हिरव्यागार कोस्टारिकाची किमया

हिरव्यागार कोस्टारिकाची किमया

जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यात एका आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी कोलंबियाच्या बोगाटा या राजधानीच्या शहरात माझं जाणं होणार होतं. उशिराचं आमंत्रण, ट्रान्झिट व्हिसाची समस्या आणि अन्य काही लाल फितीय कारणांमुळे आमचं जाणं बारगळलं. मात्र, अभ्यास भरपूर झाला. कोलंबियाचा अभ्यास करता करता माझी नजर नकाशावरील कोस्टारिका या ठिपक्‍याएवढ्या देशावर गेली. येथील लोकसंख्या अवघी ४८,५७,२७४. आपल्याकडील मोठ्या शहरांइतकी. या देशाचं राष्ट्रीय स्थूल उत्पन्न टी. सी. एस.सारख्या कंपन्यांपेक्षाही कमी. या देशाविषयी आकर्षण वाटण्याची अनेक कारणं आहेत. पहिलं कारण, या देशाला सैन्यदल नाही. त्यामुळे संरक्षण मंत्रालय नाही. बोफोर्ससारखी प्रकरणं नाहीत. राष्ट्रीय म्हणजेच लोकांच्या पैशांचा अपव्यय नाही. एक-दोन नागरी युद्धांचा आणि अंतर्गत कलहांचा अनुभव घेतल्यानंतर या देशानं सैन्यदल विसर्जित करण्याचा निर्णय १९४९ मध्ये घेतला होता. गेल्या ६८ वर्षांत या देशाला या क्रांतिकारी निर्णयाचा फेरविचार करावा लागला नाही.

हा देश स्थिर सरकारांसाठी ओळखला जातो. आजूबाजूच्या राष्ट्रांत अनेक उलथापालथ होऊनही, हा देश घेतलेल्या निर्णयावर ठाम आहे. जगात आत्यंतिक शांत, विकसित आणि उद्योगस्नेही म्हणून या देशाची गणना होते. या देशात शिक्षण आणि आरोग्य या दोन्हीही गोष्टी त्यांच्या नागरिकांना मोफत आहेत, हे दुसरं कारण. हा देश त्यांच्या सकल उत्पादनाच्या ६.९ टक्के खर्च शिक्षणासाठी गुंतवतो. शिक्षणावरच्या खर्चाची जागतिक सरासरी ४.४ टक्के एवढी आहे. आपला देश फक्त २.७ टक्के एवढा खर्च शिक्षणावर करतो. सर्वांत महत्त्वाचं आणि अखेरचं कारण म्हणजे या देशात ९० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऊर्जा ही सौर, पवन, भूऔष्णिक, जैविक इंधन यासारख्या अक्षय, चिरस्थायी स्रोतांपासून संपादित केली जाते. २०२१ पर्यंत हा देश स्वत:ला १०० टक्के कार्बन उत्सर्जनापासून मुक्त करणार आहे. तसं त्यांचं राष्ट्रीय उद्दिष्टही आहे. येथील राष्ट्राध्यक्ष कार्लोस अल्वार्दो हे फक्त ३८ वर्षांचे असून, पूर्वी पत्रकारिता करायचे. चांगले अभ्यासक आणि लेखक म्हणूनही त्यांची ओळख आहे. कोस्टारिका या स्पॅनिश शब्दाचा अर्थच मुळी श्रीमंत किनारपट्टी असा आहे. 

कोस्टारिका हा पृथ्वीतलावरील अनेक हिरव्यागार देशांपैकी एक आहे. गेल्या वर्षी एकूण ३६५ दिवसांपैकी ३०० दिवस त्यांची ऊर्जा जनित्रे-सयंत्रे पुनर्निर्मित ऊर्जेवरच धडधडली होती. जलविद्युत, पवन आणि सौरऊर्जेबरोबरच भूऔष्णिक ऊर्जासंपादनात हा देश जागतिक नेतृत्व करणारा ठरणार आहे.

साप्रंत काळात ९८.६ टक्के अक्षय ऊर्जा वापरण्यापर्यंत मजल गाठलेला हा देश पुढच्या वर्षी १०० टक्‍क्‍यांवर नक्कीच पोचेल. हरितगृह वायूच्या उत्सर्जनावरही त्यांनी बऱ्यापैकी नियंत्रण आणलेलं आहे. कार्लोस अल्वार्दो यांनी जेव्हा राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली तेव्हाच त्यांनी दोन दशकांत कोस्टारिकाची गंगाजळी ‘झिरो कार्बन’ची असण्याचा संकल्प केला होता. २०२१ पर्यंत वाहतूक क्षेत्रात खनिज तेलांचा वापर शून्यावर आणण्याच्या दृष्टीनंही त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. तसे कोस्टारिकाचे कार मार्केट हे दरवर्षी २५ टक्‍क्‍यांनी वाढत आहे. तरीही, त्यांनी देशांतर्गंत आणि सीमान्त भागात पेट्रोल-डिझेल शून्य उपलब्धेवर आणून विदेशी व्यापार संकटात आणला आहे. मात्र, त्याची त्यांना पर्वा नाही. कोस्टारिकामध्ये नागरिक; उद्योग संस्था आणि शासन या तिन्ही घटकांत ‘झिरो कार्बन इकॉनॉमी’विषयी एकवाक्‍यता आहे. त्यांच्या धोरणात आणि व्यवहारात सुसंवाद आणि समन्वय आहे.

दावोस असो वा मॉटेरिअल सगळ्याच वैश्विक परिषदांमध्ये कोस्टारिका झळाळून दिसत आहे. कोस्टारिकाच्या राष्ट्रीय विकास आराखड्यात कार्बन उत्सर्जनाची मात्रा शून्यावर आणणे, हे अनस्यूत आहे. त्यासाठी गतवर्षापासून त्यांनी इलेक्ट्रीक वाहनांवरचे कर कमी केले आहेत. शासनाची स्वयंसेवी संस्थांसोबत उत्तम भागीदारी असून ते नागरिकांना, मच्छीमारांना चिरस्थायी ऊर्जावापराबाबत नियमित मार्गदर्शन करीत आहेत. खनिज तेलाच्या वापरबंदीची घोषणा करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष हायड्रोजन इंधनाच्या गाडीतून जायला विसरले नव्हते. चिरस्थायी पर्यावरणीय मानकांचं पूर्णत: पालन करणारा हा देश जागतिक क्रमवारीत ४२व्या स्थानावर आहे. अमेरिका खंडात तिसऱ्या क्रमांकावरील आहे. ‘हॅपी प्लॅनेट इंडेक्‍स’च्या जागतिक सूचीमध्ये या देशाचं नाव दोनदा गौरवान्वीत झालं होतं. एकेकाळचा कॉफी, तंबाखू, साखर आणि कोको निर्यात करणारा हा देश २०व्या शतकात कॉफीमुळे श्रीमंत झाला होता.

अनेक औषधनिर्माण कंपन्या असणाऱ्या या देशात मोठ-मोठ्या विदेशी कंपन्यांची ‘कॉर्पोरेट’ ऑफिसेससुद्धा आहेत. नवीन आर्थिक धोरणाच्या उलथापालथीला सामोरे जाऊन आज हा देश ‘इको-टुरिझ’मध्ये अग्रणी ठरत आहे. विद्यमान भारत सरकार आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था २०३० पर्यंत विजेवर आणू इच्छिते. आपला देश चारचाकी वाहनांसाठी जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. दुचाकी वाहनांबाबत आपण जगात दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहोत. आपण ऊर्जा आयात करण्यात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहोत. ‘क्रूड ऑईल’ या एकट्याच इंधनावरील आपला महिन्याचा खर्च १२ अब्ज डॉलर एवढा आहे. जगातल्या आत्यंतिक १५ प्रदूषित शहरांपैकी १३ शहरं आपल्याच भारतातील आहेत. कोस्टारिका देशाच्या विकासाच्या पाऊलखुणा मोजताना आपल्या देशातील अनेक विसंगती प्रकर्षानं जाणवतात. नैसर्गिक साधनसंपत्तीबाबत, सर्व प्रकारच्या चिरस्थायी ऊर्जासाधनांबाबत आपण श्रीमंतच आहोत. त्याच वेळेला राष्ट्रीय बाणा नसलेले आपण कर्मदरिद्री आहोत, हे दु:खही तितकंच खुपणारं आणि दुखावणारं आहे.

(लेखक राजस्थान केंद्रीय विद्यापीठ, अजमेर येथे समाजकार्य विषयाचे सहयोगी प्राध्यापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com