सर्च-रिसर्च : कोरोनाचेही टाइम कॅप्सुल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Time Capsule

या टाइम कॅप्सुलमुळे भविष्यातील समाजवैज्ञानिकांना आजच्या काळातील बदलांचा अभ्यास करता येणार आहे. तसेच भविष्यात अशी आपत्ती आली तर कोणती खबरदारी घ्यायची, व्यवस्था आणि समाजाचे चित्र कसे असेल?

सर्च-रिसर्च : कोरोनाचेही टाइम कॅप्सुल

बरोबर एक वर्षापूर्वी याच डिसेंबर महिन्यात चीनच्या वुहान शहरात ‘सार्स कोव्ह-२’ या विषाणूचा उद्रेक झाला होता. वेगाने पसरणारा श्‍वसनाशी निगडित असलेला कोरोना आजार वैश्‍विक साथीला जन्म देत असल्याचे सर्वत्र बोलले जात होते. विविध देशांतील सरकारांसह जागतिक आरोग्य संघटनाही चिंतेत होती. त्यात चीनमधून येणारी माहिती खरोखरंच विश्‍वासार्ह आहे का, याबद्दल शंका उपस्थित होत होती. समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ प्रसारित झाले. ज्यामध्ये लोक अचानक जागेवर कोसळून मरताना दिसत होते. रेल्वे स्टेशनवर पोलिस लोकांना रेल्वेत लोटण्यासाठी बळाचा वापर करताना दिसत होते. अतिशय भयानक चित्र होते. अशा संदिग्ध स्थितीत संपूर्ण जगालाच १९१८-१९२० दरम्यानच्या ‘स्पॅनिश फ्ल्यू’ची आठवण झाली. व्हॉट्‌सअप, फेसबुक, ट्‌विटर इत्यादी समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या प्रकारेच मास्क घातलेले फोटो फिरायला लागले. स्पॅनिश फ्ल्युच्या काळातील विविध पोस्टर, अध्यादेश आणि चित्रांनी सर्वांच्याच मनात काहूर माजविले. कोरोनावरील लस आणि औषधे शोधण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करू लागले. तर, दुसरीकडे अशा साथीचा सामाजिक, आर्थिक, राजकीय, साहित्यिक विश्‍वावर काय परिणाम होणार याबद्दलचे संशोधन समाजशास्त्रज्ञांनी सुरू केले आहे.  

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
  
स्पॅनिश फ्ल्युच्या आठवणी ताज्या करणाऱ्या या छायाचित्रांची एक अधिकृत आणि विश्‍वासार्ह माहिती मिळाली असती तर किंवा १९२०च्या दरम्यान तयार करण्यात आलेले स्पॅनिश फ्ल्युचे ‘टाइम कॅप्सुल’च मिळाले असते तर, कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारांसह वैज्ञानिकांकडेही विश्‍वासार्ह माहितीचा स्रोत तयार झाला असता. त्या आधारावर इतर निर्णय घेणे जास्त सोपे गेले असते आणि अनावश्‍यक भीतीचे सावटही दूर झाले असते. परंतू, वास्तवात आता स्पॅनिश फ्ल्युचे टाइम कॅप्सुल जरी नसले तरी आता कोरोनाचे टाइम कॅप्सुल बनविणे आपल्याला शक्‍य आहे. म्हणूनच अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील ब्रुकलीन स्थित सोशल सायन्स रिसर्च कौन्सिलने कोरोनाचे ‘टाइम कॅप्सुल’ जमिनीच्या आत खोल गाडून ठेवण्याचे निश्‍चित केले आहे. त्यासाठी आवश्‍यक सर्व छायाचित्रे, माहिती, मुलाखती मिळविण्यात येत आहेत. टाइम कॅप्सुलमध्ये विशिष्ट काळाची इत्यंभूत माहिती देणारे स्रोत संग्रहित केलेले असतात. असे कॅप्सुल आपण शेकडो वर्षानंतर जमिनीच्या खालून काढू शकतो आणि त्यातील माहितीचा वापर तत्कालीन गरजेनुसार करता येतो. पर्यायाने टाइम कॅप्सुल ज्या काळात बनवले गेले, त्या काळाचे पुरावे जसेच्या तसे आपल्यासमोर उभे राहतात. न्यूयॉर्कच्या या संशोधन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. अलोन्ड्रा नेल्सन यांनी ही संकल्पना मांडली असून, त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्या हे विकसित करणार आहेत. त्यासाठी जगभरातील छायाचित्रांचा अभ्यास करण्यात येणार आहे. कोरोना काळातील लॉकडाउन, बंद केलेल्या शाळा, रुग्णालये, कार्यालये, स्मशानभूमी, संशोधन संस्था आदींच्या निवडक छायाचित्रांसह कोरोना काळातील व्हर्च्युअल क्‍लास, बाजारपेठा, जम्बो हॉस्पिटल, आयसीयू इत्यादींचीही या कॅप्सुलसाठी निवड करण्यात येणार आहे. अशा २१ छायाचित्रांची निवड करण्यात येणार असून, त्याच्याशी निगडित मुलाखती आणि माहितीचा संग्रहही त्यात करण्यात येणार आहे.   

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या टाइम कॅप्सुलमुळे भविष्यातील समाजवैज्ञानिकांना आजच्या काळातील बदलांचा अभ्यास करता येणार आहे. तसेच भविष्यात अशी आपत्ती आली तर कोणती खबरदारी घ्यायची, व्यवस्था आणि समाजाचे चित्र कसे असेल? आपण कोणत्या उपाययोजना करायला हव्यात, आपल्या पुर्वजांकडून कोणत्या चुका झाल्या, त्यांनी त्या कशा सुधारल्या अशा विविध प्रश्‍नांची उत्तरे आणि कुतूहलाची उत्तरे या टाइम कॅप्सुलमधून मिळणार आहेत. एक प्रकारे २०२० हे वर्षच आपण एका कॅप्सुलमध्ये बंदिस्त करत आहोत. भविष्यातील पिढ्यांच्या जाणतेपणासाठी.

अर्थविषयक इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Search Research Article Aboout Corona Time Capsule

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top