सर्च-रिसर्च : भक्षकाच्या पोटातून सुटका !

frog
frog

एखादा किडा बेडकाने गिळल्यावरही त्याच्या अन्नमार्गातून प्रवास करून तो जिवंत बाहेर पडला, तर त्याला काय म्हणाल? नशीबवान !  शिंजी सुगीउरा या जपानच्या संशोधकांनी असे दाखवून दिले आहे, की किड्याची विशिष्ट जात बेडकाच्या अन्नमार्गातून जिवंत बाहेर येते. असा प्रसंग आपल्यावर आला होता, याचा कोणताही मागमूस न लागू देता ते पुढील जीवनक्रम कंठतात. भक्ष्य आणि भक्षक यांच्या द्वंद्वामध्ये भक्षकाच्या हाती न पडण्याचे व सापडल्यास निसटून जाण्याचे कसब काही भक्ष्य आत्मसात करून जीव वाचवतात. अशा क्‍लृप्त्या वापरण्याची सवय आपल्या पुढच्या पिढ्यांना लावून उत्क्रांतीमध्ये जगायला लायक ठरतात.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 सुगीउरा यांच्या निरीक्षणानुसार, ‘रेजिम्बार्शिया ॲटेन्युआटा’ या जातीचे किडे अशा पद्धतीने मरणाच्या दाढेतून बाहेर पडतात. म्हणून, सुगीउरा यांनी या जातीचे अनेक किडे आणि सुमारे पाच जातीचे बेडूक प्रयोगशाळेत ठेवून त्यांचे निरीक्षण केले. प्राथमिक निरीक्षणांना पुष्टी मिळाल्यावर त्यांनी अनेकदा हा प्रयोग केला. त्याना असे दिसले, की सुमारे ९० टक्के वेळा हे किडे बेडकाच्या अन्नमार्गातून जिवंत बाहेर पडतात. अन्नमार्गात मोठ्या प्रमाणावर आम्ल आणि अल्कली वापरून पचवण्यासाठी अनेक रासायनिक अभिक्रिया होत असतात. पचनासाठी विशिष्ट वेळ लागतो. त्यातूनही (म्हणजे शुद्ध हवेचा पुरवठा नसतानासुद्धा) हे कीटक कसे वाचतात, याचा अभ्यास त्यांनी केला. बेडकाच्या पोटात गेलेले अन्नपदार्थ सहा तास ते दोन दिवस त्याच्या अन्नमार्गात राहातात. मात्र हे कीटक सुमारे सहा मिनिटांत बाहेर पडू शकतात. इतक्‍या वेगात ते बाहेर पडतात, याचाच अर्थ इतर अन्नपदार्थांप्रमाणे ते पचनाचे पूर्ण चक्र होईपर्यंत स्वस्थ न बसता, स्वतः काहीतरी प्रयत्न करून बाहेर पडत असावेत, असे त्यांनी अनुमान काढले. मग काही किड्यांच्या पायाला मेण लावून त्यांनी बेडकांच्या सानिध्यात ठेवले. त्यातील एकही किडा जिवंतपणे बेडकाच्या अन्नमार्गातून बाहेर पडला नाही. तसेच या जातीचे अनेक किडे बेडकांनी खाल्ले होते. सुमारे ९० टक्के किडे त्यातून जिवंत बाहेर पडले. दहा टक्के किड्यांचे अवशेष नंतर बेडकाच्या विष्ठेतून बाहेर पडले. याचा अर्थ असा की हे किडे बेडकाला पचतात. ते विषारी किंवा हानिकारक नसावेत. हे किडे स्वतःच प्रयत्न करून भक्षकाच्या अन्नमार्गातून बाहेर पडतात. तेव्हा अंगाला इतर अन्नपदार्थांचे अवशेष फासलेले राहातात. पण ते किडे पुढील वाटचालीला लागतात. अशा बाहेर पडलेल्या किड्यांच्या जीवनक्रमाचेही सुगीउरा यांनी निरीक्षण केले. काही किडे तर महिनाभरसुद्धा जिवंत होते.

किड्यांचे अवयव कायटिन या प्रकारच्या पदार्थाचे असते. ते सर्वसाधारण आम्ल, अल्क, क्षार यांचा वाईट परिणाम न होणारे असतात. त्यामुळेही त्या अन्नमार्गातील पाचक रसायनांचा त्यांच्यावर परिणाम होत नसेल. मात्र इतर वेगवेगळ्या जातींच्या किड्यांवर प्रयोग केल्यावर ते अशा पद्धतीने बाहेर जिवंत पडताना आढळले नाहीत. आता सुगीउरा यांना असे वाटते, की तोच किडा बेडकाने पुन्हापुन्हा गिळला, तर त्यांच्या आवरणावर काही विशेष परिणाम होतो काय, किंवा त्यांची अन्नमार्गाचा गुंतागुंतीचा प्रवास करण्याची क्षमता क्षीण होते काय याचा अभ्यास करायला हवा. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शेवटी असे प्रश्न उपस्थित होतात, की या प्रक्रियेतून बेडकाचे पोषण होत नसेल तरी बेडूक असे किडे का खातो? बेडकाच्या खाण्याच्या क्रियेमध्ये काही निवड - प्रक्रिया असणारच. अशी निवड-प्रक्रिया असूनही तो असे किडे खात असेल, तर यापासून बेडकाला काय फायदा? काहीच फायदा नसेल, तर किड्याला या धाडसी प्रवासाचा काही फायदा होतो काय? दोघांना याचा काही तोटा होतो काय ? न्यूटनसाठी सफरचंद पडताना बघण्याचा प्रसंग घडला, तर कोणासाठी बेडकाने गिळलेला (आणि बाहेर पडलेला) किडा प्रेरक ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com