सर्च-रिसर्च : कोरोना संसर्ग व भिन्न प्रतिकारशक्ती

CoronaVirus
CoronaVirus

सध्याच्या कोरोना साथीत सर्वांना चक्रावणारी एक गोष्ट म्हणजे कोरोनाचे लक्षणरहित रुग्ण किंवा व्यक्ती. त्यामुळे चटकन संसर्ग होणारे आणि कोरोनाचा यशस्वी मुकाबला करणारे असे दोन वर्ग दिसून येतात. त्यांच्यातील  फरक त्यांच्या प्रतिकार यंत्रणेतील मूलभूत वेगळेपण दर्शवतो. ज्यांच्यामधे संसर्ग होतो तो शरीरातील कुठल्या प्रथिनांमुळे होतो हे माहीत असल्याने लक्षणरहित व्यक्तिमधील अशा प्रथिनांच्या रचना कशा वेगळ्या असतात आणि त्यातील फरक कुठे असतो हे जाणून घेणे कोरोनाचा भावी मुकाबला करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

प्रथिनांच्या निर्मितीमागे त्यासाठी लागणारी जनुके म्हणजेच डीएनएचा विशिष्ट क्रम असतो. त्यातील सूक्ष्म फरक अत्याधुनिक डीएनए तंत्राने (मेटॅजेनॉमिक्स) ओळखता येतो. प्रथिन निर्मितीची जनुके ढोबळ मानाने प्रत्येक व्यक्तीत समान असली तरी त्यांच्या रचनेत बारीक फरक असतो. जनुकांचे हे बहुरूपत्व (पॉलिमॉर्फिझम) जाणून घेणे महत्त्वाचे. जनुकातील फरक जाणून घेण्याच्या दृष्टीने ‘एसीई२’ रिसेप्टर मधील डीएनए क्रमामधील फरक सर्वांत महत्त्वाचा. हा रिसेप्टर श्वसन संस्था, फुप्फुसे, रक्ताभिसरण संस्था, पाचक संस्था तसेच यकृत व मूत्रपिंडासारख्या अवयवातही असल्यामुळे तो कोरोनाच्या सर्वांगीण प्रवेशाला कारणीभूत ठरतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘एसीई२’ रिसेप्टर खेरीज पेशी आवरणातील काही प्रोटिएज त्यात ‘टीएमपीआरएसएस२’ प्रथिन आणि फ्युरिन यांचा समावेश आहे. ही एन्झाइम्स कोरोना विषाणूचा पेशीतील प्रवेश सोपा करतात. श्वेत रक्तपेशीवरील ए, बी आणि सी प्रतिजनांना विषाणू संलग्न होऊ शकतो म्हणून त्यातील फरकही महत्त्वाचा. डीएनए क्रमाच्या यादीत ‘डीएसटीएन’ ‘सीएफएल१’ ‘सीएफएल२’ ही जनुकेही तपासली जाणार आहेत. कोरोना रुग्णांचे डीएनए नमुने मोठ्या प्रमाणावर संग्रहित केले जात असल्याने हॉस्पिटल आणि संशोधन संस्था जेनॉमिक्सच्या संशोधनात सहभागी होत आहेत. इन्स्टिट्यूट फॉर मॉलेक्युलर मेडिसीन फिनलंडचे संशोधक मार्क डाली आणि अॅन्द्रिया गन्ना यांनी यात पुढाकार घेऊन सहकारी संशोधन संस्थांशी संपर्क साधला आहे. या सहकाराचा उद्देश मानवी जनुकांवर संशोधन करणाऱ्या संस्थांनी गोळा केलेली डीएनए क्रमाची माहिती जतन करणे आणि ती इतरांना उपलब्ध करून देणे हा आहे. या संस्थेबरोबर फिनलंडचीच फिनजेन ही कंपनीही साथ देत आहे. 

फिनलंडनंतर आइसलॅँडच्या ‘डिकोड जेनेटिक्स’ कंपनीचा सहभाग आहे. तसेच ग्रीक शासनाने ‘कोविड-१९ जीआर’ योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला आहे. यात ३५०० कोरोना रुग्णांचा पूर्ण डीएनए क्रम, कोरोना विषाणूचा डीएनए क्रम आणि प्रतिकार संस्थेतील जनुकांचा एकत्रित अभ्यास केला जाणार आहे. अमेरिकेच्या हार्वर्ड विस इन्स्टिट्यूटने सर्व समावेशक संशोधन करण्याचे योजले आहे. त्यात रुग्णाच्या ‘जिनोम’ची, त्याबरोबर त्याच्या पचन संस्थेतील सूक्ष्म जीवांच्या ‘जिनोम्स’ची  आणि बरोबरीने कोरोनाच्या ‘जिनोम’ची एकत्र सांगड घालायची योजना आखली आहे. काही कोरोना रुग्णात केवळ पचन संस्थेच्या बिघाडाचीच लक्षणे असतात. त्या दृष्टीने सूक्ष्म जिवांच्या ‘जिनोम्स’ची पाहणी महत्त्वाची ठरणार आहे.

‘एसीई२’ रिसेप्टरचा खास अभ्यास अमेरिकेच्या मेडजिनोम आणि भारतातील सायन्स रिसर्च फाउंडेशनतर्फे होत आहे. तीन लाख कोरोना रुग्णांच्या केवळ ‘एसीई२’ रिसेप्टरच्या जनुकाची आणि त्यातील अंतर्गत फरकांची नोंद त्यात घेण्यात आली आहे. कोरोना विषाणूला कमी आकर्षणाने जोडणारे आणि तीव्रतेने जोडणारे असे त्यांचे वर्गीकरण करण्यात आले. या प्रथिनांची अंतर्गत रचना जाणून समरचनेचे रेणू औषध म्हणून कामाला येतात का? हे पाहणे पुढच्या टप्प्यात होणार आहे. कोरोनाच्या दीर्घकाळ चालणाऱ्या साथीतील रुग्णांचे डीएनए नमुने, समकालीन आरोग्य नोंदी, समांतर डीएनए क्रमाचे संशोधन असा अभूतपूर्व प्रयोग जागतिक मंचावर होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com