esakal | सर्च-रिसर्च : बर्फ वितळतोय...

बोलून बातमी शोधा

Snow-Melting

अंटार्क्टिकातील बर्फ वितळतोय. ग्रीनलँडलाही जागतिक तापमानवाढीचा फटका बसतोय. अनेकदा सांगितल्या गेलेल्या या गोष्टीची तीव्रता किती प्रचंड आहे. हे नव्याने पुढे आले आहे.

सर्च-रिसर्च : बर्फ वितळतोय...

sakal_logo
By
सुरेंद्र पाटसकर

entertainment अंटार्क्टिकातील बर्फ वितळतोय. ग्रीनलँडलाही जागतिक तापमानवाढीचा फटका बसतोय. अनेकदा सांगितल्या गेलेल्या या गोष्टीची तीव्रता किती प्रचंड आहे. हे नव्याने पुढे आले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेले वर्ष हे अंटार्क्टिकावरील सर्वांत उष्ण वर्ष ठरले. गेल्या २०१९ च्या डिसेंबरमध्ये सर्वांधिक तापमानाची नोंद तेथे झाली होती. या सगळ्या बदलाचा फटका ग्रीनलँडला बसला आहे. त्यामुळे ग्रीनलँडमधील ६०० अब्ज टन बर्फ वितळला आहे. त्यामुळे केवळ दोन महिन्यांत जगभरातील समुद्रांची पातळी २.२ मिलिमीटरने वाढली आहे. नासाची जेट प्रोपल्शन प्रयोगशाळा आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी गेल्या २० वर्षांतील अंटार्क्टिकातील बर्फाचा व तेथील तापमानाचा अभ्यास केला. त्यातून हे धक्कादायक निष्कर्ष पुढे आले आहेत.

ग्रीनलँडमधील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळत असले, तरी अंटार्क्टिकाच्या ईशान्य भागात झालेल्या मोठ्या हिमवृष्टीमुळे तेथील हिमाच्छादन काही प्रमाणात वाढले, ही दिलासादायक बाब होती. ‘‘गेला उन्हाळा हा सर्वांत उष्ण होता. ग्रीनलँडमधील जेवढे सरासरी बर्फ २००२ ते २०१९ या कालावधीत वितळले होते, त्याच्या दुप्पट बर्फ केवळ एकाच वर्षात वितळला गेला,’’ अशी माहिती जेट प्रोपल्शन लॅबरोटरीतील शास्त्रज्ञ व प्रकल्पाच्या प्रमुख इसाबेला वेलिकोग्ना यांनी दिली.

अंटार्क्टिकातील हिमाच्छादन अजूनही कमी होत आहे, त्याचा फटका जगभरातील समुद्रांची पातळी वाढण्यात होणार आहे. याशिवाय, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामध्ये काय बदल होतात, याची पाहणी करण्यासाठी ग्रेस आणि ग्रेस-फो या दोन उपग्रहांची मदत घेण्यात आली. तसेच, जर्मन एरोस्पेस सेंटरच्या शास्त्रज्ञांचाही हातभार यासाठी लागला. या उपग्रहांच्या साह्याने केलेल्या अभ्यासात गुरुत्वाकर्षणात किंचित फरक झाल्याचे निदर्शनास आले. त्याचा परिणाम समुद्रातील प्रवाह, बर्फ वितळणे, पावसाच्या प्रमाणात बदल आदी गोष्टींवर होऊ शकतो, असे वेलिकोग्ना यांचे मत आहे.

ग्रेस हा उपग्रह २००२ ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीत कार्यान्वित होता, तर ग्रोफस -फो हा उपग्रह मे २०१८ मध्ये अवकाशात सोडण्यात आला आहे. ऑक्टोबर २०१७ ते मे २०१८ या कालावधीतील माहिती मिळविण्यासाठी इतर संस्थांनी केलेल्या नोंदींचा वापर करण्यात आला.

या प्रकल्पामध्ये फ्रान्समधील ग्रेनोबल विद्यापीठ, नेदरलँडमधील युट्रेच विद्यापीठ आणि वॉशिंग्टन विद्यापीठातील पोलर आईस सेंटरमधील संशोधकांचा समावेश होता. संशोधकांच्या पाहणीनुसार दरवर्षी अंटार्क्टिकातील १५० अब्ज टनाएवढा बर्फ वितळतो. १९९०च्या दशकात असलेल्या बर्फ वितळण्याच्या वेगापेक्षा हा वेग सातपटीने अधिक आहे. अंटार्क्टिकात द लास्ट आईस एरिया नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागातील स्थिर हिमनग वेगाने वितळू लागलाय. या भागाचे क्षेत्रफळ २०१६ मध्ये ४१.४३ लाख चौरस किलोमीटर होते. ते आता केवळ ९.९९ लाख चौरस किलोमीटर राहिलेय.

शास्त्रज्ञांच्या मते अंटार्क्टिकामधील बर्फ वितळण्याचा वेग पाहता येत्या काही वर्षांत समुद्राच्या पाण्याचा स्तर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ग्रीनलँड आणि कॅनडात उष्णतेचे प्रमाण वाढणार असून हिम अस्वले, व्हेल, पेंग्विन यासारख्या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते.