाचा असतो.

सातत्याने होणाऱ्या बदलांचा सामना करणे, ते बदल स्वीकारून, समजून, त्यानुसार आवश्यक नवे ज्ञान संपादन करणे (learning as well as unlearning) हे सारे गरजेचे असते. जेव्हा उद्योजक म्हणतात की, तुमचे अभ्यासक्रम कालबाह्य आहेत, तेव्हा त्यांना अभ्यासक्रमात, शिकवण्याच्या पद्धतीत बदल अपेक्षित आहेत, हे लक्षात घ्यावे.

योग्य मूल्यमापन हवे

अभ्यासक्रम तयार करताना काय, किती, कसे, केव्हा शिकवायचे, अन् शिकविले त्याचे उचित मूल्यमापन कसे करायचे यावर जास्त विचार व्हायला हवा. पूर्वी पाढे पाठ असण्याला महत्त्व होते. इतिहासातील सनावळ्यांना महत्त्व होते. गणितात लॉगटेबलचा वापर, त्रिकोणमिती आणि त्याचा वापर करून गणिते सोडवणे, गणितातील इतर संकल्पना समजून घेऊन त्यांचा वापर करणे याला महत्त्व होते. आता त्याच्या पलीकडे अन्य ज्ञानाचीदेखील गरज भासते.

समीकरणे सोडवायला संगणक आहेत. हव्या त्या माहितीसाठी इंटरनेट, गुगल आहेच. पूर्वी बँकेत पैसे जमा करणे, पैसे काढणे यासाठी रजिस्टर वापरायचे. आता सॉफ्टवेअर आले आहेत. त्यामुळे हे काम स्वतःचे स्वतः करता येते. एटीएमवर जाऊन पैसे काढता किंवा भरता येतात. त्याशिवायही तेथे इतर सुविधा उपलब्ध आहेत. बऱ्यापैकी व्यवहार ऑनलाईन होताहेत.

आपण पूर्वी जी गणिते सोडवण्यासाठी वेळ घालवीत होतो, ते काम आता संगणक करेल. हा फावला वेळ आपण दुसऱ्या अभ्यासासाठी वापरू शकतो. नवे वाचन करू शकतो. आता फळ्यावर प्रमेये सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही. जे पुस्तकात आहे, तेच कशाला शिकवायचे? त्या ऐवजी त्या प्रमेयामागची संकल्पना, त्याचा व्यवहारात उपयोग कसा करायचा, हे सोदाहरण समजावून सांगा. ते जास्त फायद्याचे ठरेल.

स्वातंत्र्य शिक्षकाचे

अभ्यासक्रम हा शिक्षकाने केवळ मार्गदर्शक म्हणून वापरायचा असतो. तो अभ्यासक्रम किती रंजक, उपयोजित पद्धतीने शिकवायचा याचे पूर्ण स्वातंत्र्य शिक्षकाला असते. तथापि, आपण ते वापरत नाही. आपले शिकवणे आगळे वेगळे, ‘आऊट ऑफ बॉक्स’ व्हायला हवे. हा प्रयत्न प्रत्येक प्राध्यापकाने करायला हवा. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. वेळ द्यावा लागतो. अभ्यासक्रमाच्या बाह्यरचनेपेक्षा शिकविण्याची-शिकण्याची (teaching-learning process) पद्धत जास्त महत्त्वाची.

ती भविष्याचा वेध घेणारी, उद्याच्या गरजा ओळखून त्यानुसार सातत्याने बदलाला सामोरे जाणारी अशी हवी. आपल्या प्रयोगशाळांतून जे विज्ञानाचे प्रयोग शिकवतात ते जुने, वापरण्यात येणारी यंत्रे जुनी. आता अनेक क्षेत्रात स्वयंचलीतीकरण झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक दवाखान्यातील यंत्रणा पाहिली की हे लक्षात येते. इंटरनेटमुळे सेवा क्षेत्र पुरते बदलले आहे. हे बदल शिकण्यात, शिकविण्यात म्हणजेच अभ्यासक्रमात प्रतिबिंबित होणे गरजेचे आहे.

आपल्याकडील अभ्यासमंडळे, विद्वत परिषदा, सिनेट या प्राधिकरणांचे या महत्त्वपूर्ण बाबींकडे पुरते दुर्लक्ष होते. याचे कारण या सर्व क्षेत्रात प्रचंड प्रमाणात वैचारिक दारिद्र्य आहे. तिथे राजकीय घुसखोरी आहे. तिथला अजेंडा वेगळाच आहे. त्यामुळे रोग एकीकडे उपचार दुसरीकडे अशी अवस्था आहे.

विद्यापीठातील संशोधन, पीएच.डी.ची गरज, त्यातून वाढलेला भ्रष्टाचार यामुळे त्या पदवीची निरर्थकता लक्षात येते. त्यातील कमतरता दूर करण्याची गरज आहे. थोडक्यात, अभ्यासक्रमाकडे बघण्याचा सध्याचा दृष्टिकोन आधी बदलण्याची आवश्‍यकता आहे. त्यातील महत्त्वाचे बदल पूर्णपणे अंमलात कसे येतील, हे पाहायला हवे.

(लेखक निवृत्त कुलगुरू आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com