सर्च-रिसर्च : ‘उबदार’लशीचा मागोवा  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona-vaccine

लशीमार्फत आपल्या प्रतिकारशक्तीला कोविड-१९ विषाणूचा ‘परिचय’ करून दिला जातो. यामुळे त्या विषाणूचा संसर्ग एखाद्याला झाला तर त्याला जखडून टाकणारी यंत्रणा सज्ज असेल.

सर्च-रिसर्च : ‘उबदार’लशीचा मागोवा 

‘कोरोना’ची साथ आटोक्‍यात यावी म्हणून अनेक देशांमधील संशोधक लस तयार करत आहेत. लशीमार्फत आपल्या प्रतिकारशक्तीला कोविड-१९ विषाणूचा ‘परिचय’ करून दिला जातो. यामुळे त्या विषाणूचा संसर्ग एखाद्याला झाला तर त्याला जखडून टाकणारी यंत्रणा सज्ज असेल. लशीमुळे सक्षम प्रतिप्रथिने (अँटिबॉडीज्) आपल्या शरीरात तयार असतील. परिणामी, साथ शरीरात किंवा अन्यत्रही पसरणार नाही.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परदेशी कंपन्यांनी कोविड-१९ विषाणूपासून ९० ते ९४.५ टक्के बचाव होईल अशा लशी तयार केल्या आहेत. त्यासाठी २१ दिवसांच्या अंतराने दोन वेळा लस टोचून घ्यावी लागेल. लस तयार होऊन एखाद्या व्यक्तीला टोचून घेईपर्यंत ती उणे ६८ ते उणे ७० अंश सेल्सिअस इतक्‍या अतिशीत तापमानात सुरक्षित ठेवावी लागेल. कारण, ही लस ‘एम-आरएनए’ (मेसेंजर आरएनए)वर आधारलेली आहे. कोविड-१९ विषाणूवरील बोथट काटेरी आवरण ज्या प्रथिनाचे बनलेले असते, ते एकमेकांशी जोडलेल्या तेराशे अमिनो आम्लांच्या ‘माळे’ने तयार झालेले असते. त्या प्रथिनाच्या अडीचशे अमिनो आम्लांची छोटीशी त्रिमितीयुक्त माळ घडविण्याची माहिती या ‘एम-आरएनए’कडे असते. हा भाग शरीरातील विशिष्ट पेशींना विशिष्ट जागीच तंतोतंत संलग्न होतो. याला ‘रिसिप्टर बायडिंग डोमेन’ म्हणतात. संशोधकांनी पेशींवरील ही जागा शोधलेली आहे. त्याला ‘रिसिप्टर साइट’ म्हणतात. (ही रिसिप्टर साइट म्हणजे ‘अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम’; एक महत्त्वाचे प्रथिन). कोविड-१९चा विषाणू पेशीवरील ‘रिसिप्टर साइट’लाच संलग्न होऊन झपाट्याने वाढतो आणि त्यांची संख्या बेसुमार वाढते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लशीमधील मुख्य घटक म्हणजे विषाणूचा वैशिष्ट्यपूर्ण (बोथट) काटे बनवणारा ‘एम-आरएनए’. त्याने घडवलेल्या प्रथिनांच्या विरुद्ध आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती जोरदार लढा देणार असते. त्यामुळे विषाणूंचा शरीरभर होणारा संभाव्य फैलाव रोखला जातो. या ‘एमआरएनए’ची रासायनिक जडणघडण (त्रिमितीयुक्त संरचना, आकृतिबंध) आजूबाजूच्या तापमानाला अत्यंत संवेदनक्षम असते. ती रचना बिघडू नये म्हणून उणे ७० अंश तापमानाला लशींचा साठा राखून ठेवावा लागतो. लस तयार झाल्यावर एखाद्या व्यक्तीला टोचेपर्यंत तिचा प्रवास आणि हाताळणी अतिशीत अवस्थेत होते. याला शीत साखळी म्हणतात. काही कारणांमुळे लशीचे तापमान पुरेसे थंड राहिले नाही, तर ‘एम-आरएनए’ची रचना बिघडून लशीची परिणामकारकता कमी होते. सुदैवाने ‘कोविड-१९’साठीच्या काही भारतीय लशींना अतिशीत तापमानाची गरज नसते. त्यांची कार्यक्षमता २ ते ८ अंश तापमानाला पुरेशी राहते. उबदार हवेतही लस टिकण्यासाठी ‘एम-आरएनए’ऐवजी त्याच्या योगे बनणाऱ्या दोनशे अमिनो आम्लांची साखळीच तयार करण्याची योजना संशोधकांनी आखली. ही साखळी अतिशीत स्थितीत हवा काढून टाकलेल्या पेटीत ठेवली, तर ती कोरडी होऊन तिचा त्रिमितीयुक्त आकार उबदार हवेतही दीर्घकाळ जसाच्या तसा राहतो. याला ‘फ्रीझ-ड्राइंग’ म्हणतात. एवढेच काय या संशोधकांनी ही लस एक सेकंद १०० अंश सेल्सिअस तापमानातही स्थिर राहते, असे निरीक्षण केले. याचा अर्थ भावी काळातील लस थंड नाही ठेवली तरी चालेल! 

आपल्या देशातील अनेक भागांत उष्ण तापमान असते. तेथे लस सामान्य तापमानातही पूर्ण क्षमतेने दीर्घकाळ टिकणारी पाहिजे. ‘आयआयएस’ (बंगळूर), ‘आयसर’ (तिरुअनंतपूरम), ‘टीएचएसटी’ (ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी इन्स्टिट्यूट, फरिदाबाद) आणि ‘आयआयएससी इन्क्‍युबेटेड स्टार्ट-अप मायनव्हॅक्‍स’ या संस्थांतील संशोधकांनी ‘उबदार लस’ हा प्रकल्प सुरू केला आहे. यामुळे सामान्य किंवा उबदार तापमानाला टिकणारी लस तयार होऊ लागेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Web Title: Dr Anil Lachke Write Article Covid 19 Vaccine

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top