हवामानबदल : जग बदल टाळुनी हाव

World
World

गेल्या जानेवारीत ही लेखमाला सुरू केली, तेव्हा हवामानबदलाविरुद्धची जगाची झुंज फार काही आशादायक मार्गाने पुढे जाताना दिसत नव्हती. पॅरिसनंतरची माद्रिद शिखर परिषद संपूर्ण अपयशी ठरली होती (डिसेंबर २०१९). डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘पॅरिस करारा’तून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा केली होती (नोव्हेंबर २०१९). मराठी मनांना या घटनांच्या आणि एकूणच हवामानबदलाच्या रौद्रतेचा अंदाज आलेला नाही, हे वारंवार जाणवत होते. तिथेच या सदराची कल्पना मनात उमटली. मराठीत या विषयावर एक-दोन(च) मोठी, दर्जेदार पुस्तके आहेत; पण सोप्या भाषेत, संपूर्ण शास्त्रीय, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक गुंतागुंत नेमकेपणाने सांगणारा गोळीबंद मजकूर नाही, हे जाणवले होते. त्यातून हे पाक्षिक सदर सुरू झाले.

जागृती स्वागतार्ह
आज बरोबर एका वर्षाने हे सदर संपवताना, ज्यो बायडेन यांनी हवामानबदलाशी लढण्यासाठी आपली ताज्या दमाची टीम नुकतीच मैदानात उतरवली आहे आणि वाया घालवायला आपल्याकडे अजिबात वेळ नाही, ही जाणीव प्रकटरीत्या बोलून दाखवली आहे. कधी नव्हे ते आता दहातील सहा अमेरिकी नागरिक या बदलांबाबत धोक्‍याची घंटा मनात वाजलेले, त्याविषयी स्वारस्य असणारे आणि कृतिशील झाले आहेत. गेल्या पाच वर्षांत त्यांची संख्या दुप्पट झाली आहे. सर्वांत मोठे प्रदूषक असलेल्या राष्ट्राच्या नागरिकांमध्ये झालेली ही जागृती स्वागतार्ह आहे. आपणही पहिल्या पाच प्रदूषक राष्ट्रांमध्ये आहोतच की. पण, भारतात ८० ते ९० टक्के नागरिकांनी हा बदल समूळ नाकारला कधीच नाही; पण बहुतांश लोकांनी फार काही कृती त्याविरुद्ध केलेलीही नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आता भर जीवनशैलीवर 
अशा संभाव्य कृतीचे विकासनीतीविषयक आणि जीवनशैलीविषयक असे दोन कप्पे आपण गेल्या वर्षभरात पाहिले. निसर्गाने ‘कोरोनास्त्र’ सोडून या झुंजीत पृथ्वीला सावरण्यासाठी आणखी एक संधी देऊ केली आहे. हे सदर संपवताना आपण ही संधी सर्वोत्तम पद्धतीने कशी वापरू शकू, हे पाहता येईल. मोठ्या पातळीवर हे युद्ध आता बऱ्यापैकी गांभीर्याने खेळले जात आहे. जगभरातील पाचशे उद्योगसमूह उपलब्ध आणि नव्या सर्वोत्तम विज्ञानाचा वापर करून हवामानाच्या भल्याची ठरवलेली उद्दिष्टे पार पाडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. अनेक सरकारे हा बदल आटोक्‍यात ठेवण्यासाठी कार्यरत आहेत आणि या दोन स्तरांवर आम नागरिक फार कमी वेळा थेट कृती करू शकतो. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात ही झुंज उतरणे, ही काळाची गरज आहे. या सदराचा तो एक मुख्य हेतू होता.

आपला भर आता आपल्या जीवनशैलीवर हवा. मांसाहार (त्यातही गोमांस), हवाईप्रवास, जीवाश्‍म आधारित इंधनांचा वापर कमीत कमी ठेवणे, निसर्गाकडे अक्षम्य दुर्लक्ष करून अंगी भिनणारा विकासोन्माद संपूर्णपणे टाळणे, असे करीत असणारी कोणतीही शासनव्यवस्था, भले ती आपले अन्य काही गंड सुखावत असली तरी न निवडणे, हे तर केलेच पाहिजे. स्थानिक अन्नावर भर, कार्बन पदचिन्ह कमी ठेवणे, सतत अनावश्‍यक ‘सेल्फी’ आणि फोटो ऊठसूट पुढे न सरकवणे हेही अत्यंत आवश्‍यक ठरणार आहे. तंत्रज्ञान या सगळ्यांवर उपाय काढेलच, हा वृथा आत्मविश्वास त्यागून, उपयुक्त, समुचित तंत्रज्ञानाचा न्यूनतम वापर आता अनिवार्य आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रसिद्ध ओळी काहीशा बदलून म्हणूया - जग बदल टाळुनी हाव!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com