मित्र आणि मैत्री (परिमळ)

डॉ. दत्ता कोहिनकर
सोमवार, 19 डिसेंबर 2016

रविवारचा दिवस होता. निवांतपणे सोफ्यावर वर्तमानपत्र  वाचत बसलो होतो. तेवढ्यात रेडिओवर एक सुंदर गाणं लागलं.

‘‘कुछ भी नही रहता दुनिया में लोगो, रह जाती है दोस्ती।
जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी’’

रविवारचा दिवस होता. निवांतपणे सोफ्यावर वर्तमानपत्र  वाचत बसलो होतो. तेवढ्यात रेडिओवर एक सुंदर गाणं लागलं.

‘‘कुछ भी नही रहता दुनिया में लोगो, रह जाती है दोस्ती।
जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी’’

खरोखर मित्रांशिवाय आयुष्य जगणं कठीण असतं. आदित्य व शंकर दोघे जिवलग मित्र. आदित्यचे सामाजिक प्रस्थ व आर्थिक स्थिती चांगली असल्याने व गर्विष्ठ स्वभावामुळे तो नेहमी शंकरवर हुकमत गाजवायचा. बघता बघता दिवस बदलले. शंकर वडिलोपार्जित व्यवहारामुळे कोट्यधीश झाला. त्याचेही सामाजिक प्रस्थ वाढले. एकदा आदित्य व शंकरमध्ये जोरात भांडण झाले. आदित्यने रागाच्या भरात शंकरला अपशब्द वापरून त्याचा मोबाईल नंबर डिलिट केला. काही दिवसांनंतर आदित्यला एक मेसेज आला, ‘‘मित्रा, कसा आहेस, तब्येतीची काळजी घेत जा.’’ आदित्यकडे फोन नंबर नसल्याने त्याने रिप्लाय केला. i am fine. who are you?  शंकरला हा मेसेज मिळताच त्याने आदित्यला फोन केला व तो म्हणला, ‘काय रे तुला how चे स्पेलिंगपण नीट लिहिता येत नाही काय? चुकून how च्या ऐवजी who टाईप झाले बघ.’ आदित्य आजारी आहे हे कळताच शंकर त्याच्या घरी गेला. त्याने त्याला घट्ट मिठी मारून म्हटले, ‘आय लव्ह यू मित्रा.’ खरोखर मित्रांनो, खरे मित्र तोडता येत नाहीत. ते चुकीच्या मेसेजचादेखील चांगलाच अर्थ काढतात. प्रत्येकाला आपल्या भावभावना, सुख-दुःख व्यक्त करण्यासाठी मित्र-मैत्रिणींची आवश्‍यकता असते.  आजच्या वाढत्या गर्दीत, स्पर्धेत माणूस आत्मकेंद्री झाल्यामुळे मैत्रीला ग्रहण लागले आहे. आत्मकेंद्री होऊन मनुष्य अधिकाराने, पदाने, संपत्तीने मोठा होत आहे, पण जिवाभावाचे दोस्त आज मात्र दूर जात आहेत. वरवरच्या गाठीभेटी, हसणे-खिदळणे, खोटी स्तुती, खाणे-पिणे अशा तोंडदेखल्या उपक्रमाला ऊत आला आहे. ‘ओठात एक आणि पोटात एक’ या म्हणीचा अर्थ प्रत्यक्षात दिसून येत आहे.  जिवाला जीव देणारे दोस्त आज राहिलेले नाहीत. आज दोस्त एकमेकांच्या गाडीवर, खांद्यावर हात ठेवून असतात; पण त्यांची मने मात्र एकमेकांपासून दूर असतात. जवळचा मित्र आपल्यापेक्षा वरचढ झाला, त्याची सर्वांगीण प्रगती दिसू लागली तर मनात आकस ठेवणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. मित्राकडून जास्तीत जास्त कसा लाभ मिळवता येईल, या विचाराने मैत्रीला संकुचित केले आहे. 

एकेकाळी एकमेकांवर प्रेमाची उधळण करणारे मित्र प्रसंगी एकमेकांच्या जिवावर उठल्याचे दिसून येत आहे. ज्ञानेश्‍वर माउली म्हणाले होते, ‘‘भूता परस्परे पडो मैत्र जिवांचे.’’ भगवान गौतम बुद्धांनी मनाचा मूळ स्वभाव सांगताना अनंत मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा यावर भर दिला होता. निरागस मैत्री मनाला प्रसन्न करते, मन मोकळे करते. खऱ्या मैत्रीत कसलेच गणित व जमाखर्च नसतो. ती लाभाविण केली जाणारी प्रीत असते. खरी मैत्री सरळ व पारदर्शक असते. जेथे लाचारी नसते, तेथेच घट्ट मैत्रीचे अधिष्ठान लाभते. मित्राशिवाय जगण्याची वेळ शत्रूवरही येऊ नये.

Web Title: Friends and Friendship