रस के भरे तोरे... "स्वर'!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

रस के भरे तोरे नैन ही त्यांची अशीच एक अवीट ठुमरी. त्यामुळेच त्यांच्या निधनानंतर आज त्यात थोडा बदल करून "रस के भरे तोरे स्वर...' असं म्हणावेसे वाटते. त्यांच्या "बरसन लागी बदरिया' या कजरीची पुढची ओळ आहे "सुनी उजडी कजरिया... हाय राम...' गिरिजादेवींच्या निधनाने अवघे संगीतक्षेत्रच उजाड झाल्यासारखे वाटत आहे, हेच खरे

गिरिजादेवींची आई ही त्यांची सर्वांत मोठी "फॅन' होती आणि तसे दस्तुरखुद्द गिरिजादेवींनीच सांगून ठेवले आहे. मात्र बालपणातील गिरिजेने गाणे शिकण्यास मोठा विरोध करणारीही त्यांची आईच होती. अर्थात, त्या काळात कुलीन घरातील महिलांनी गाण्याचे कार्यक्रम करणे, हे समाजाला मान्यच नव्हते. त्यामुळे 1930 आणि 40 या दशकांत केवळ छोट्या गिरिजेच्या गाण्यास केवळ जमीनदार पिताश्री रामदेव राय वगळता घरातील सगळ्यांचाच विरोध होता. मात्र गिरिजा अवघी चार वर्षांची असतानाच, तिच्या गळ्यात अद्‌भुत स्वर आहे, हे तिच्या वडिलांनी ओळखले आणि त्यांच्याच प्रोत्साहनामुळे अवघ्या चार वर्षांची गिरिजा प्रख्यात सारंगीवादक सरजूप्रसाद मिश्रा यांच्याकडून संगीताचे धडे घेऊ लागली. मात्र ती गाण्याबजावण्यात आपला वेळ का फुकट घालत आहे, हे तिच्या आईला कळतच नसे आणि त्यामुळे घरात अशांतताही माजत असे.

अखेरीस वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षीच त्यांचे लग्न लावून देण्यात आले. सुदैवाने त्यांचे पती हे कलेचे मोठे जाणकार होते आणि त्यामुळेच त्यांचे गाणे बहरू शकले आणि 1949 मध्ये, म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षी अलाहाबाद आकाशवाणी केंद्रावरून केलेल्या पहिल्या कार्यक्रमानंतर पुढची पाच-सात दशके त्यांनी भारतीय संगीत क्षेत्रावर राज्य करून "ठुमरीसम्राज्ञी' असा किताबही पटकवला. त्यामुळेच वयाच्या 88व्या वर्षी निधन झाल्यावर साऱ्याच संगीत क्षेत्राने "आज ठुमरी मूक झाली!' अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्‍त केल्या. मात्र गिरिजादेवींची गायकी ही केवळी ठुमरीपुरतीच मर्यादित नव्हती. ठुमरी असो की टप्पा आणि ख्याल गायकी असो की कजरी, संगीताच्या मैदानात मग गाणे कोणतेही असो त्या सारख्याच सहजतेने विहार करत.

बनारसहून त्यापुढे कोलकात्याला आल्या आणि तेथील संगीतक्षेत्रावर त्यांनी आपली अमीट अशी मोहोर उमटविली. त्यामुळेच आज बाबूल मोरा, झुला धीरे से झुलावो, रात हमने देख ली या आणि अशाच अनेक ठुमऱ्या त्यांनी अजरामर करून ठेवल्या आहेत. रस के भरे तोरे नैन ही त्यांची अशीच एक अवीट ठुमरी. त्यामुळेच त्यांच्या निधनानंतर आज त्यात थोडा बदल करून "रस के भरे तोरे स्वर...' असं म्हणावेसे वाटते. त्यांच्या "बरसन लागी बदरिया' या कजरीची पुढची ओळ आहे "सुनी उजडी कजरिया... हाय राम...' गिरिजादेवींच्या निधनाने अवघे संगीतक्षेत्रच उजाड झाल्यासारखे वाटत आहे, हेच खरे.

Web Title: girija devi