ढिंग टांग : शेतकरी संवाद!

ब्रिटिश नंदी
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

माझा ‘आदित्य संवाद’ प्रोग्राम बघितलात का टीव्हीवर? त्यात मी विद्यार्थ्यांशी संवाद करतो! 

उधोजीसाहेब : (पेंगुळलेल्या अवस्थेत फोन उचलत) जय महाराष्ट्र... कोण बोलतंय?

चि. विक्रमादित्य : (सळसळत्या उत्साहात) हाय देअर बॅब्स! हल्लोऽऽ... ऐकू येतंय का?

उधोजीसाहेब : (चिंतातुर आवाजात) कुठे आहेस? आम्ही केव्हापासून तुझ्या फोनची वाट पाहातोय!!

चि. विक्रमादित्य : (आनंदाने) कॉलिंग फ्रॉम लातूर!

उधोजीसाहेब : छान छान! आम्ही आतुर, तुम्ही लातूर!!

चि. विक्रमादित्य : (नाक मुरडत) विनोद वाईट होता!!

उधोजीसाहेब : (विषय बदलत) असू दे, असू दे! कशी चाललीये जनआशीर्वाद यात्रा?

चि. विक्रमादित्य : (खुशीत) ऑसम!!

उधोजीसाहेब : किती आशीर्वाद मिळवलेस?

चि. विक्रमादित्य : (घोषणा करत) चिक्‍कार! माझा ‘आदित्य संवाद’ प्रोग्राम बघितलात का टीव्हीवर? त्यात मी विद्यार्थ्यांशी संवाद करतो! 

उधोजीसाहेब : (प्रोत्साहन देत) व्वा! शाब्बास!! त्याच धर्तीवर मी आपल्या भावजींना सांगितलंय ‘माउली संवाद’ करायला! त्याच फॉरमॅटमध्ये पुढे ‘शिवसंवाद’ करायला मी स्वत: निघायचं म्हणतोय!

चि. विक्रमादित्य : हा कुठला नवा संवाद?

उधोजीसाहेब : (समजावून सांगत) अरे, तुझा ‘आदित्य संवाद’, आमचा ‘शिवसंवाद’, भावजींचा ‘माउली संवाद’! ह्याच धर्तीवर मावळ संवाद, लोकल संवाद, बेस्ट संवाद, कोकण संवाद असे वेगवेगळे संवादांचे कार्यक्रम घ्यायचा बेत आहे! पण आपला पहिला संवादवीर तूच!!  

चि. विक्रमादित्य : (अभिमानाने) आपल्या कुळातला मी पहिला शेतकरी झालोय बॅब्स! 

उधोजीसाहेब : (चकित होत) आपल्या कुळात कोणीही शेतकरी नाही बाळा! ‘भुईमूग वर लागतात की खाली, हेही आपल्याला माहीत नाही,’ अशी टीका होते आपल्यावर!!

चि. विक्रमादित्य : आज मी शेतात कुळव चालवला!

उधोजीसाहेब : (गोंधळून) कुळव म्हंजे ट्रॅक्‍टर का?

चि. विक्रमादित्य : अंऽऽऽ...बेसिकली ट्रॅक्‍टरच! ‘सर्जा-राजा’ नावाचे दोन बैल होते!! इट वॉज फन!!

उधोजीसाहेब : (संयमानं) या उठाठेवी करण्यात वेळ घालवलास तर जनतेचे आशीर्वाद कधी घेणार?

चि. विक्रमादित्य : (सपशेल दुर्लक्ष करत) ...नळेगावच्या रस्त्यावर आम्ही एका शेतकऱ्याला शेतात काम करताना पाहिलं! त्याला म्हटलं ‘काय चाललंय!’ तो म्हणाला, ‘हिर्र हिर्र’!!

उधोजीसाहेब : (हादरून) आँ?

चि. विक्रमादित्य : (किस्सा सांगत) अहो, तो बैलांना म्हणत होता! माझ्या प्रश्‍नावर उत्तर देताना म्हणाला, ‘‘पत्ते खेळतोय, दिसत नाही का?’’ भयंकर विनोदी होता तो शेतकरी!! हाहा!! 

उधोजीसाहेब : (विचारात पडून) रागावला असेल!

चि. विक्रमादित्य : (किस्सा पुढे सांगत) त्या शेतकऱ्याला म्हटलं की बी पेरल्यानंतर वांगी किती दिवसांत येतील?

उधोजीसाहेब : (अंदाज बांधत) साधारणपणे तीन-चार आठवड्यांत  यावीत!

चि. विक्रमादित्य : (टाळी वाजवत) नाय.. नो... नेव्हर..! कध्धीच येत नाहीत! तो म्हणाला, ‘सोयाबीन किंवा तूर पेरल्यावर वांगी येत नाहीत!!’

उधोजीसाहेब : तू ताबडतोब मुंबईला परत ये कसा!!

चि. विक्रमादित्य : (फोनवर किस्सा सांगत) मी कुळव चालवला! चाड्यावर मूठ धरली!!

उधोजीसाहेब : कॅय? चाड्यावर मूठ धरली म्हंजे कॅय?

चि. विक्रमादित्य : (हतबुद्ध होत) तुम्हाला पेरणी माहीत आहे ना? वखर म्हणजे काय? सांगा!

उधोजीसाहेब : (संयम सुटून) तू फोन ठेव बरं!

चि. विक्रमादित्य : (चेव चढत) चाड्यावर मूठ धरून पेरणी करायची असते!

उधोजीसाहेब : (कुतूहलानं) तू कसली केलीस पेरणी?

चि. विक्रमादित्य : (डोळे मिचकावत) ओळखा पाहू? अहो, साखरपेरणी!!
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Interaction Aditya Thackeray