Kargil Win
Kargil WinSakal

आठवणी कारगिल संघर्षाच्या

पाकिस्तानवर विजय मिळवण्याचा ‘कारगिल विजय दिवस’ आज (ता. २६ जुलै) आहे. त्या युद्धात रणभूमीवर आघाडीवर असलेल्या ज्येष्ठ सेनाधिकाऱ्यांशी बोलून त्या कालखंडाची व त्या विजयगाथेची ही नोंद.

- गोपाल आवटी

पाकिस्तानवर विजय मिळवण्याचा ‘कारगिल विजय दिवस’ आज (ता. २६ जुलै) आहे. त्या युद्धात रणभूमीवर आघाडीवर असलेल्या ज्येष्ठ सेनाधिकाऱ्यांशी बोलून त्या कालखंडाची व त्या विजयगाथेची ही नोंद.

कारगिल युद्धात महिनाभरात विजयाचा ध्वज फडकवताना ५२७ सैनिकांना प्राण गमवावे लागले होते. या संघर्षात भारतीय संरक्षणाची बाजू सांभाळणाऱ्या काही अधिकाऱ्यांपैकी पुण्यात बरेच जण स्थायिक आहेत. त्यांना भेटून काही आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न आकाशवाणीसाठी मुलाखतीतून केला.

कर्नल जयंत पेंडसे हे शौर्य कामगिरीसाठी सेना पदक मिळवणारे त्यापैकीच एक. ‘आमच्या पालनपुर युनिटला कारगिल काळात तातडीने काश्मीर सीमेवर पाठवले गेले. मी ऑपरेशन विजयमध्ये नियोजन स्तरावर होतो. दुर्गम असलेल्या या भागात शत्रू वरच्या बाजूला होता. त्यामुळे त्यांनी साधे दगड फेकले तरी आमचं नुकसान होत होतं.

माझ्या बटालियनने शत्रूच्या मागे जाऊन रसद रोखण्याचे नियोजन केले. पुंछमध्ये त्याची जोरदार तालीमही झाली. शत्रू सैन्याला माघारी फिरता येणार नाही, याचेही नियोजन झाले. सुदैवाने त्याचवेळी राजपुताना रायफल्स (२) ला कारगिलवर यशस्वी चढाई करण्यात यश आलं. आमच्या पालनपुर युनिटला हेलिकॉप्टरमधून सौरभ कालिया आणि विक्रम बत्रा या दोन वीरांचे मृतदेह पाठवावे लागले.

आम्ही अन्य अधिकारी परिस्थिती नियंत्रणात ठेवायला थांबलो होतो. माझ्या पत्नीने आणि इतर महिलांनी या गंभीर प्रसंगी धैर्याने सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. शहीद जवानांच्या आई-वडील आणि अन्य नातेवाईकांना सांत्वनपूर्वक सांभाळणं फार आव्हानात्मक होतं. आज हे सांगताना भावविवश झाल्यासारखं होतंय.’

ब्रिगेडियर अजित आपटे सांगतात - "या युद्धात माझ्या काही तुकड्या गेल्या. १९९ एम. एम. बोफोर्सने कमाल केली. मी ब्रिगेड कमांड करीत असताना हाताखाली सहा रेजिमेंट होत्या. पंतप्रधानांनी युद्ध जाहीर केलं असतं तर आमचे उद्दिष्ट होतं की सरळ आत घुसायचं. पायदळाने खूप छान काम केलं. संघर्ष अवघ्या एका महिन्यात संपुष्टात आला.मेजर जनरल विजय चौगुले हे आणखी एक कारगिल योद्धा!

