"गन कल्चर'चे बळी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

अमेरिकेत "गन कल्चर' विषवल्लीसारखे फोफावल्याने तेथे रोज किमान एका तरी ठिकाणी बेछूट गोळीबार करून निष्पाप लोकांचे प्राण घेण्याचे प्रकार घडत असतात. अशा घटनांमधून धडा घेत अनेक शाळांमध्ये अचानक गोळीबाराच्या किंवा आपत्तीजनक घटना घडल्यास काय करावे, याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. पण, प्रश्‍न मूळ दुखण्यावर इलाज करण्याचा आहे

भौतिक सुखसाधनांची रेलचेल झाली म्हणजे सुख लाभू शकते; पण मानसिक स्वास्थ्य मिळतेच, असे छातीठोकपणे सांगता येत नाही. सुखलोलुपता, स्वच्छंदीपणा, स्वैराचार हा अमेरिकी जीवनाचा स्थायीभाव आहे. तेथे भौतिक साधने अतोनात असली आणि त्यासाठी पैसा मोजण्याची तयारी असली, तरी मनःशांती मिळतेच, असे नाही. त्यातून जगण्याचा निर्माण होणारा गुंता मानसिक अनारोग्याला आमंत्रण देतो. त्याचाच प्रत्यय शाळेतील गोळीबाराच्या ताज्या घटनेतून पुन्हा आला आहे. क्रौर्याचे आणि मानसिक विकृतीचे दर्शन घडविणाऱ्या या घटनेत अनेक निरपराधांना हकनाक जीव गमवावा लागला.

फ्लोरिडा प्रांतातील पार्कलॅंड येथील शाळेत निकोलस क्रूझ या 19 वर्षीय माजी विद्यार्थ्याने घुसखोरी करून बेछूट गोळीबार केला. त्यात सतरावर निष्पाप मुलांसह शिक्षक मृत्यमुखी पडले. अशा प्रत्येक घटनेनंतर अमेरिकेतील "गन कल्चर'ची चर्चा होते. पण, त्यावर ठोस उपाय योजले जात नसल्याने ठराविक काळानंतर त्यांची पुनरावृत्ती होत राहते. अमेरिकेत "गन कल्चर' विषवल्लीसारखे फोफावल्याने तेथे रोज किमान एका तरी ठिकाणी बेछूट गोळीबार करून निष्पाप लोकांचे प्राण घेण्याचे प्रकार घडत असतात. अशा घटनांमधून धडा घेत अनेक शाळांमध्ये अचानक गोळीबाराच्या किंवा आपत्तीजनक घटना घडल्यास काय करावे, याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. पण, प्रश्‍न मूळ दुखण्यावर इलाज करण्याचा आहे. तो होत नाही, तोपर्यंत अशा घटना टाळता येणे अवघड आहे.

अमेरिकेतील याबाबतची आकडेवारी पाहिली, तर अशा कृत्यामध्ये तरुणांचा भरणा अधिक असल्याचे दिसते. वर्णभेद, कामाच्या घटणाऱ्या संधी, बेरोजगारी यांच्यापासून ते सामाजिक आणि मानसिक स्वास्थ्य हरवणे अशा अनेक कारणांतून सार्वजनिक ठिकाणी गोळीबाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. बराक ओबामा अध्यक्ष असताना या घटनांनी अस्वस्थ होऊन त्यांनी बंदूक परवान्यांबाबत कडक निर्बंध लादण्यासाठी आणि बंदुका घेऊन सार्वजनिक ठिकाणी वावरण्याला प्रतिबंध करण्यासाठी कडक कायदे करण्याची पावले उचलली होती. पण, अमेरिकेतील "गन लॉबी'ने त्याला विरोध केला आणि ओबामा यांचे प्रयत्न तोकडे पडले. झोपेच्या गोळ्यांपासून ते नैराश्‍यावर मात करणाऱ्या औषधांपर्यंत, मानसोपचारतज्ज्ञांपासून ते ताणतणाव व्यवस्थापनाकरिता कन्सल्टन्सी देणाऱ्यांपर्यंत सर्वांची प्रचंड मोठी बाजारपेठ असलेल्या अमेरिकेचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे, हेच खरे. हे मानसिक स्वास्थ्य सुधारल्याशिवाय तेथील अशा घटनांना पायबंद बसणार नाही.

Web Title: florida shooting