सर्च-रिसर्च :  रसायनांचे कोठार

सर्च-रिसर्च :  रसायनांचे कोठार

रिठ्याच्या बिया गरम पाण्यात टाकून ढवळल्यावर काहीसा साबणासारखा फेस होतो. कारण रिठ्याच्या साली मध्ये सॅपोनिन म्हणून ओळखली जाणारी रसायने आहेत. इंग्रजीत या बियांना ‘सोप-नट‘ म्हणतात. वनस्पतिशास्त्रात सॅपिडस ट्रायफॉलिएट्‌स (किंवा लॉरिफोलिएस, मुकोरोस्सी) म्हणतात. हा वृक्ष मूळचा दक्षिण भारतातला आहे पण उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि जम्मू-काश्‍मीरमध्येही दिसून येतो. त्याची उंची सुमारे १२ ते २० मीटर असते. याचे लाकूड पिवळसर मऊ आणि टिकाऊ असते.   

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सॅपोनिन वर्गीय रसायनामध्ये पाणी आणि तेल आकर्षित होईल, असे दोन्ही विरोधाभासी गुणधर्म आहेत. सॅपोनिन गुंतागुंतीचे रसायन आहे. त्यात टर्पिन किंवा स्टिरॉइडचे अस्फटिकी ग्लायकोसाइड असते. तसेच काही शर्करा पण असतात. याचा अर्थ सॅपोनिन जलाकर्षक आणि मेदाकर्षक आहे. रासायनिक भाषेत त्याला अँपिफिलिक म्हणतात. असे पदार्थ धनभारित आणि ऋणभारित धूळ किंवा तैलयुक्त कणांना आकर्षित करतात.    पाण्याला पृष्ठीय ताण, म्हणजे सरफेस टेन्शन असते. पण ‘सॅपोनिन‘मुळे हा तणाव नष्ट होतो आणि साबणाप्रमाणे फेस होतो. साहाजिकच रिठे एक सौम्य नैसर्गिक डिटर्जंट (निर्मलक) म्हणून उपयुक्त आहेत. रिठ्यामधील सॅपोनिने कधी कधी सोन्या-चांदीचे दागिने स्वच्छ करतात. रिठयांचा उपयोग तलम, लोकरीचे, रेशमी किंवा ठेवणीतले  कपडे धुण्यासाठी केला जातो. शिकेकाईच्या शेंगांमध्ये मध्ये देखील काहीसे वेगळ्या प्रकारचे सॅपोनिन असते. रिठे आणि शिकेकाई एकत्रित करून पाण्यात ढवळले की त्या फेसयुक्त द्रावणात काही धातू स्वच्छ करतात. रिठे आणि शिकेकाई गरम पाण्यात भिजवून किंवा उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास ते सौम्य पद्धतीने स्वच्छ होतात. साबण, टूथपेस्ट आणि काही श्‍यांपूच्या प्रकारात त्याचा वापर करतात. काचा आणि क्रोकरी अशा नैसर्गिक निर्मलकाने धुण्यासाठी रिठ्यांचा उपयोग करता येतो. रिठयांमध्ये नैसर्गिक रंग आहे. त्याने टसर सिल्क रंगवता येते. बूट पॉलिशसाठी पण हा रंग उत्तम आहे. रिठ्याचे कवच पाण्यात उकळून ते पाणी साठलेल्या पाण्यात टाकले तर डासांच्या अळ्या मरतात. या वनस्पतीमध्ये सॅपोनिनचे मुख्य तीन प्रकार, म्हणजे ओलियानेन, डेमॅरेन आणि टिरूकुलेन. यामुळे रिठ्याच्या झाडाला रसायनांचे कोठार म्हणायला हरकत नाही.  द्रवाचा पृष्ठीय तणाव कमी करण्यासाठी रिठ्यामधील रसायने उपयुक्त ठरलेली आहेत. अधिकाधिक खनिज-तेल निर्मिती करण्यासाठी हा गुणधर्म उपयोगी पडतो. या पद्धतीला ‘इन्हान्सड ऑइल रिकव्हरी म्हणतात‘. साहजिकच ‘सरफॅक्‍टटंट‘ म्हणून रिठ्याच्या झाडांचे महत्त्व वाढले आहे. रिठ्याच्या वनस्पतीमध्ये काही औषधी गुणधर्म असल्यामुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये त्याचा वापर केला जातो. त्वचारोगावर त्याचा उपयोग करतात. लघवी साफ होण्यासाठी डाययुरेटिक (मूत्रल) घटक त्यात आढळलेले आहेत. चिनी संशोधकांनी त्यात कर्करोगरोधक, जीवाणूरोधक, कीटकनाशक आणि वेदनाशामक घटक शोधून काढले आहेत. लखनौ येथे सीएसआयआरची ‘सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट‘ आहे. येथील संशोधकांनी रिठ्यामधून गर्भनिरोधक घटक अलग केला आहे. त्यापासून त्यांनी एक सुरक्षित संतती-प्रतिबंधक औषध ‘कॉनसॅप‘ विकसित केलेलं आहे. त्याचे काटेकोरपणे परीक्षण केल्यावर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांनी त्याला मान्यता दिली असून व्यावसायिक तत्वावर त्याची निर्मिती केली जाते. 

रसायनांचे भांडार असलेला रिठ्याचा वृक्ष आपल्याला सर्वत्र दिसत नाही. तो दऱ्याखोऱ्यात आणि जंगलात प्रामुख्याने दिसतो. कारण त्याचे बीज कठीण असल्याने जमिनीत सहजासहजी रुजत नाही. हे लक्षात घेऊन वाराणशी मधील बीएचयू (काशी) विद्यापीठातील संशोधकांनी ‘सोमॅटीक एम्ब्रियोजेनेसिस‘ हे तंत्र वापरून टेस्ट ट्यूब मध्ये याची शेकडो चिमुकली रोपं वाढवण्याचे यशस्वी प्रयोग केले आहेत. ऊती संवर्धनाच्या (टिशू कल्चरच्या) या तंत्रात कोवळ्या पानाच्या किंवा कळीच्या अत्यंत नाजूक पेशींची निवड करून त्या पेशी टेस्ट ट्यूब मध्ये अनुकूल वातावरणात वाढवल्या जातात. त्यासाठी विशिष्ट कर्बोदके आणि ग्लुटामाईन समाविष्ट केलेले द्रवरूप माध्यम वापरले जाते. टेस्ट ट्यूब मधील शेकडो रोपं प्रथम कुंडीत वाढवून नंतर शेतात रीतसर वाढवली जातात. यामुळे  वैशिष्टयपूर्ण रसायनांची निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रिठे मिळतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com