पॅरॅशूट रेजिमेंटच्या बटालियन क्रमांक ६ मध्ये काम करताना त्यांचा मोहिमांत सहभाग होता. ते सांगतात- ‘‘ऑपरेशन विजयमध्ये असण्याचा सार्थ अभिमान आहे. सतरा हजार, चौदा हजार फूट उंचीवरून शत्रूवर करडी नजर ठेवणे महत्त्वाचे काम आहे. खूप खडतर अशा या मोहिमेत वर २० माणसं चढताना खाली ७०-८० लोक असायचे. शस्त्रास्त्र पुरवठा, दारूगोळा पुरवठा यात उत्कृष्ट टीमवर्क दाखवलं गेलं.

‘ऑपरेशन विजय’ दरम्यान एकदा वरून शंभर ते दीडशे खेचरे सोडलेली होती. त्याचा मालक युद्धस्थितीमुळे पळून गेला होता. कठीण प्रसंगात कामी येतील म्हणून त्यातीलच पंधरा ते वीस खेचर मी आमच्याकडील ट्रकवर चढवली. उंचीवरच्या एरियात सर्व युनिट सेटअप करताना सामान ने आणसाठी त्यांचा खूप उपयोग झाला. खूपदा या गोष्टी युद्धात महत्त्वाच्या ठरतात.

सर्वोच्च बलिदानासाठी सदैव तयार राहण्याची गरज लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना महत्त्वाची वाटते. निंभोरकरांनी कारगिल युद्ध कामगिरीबद्दल ‘ऑपरेशन विजय मेडल’ मिळविले. त्यांच्या कार्यकाळातील तिन्ही सर्जिकल स्ट्राईक्स ‘पीओके’मध्ये यशस्वी झाले. उरी हल्ल्याचा चोख बदला घेतला गेला. श्रीलंका आणि काश्मीरमधील पॅरॅशूट कमांडो बटालियनमध्ये महत्त्वाचा सहभाग असणारे कंट्रोल कर्नल गजानन काळे २०१४ मध्ये निवृत्त झाले.

कारगिलनंतर आणि एकूणच सेवाकाळात सैनिकांच्या सर्वांगीण प्रशिक्षणात बदल झाले, असे त्यांना जाणवते. शरद देशपांडे हेही पुण्याचे. कारगिल युद्धात ‘पश्चिम कमान’मधून वॉर स्ट्रॅटेजीमध्ये त्यांचा सहभाग होता. वेगवेगळ्या चार युद्ध युद्धनौकांवर एरोनॉटिकल इंजिनिअर म्हणून अफाट काम केलेले देशपांडे पुढे ‘आय.एन.एस.विक्रांत’वर ते प्रमुख झाले.

कारगिल समयी सर्व इस्टर्न प्लीट पश्चिमेकडे आणली गेली. नौदलाची सर्व वायुशक्ती पश्चिमेकडून शत्रुराष्ट्राच्या पुढ्यात आणली गेली. तिचे शिफ्टिंग आणि सज्जता याची जबाबदारी देशपांडे यांच्यावर होती. ते म्हणाले, ‘‘युद्धनौकांसाठी लागणारे ७० ते ८० टक्के सामग्री आता देशातच तयार होते. कोणावर अवलंबून न राहावं लागणं, हे युद्धातील गरज असते. एअरमार्शल भूषण गोखले कारगिल घडताना महत्त्वाच्या हवाई तळाचे कमोडोर होते.

देशप्रेमाची भावना हीच संरक्षणाच्या मुळाशी एक मोठी शक्ती आहे, असं त्यांना वाटतं. ग्वाल्हेरच्या एअरबेसवर विंग कमांडर म्हणून काम करणारे गिरीश अट्रावलकर रडार, संदेश वहनातले जाणकार. ते सांगतात की, ग्वाल्हेरसारख्या ठिकाणी बाहेरच्या ग्राउंडचं तपमान ५५ अंशांपर्यंत वाढलेले असतं आणि केबिनमध्ये २६-२७. अशा फरकात शरीर आणि निर्णयशक्ती सांभाळायची असते.’

(लेखक आकाशवाणीचे निवृत्त संचालक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com