‘नाम’मुद्रा : संशोधनातील शलाका

पुण्यातील जुई केसकर या शालेय विद्यार्थिनीने जे संशोधन केले, त्यावर पुरस्काराची मोहोर उमटली आहे. केंद्र सरकारने सोमवारी (ता. २४ जानेवारी) जुई केसकरला ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारा’ने गौरविले.
Jui Keskar
Jui KeskarSakal
Summary

पुण्यातील जुई केसकर या शालेय विद्यार्थिनीने जे संशोधन केले, त्यावर पुरस्काराची मोहोर उमटली आहे. केंद्र सरकारने सोमवारी (ता. २४ जानेवारी) जुई केसकरला ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारा’ने गौरविले.

पुण्यातील जुई केसकर या शालेय विद्यार्थिनीने जे संशोधन केले, त्यावर पुरस्काराची मोहोर उमटली आहे. केंद्र सरकारने सोमवारी (ता. २४ जानेवारी) जुई केसकरला ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारा’ने गौरविले. ‘नवसंशोधन श्रेणी’त जुईची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तिने पार्किन्सन अर्थात कंपवात मोजमापाबाबतचे नवीन यंत्र विकसित केले आहे. या यंत्राला तिने ‘जे ट्रेमर ३ जी’ असे नाव दिले आहे. हे यंत्र कंपवातग्रस्तांना त्यातून बरे होण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याने त्याचे मोल मोठे आहे. हातमोजेसदृश असलेले हे उपकरण आहे. या उपकरणाच्या साह्याने कोणत्या कंपवातग्रस्त रुग्णांना औषधांचा डोस किती प्रमाणात द्यावा, याबाबतचा सल्ला मेंदूविकार तज्ज्ञांना मिळू शकणार आहे. यामुळे केसकर ही वैद्यक शास्त्रातील बाल संशोधक ठरली आहे. या संशोधनाचा फायदा हा कंपवातग्रस्त रुग्ण आणि त्यावर उपचार करणाऱ्या मेंदूविकार तज्ज्ञ अशा दोघांनाही होणार आहे.

जुईने हे उपकरण विकसित केले तेव्हा तिचे वय होते अवघे १५ वर्षे. खेळण्या-बागडण्याच्या आणि शालेय शिक्षण घेण्याच्या या वयात तिने जो पराक्रम केला, त्याने सारेच स्तिमित झाले. हे नावीन्यपूर्ण असे संशोधन आहे. जुई बाणेर भागात राहते. या भागातील ‘आर्किड स्कूल’मध्ये दहावीच्या वर्गात ती सध्या शिकते आहे. आई-वडील, दोन काका (चुलते), काकू, चुलत बहीण-भाऊ असे तिचे सर्व एकत्रित कुटुंब. आई मीरा या गृहिणी तर, वडील अभिजित हे जर्मनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनिअर आहेत. जुईच्या मोठ्या काकांना पार्किन्सन (कंपवात) आजार आहे. त्यामुळे लहानपणापासूनच ती तिच्या काकांना या आजारांमुळे होणाऱ्या वेदना पाहात होती. यातूनच तिच्या मनात या समस्येसंबंधी काहीतरी केले पाहिजे, असे विचार येऊ लागले.

केवळ इच्छा करून ती थांबली नाही. खरोखरच तिने काम सुरू केले आणि तिला त्यात यशही मिळाले. भविष्यात हे संशोधन केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील कंपवातग्रस्तांना दिलासा देण्यास उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आहे. विज्ञान आणि गणित हे दोन विषय पूर्वीपासून जुईच्या आवडीचे आहेत. सध्या ती शाळा करत करतच ‘बीट द ट्रेनर’ हा उपक्रम राबविते. या उपक्रमाच्या माध्यमातून पार्किन्सन आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना मार्गदर्शन व सल्ला देण्याचे कामही ती करते. तिच्या कामाची दखल यापूर्वीही घेतली गेली. तिला यापूर्वी दोन आंतरराष्ट्रीय तर, तीन राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत.

पार्किन्सन (कंपवात) हा मज्जासंस्था आणि मेंदूशी संबंधित असलेला आजार आहे. कंपवाताचा आजार झालेली कोणतीही व्यक्ती ही स्थिर बसलेली असताना किंवा उभी राहिली असल्यास तिचे धड (शरीर) पुढे झुकलेले दिसते, असे ब्रिटिश वैद्यक जेम्स पार्किन्सन्स यांनी १८१७ मध्ये पहिल्यांदा लोकांच्या नजरेस आणून दिले. त्यामुळे तेव्हापासून या आजाराला ‘पार्किन्सन’ या नावाने ओळखले जाऊ लागले. कंपवातग्रस्तांना दिलासा देण्यासाठी संशोधन करणे, हे जुईने लहानपणापासून बाळगलेले स्वप्न होते. ते तिने प्रत्यक्षात आणले. पण आता तिची खरी कसोटी पुढे असून या उपकरणाची शास्त्रीयदृष्ट्या तपासणी, त्याचा प्रत्यक्षात वापर आणि या यंत्राच्या निर्मितीसाठी येणारा खर्च कमी करणे, ही तीन प्रमुख आव्हाने तिच्यापुढे असणार आहेत. ही आव्हाने पेलण्यासाठी तिला नुकत्याच मिळालेल्या सन्मानाने नक्कीच हुरूप येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com