esakal | ढिंग टांग : ...ये दोस्ती!
sakal

बोलून बातमी शोधा

friendship

प्रिय मित्र मा. उधोजीसाहेब यांसी, सध्या महाजनादेश यात्रेत बिझी असल्याने पत्र लिहून ही कडकडून शाब्दिक मिठी मारत आहे. -हॅप्पी फ्रेंडशिप डे!! खरे तर फ्रेंडशिप डेला आपण एकत्र भेटावे.

ढिंग टांग : ...ये दोस्ती!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

प्रिय मित्र मा. उधोजीसाहेब यांसी, सध्या महाजनादेश यात्रेत बिझी असल्याने पत्र लिहून ही कडकडून शाब्दिक मिठी मारत आहे. -हॅप्पी फ्रेंडशिप डे!! खरे तर फ्रेंडशिप डेला आपण एकत्र भेटावे. साइडकार लावलेल्या बाइकवर बसून ‘ये दोसती हम नहींऽऽ तोडेंगे...तोडेंगेऽऽएऽऽए दम्मगर तेरासाऽऽथना छोडेंगे...’ हे गाणे म्हणावे, असे माझे स्वप्न होते. आपली ‘जय’ आणि ‘वीरू’ सारखीच अजरामर जोडी आहे. (फक्‍त वीरू कोण आणि जय कोण एवढेच ठरायचे आहे!!) लोक आपल्या दोस्तीची मिसाल देतात. म्हणतात, दोस्ती असावी तर नाना-साहेबांसारखी. अनेकदा वाटते की आपल्या मित्राला कडकडून प्रत्यक्ष भेटावे. (तुमच्या घरी) भरपूर जेवावे!! गप्पागोष्टी करून स्नेह वाढवावा... पण दुर्दैवाने जालिम राजकारणामुळे हे शक्‍य होत नाही. तरीही संधी मिळेल तेव्हा मी तुमच्या घरी येऊन पाहुणचार घेऊन जातो. तुम्ही मात्र आमच्या घरी एकदाही आला नाहीत. महाजनादेशयात्रा आटोपून मी परतलो की तुम्ही आमच्या घरी (चहासाठी) या! मजा येईल!!

सध्या मी प्रवासात असल्याने भेटीचा योग नाही. मी तिथे नसताना दुसरे कोणीही मैत्रीचा पैगाम घेऊन आला तर कृपया त्यास दारात उभे करू नये. माझ्या अनुपस्थितीत काही डोमकावळे टाळ्याबिळ्या द्यायला येण्याची शक्‍यता आहे, म्हणून सांगतो आहे!! आता आपल्याला कुणाच्या टाळ्याबिळ्या नकोत. आता ‘आपले ठरले आहे’. हो की नाही? 

सध्या मी यात्रा कंपनी घेऊन नागपूरच्या आसपासच हिंडतो आहे. लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तुमचे जानी दोस्त तुमच्यासोबत कां नाहीत? असे लोक विचारताहेत. ‘येतील येतील’ असे मी त्यांना सांगून बोळवतो आहे. आणखी काय लिहू? बाकी भेटी अंती. आपला सच्चा मित्र. नाना फ.

* * *
नाना -
जय महाराष्ट्र. तुमची चिठ्‌ठी ऊर्फ शाब्दिक मिठी मिळाली. त्या फ्रेंडशिपच्या शुभेच्छा होत्या, हे मागाहून कळाले! एकतर हल्ली मला टाळी मागायला कुणी आले तरी अंगावर काटा येतो. तुम्ही थेट मिठ्याबिठ्यांची भाषा करताय!! हे असले काही आपल्याला मानवत नाही. सध्या तुमची महाजनादेश यात्रा चालू आहे, असे मला सांगण्यात आले. आमच्या विविध यात्रा अधूनमधून चालूच असतात. आम्हाला त्यात नवे असे काही नाही. मुळात मला स्वत:ला यात्राबित्रा फारश्‍या पसंत नाहीत. जे बांदऱ्यात बसून करता येते, त्यासाठी आलेलिंबू चोखत बसमधून प्रवास कशाला करायचा? पण तुमचे चालू द्यात. माझे इतरही काही मुद्‌दे आहेत. ते खालीलप्रमाणे :

एक : ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’ हे गाणे म्हणायला आमची हरकत नाही, पण मी साइडकारमध्ये बसणार नाही, हे आधीच सांगून ठेवतो! साइडकारसारखे बेभरवशाचे दुसरे काहीही नाही. साइडकारमध्ये बसणाऱ्या माणसाला रस्त्यातील खड्ड्यांचा त्रास अधिक होतो, हे तुम्हाला माहीत आहे का?   

दुसरे : फ्रेंडशिपच्या शुभेच्छा देण्यासाठी सरकारी कागद वापरण्याचे कारण काय? हा सत्तेचा दुरुपयोग आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे.

तीन : टाळ्याबिळ्यांच्या भानगडीत आपण पडत नाही, हे वर सांगितलेच. काळजी नसावी! पण ह्याचा अर्थ आम्ही तुम्हाला शाब्दिक मिठ्या मारू, असाही होत नाही!!

चार : तुम्ही आमच्या घरी अनेकदा येऊन पाहुणचार झोडून गेलात, हे खरे आहे. पण तुम्ही आम्हाला कधी बोलावलेत?

पाच : ‘आपलं ठरलंय’, ‘आपलं ठरलंय’ असे किती दिवस घोकायचे, आपले ठरले आहे? कळवावे.

...एकंदरित फ्रेंडशिप दिनाच्या तुम्हां सर्वांना सशर्त शुभेच्छा. उधोजीसाहेब.

loading image