स्वातंत्र्यलढ्यातील तेजस्वी अध्याय

हिंदू-मुस्लिम समाजात चांगले संबंध असावेत, यासाठी जिवाची बाजी लावून प्रयत्न करणाऱ्या गणेश शंकर विद्यार्थी यांची २५ मार्च १९३१ ला कानपूर येथे हिंदू-मुस्लिम समाजातील दंगल थांबविण्याच्या प्रयत्न करत असताना हत्या झाली.
Ganesh Shankar Vidyarthi who tried with his life for good relations between the Hindu-Muslim community
Ganesh Shankar Vidyarthi who tried with his life for good relations between the Hindu-Muslim community Sakal

गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारकांचे मित्र असलेले गणेश शंकर विद्यार्थी महान संपादकही होते. येत्या सोमवारी (ता.२५) त्यांचा ९३ वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण.

- जतिन देसाई

हिंदू-मुस्लिम समाजात चांगले संबंध असावेत, यासाठी जिवाची बाजी लावून प्रयत्न करणाऱ्या गणेश शंकर विद्यार्थी यांची २५ मार्च १९३१ ला कानपूर येथे हिंदू-मुस्लिम समाजातील दंगल थांबविण्याच्या प्रयत्न करत असताना हत्या झाली.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते नेते होते. त्यांचे क्रांतिकारकांशी अतिशय जवळचे संबंध होते. भगतसिंग तर गणेश शंकर विद्यार्थी यांचे मित्रच होते. भगतसिंग यांनी विद्यार्थी यांच्या ‘प्रताप’ नावाच्या वर्तमानपत्रात काही महिने कामही केले होते.

२५ मार्चच्या दोन दिवस आधी २३ मार्च १९३१ ला ब्रिटिश सरकारने भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना लाहोर येथे फाशी दिली. लोक संतप्त होऊन रस्त्यावर उतरले होते. अशा वेळेस ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिम समाजात दंगल घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू केले. लोकांचे लक्ष विचलित करणे हा ब्रिटिशांचा कावा होता. कानपूरमध्ये दंगल उसळली. त्यात चारशेहून अधिक लोक मारले गेले.

काँग्रेसचे महत्त्वाचे अधिवेशन कराची येथे २६ ते ३१ मार्चला होणार होते. आपल्या शहरात दंगल होत असल्यामुळे विद्यार्थी यांनी कराचीला जाण्याचं टाळलं. काही पोलीस अधिकाऱ्यांनीदेखील त्यांना कानपूरला थांबण्याची विनंती केली होती.

शहरात ते एकमेव असे नेते होते की ज्यांच्यावर दोन्ही समाजातील लोकांचा विश्वास होता. तेच दंगली थांबवू शकतील, असं त्या अधिकाऱ्यांना वाटत होतं. दंगल थांबवण्यासाठी ते एकटे हिंदू व मुस्लिम वस्तीत जाऊन लोकांना समजून सांगायचे. त्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळतं होत. मात्र त्यात त्यांची हत्या झाली. दोन दिवसानंतर त्यांचा मृतदेह सापडला.

शेतकरी चळवळीला बळ

विद्यार्थी यांचा जन्म १८९०मध्ये झाला होता. सुरुवातीला ते शिक्षक होते. १९१३ मध्ये ते कानपूरला आले आणि ‘प्रताप’ नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. या माध्यमातून ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध वातावरण निर्माण करीत होते.

चंपारण येथील नीळ कामगारांचा जमीनदारांकडून होणाऱ्या शोषणाबद्दल अनेक लेख ‘प्रताप’मध्ये प्रसिद्ध झाले. चार जानेवारी १९१५ ला ‘चंपारणातील अंधार’ नावाचा लेख प्रकाशित करण्यात आला होता. चंपारण येथे नीळची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमुळे आणि ‘प्रताप’मध्ये प्रकाशित झालेल्या लेखांमुळे १९१७ मध्ये महात्मा गांधींनी चंपारणला जाऊन तिथल्या शेतकऱ्यांचं आंदोलन उभं केलं.

गांधीजींचा तो पहिला सत्याग्रह होता आणि त्यात त्यांना यश मिळालं. याशिवाय मेवाड येथील बिजोलिया संस्थानातील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सातत्याने बातम्या व लेख प्रसिद्ध करून त्या आंदोलनाला राष्ट्रीय स्तरावर आणण्याचं कामदेखील गणेश शंकर विद्यार्थी यांनी केलं होतं.

ते स्वतः शेतकऱ्यांच्या चळवळीत सामील होते. १९२०च्या सुरुवातीला अवध येथे मदरी पासी यांच्या नेतृत्वाखालील `इका’ आंदोलन सुरू झालं. भगतसिंग आणि पासी भेटलेही होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना क्रांतिकारी किती महत्त्व देत होते, हे यातून स्पष्ट होतं. हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. या आंदोलकांच्या पाठीशी विद्यार्थी उभे होते. याशिवाय कामगार चळवळीतही त्यांचे योगदान होते.

बहादूर संपादक

गणेश शंकर विद्यार्थी बहादूर संपादक होते. त्यांचा एक पाय तुरुंगात आणि दुसरा त्यांच्या लहानश्या कार्यालयात असायचा. त्यांची पत्रकारिता जवळपास २० वर्षाची होती. त्यात पाचवेळा त्यांना तुरुंगवास सहन करावा लागला. त्यातल्या तीन वेळा ‘आक्षेपार्ह’ मजकुरांबद्दल, तर दोन वेळा ब्रिटिशविरोधी भूमिकेबद्दल.

त्यांनी पोलिसांचा लाठीमारही सहन केला. भगतसिंगांनी काही काळ ‘प्रताप’मध्ये उपसंपादक म्हणूनही काम केलं होतं. बलवंत सिंग या नावाने भगतसिंग, चंद्रशेखर आझाद हेदेखील ‘प्रताप’ वृत्तपत्रात लिखाण करत असत.

जातीय दंगली व धर्माचे राजकारण करणाऱ्यांच्या विरोधात विद्यार्थी यांची लेखणी नेहमी चालत होती. सामाजिक आणि धार्मिक सलोख्यासाठी त्यांनी ‘हिंदुस्तानी बिरादरी’ नावाची संघटना स्थापन केली होती.

‘प्रताप’चे सहसंपादक बालकृष्ण शर्मा यांना एक एप्रिल १९३१ ला पाठवलेल्या पत्रात महात्मा गांधींनी म्हटलं होतं, ‘‘मला प्रचंड दुःख झालं असलं तरी त्यांच्या ‘शानदार’ मृत्यूसाठी मी शोक-संदेश देणार नाही. त्यांचं पवित्र रक्त कधीतरी हिंदू आणि मुसलमानांना एकत्र आणणार.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com