सर्च-रिसर्च : आदिम विश्‍वाची नवी खिडकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्च-रिसर्च : आदिम विश्‍वाची नवी खिडकी

पुढील दशकात अस्तित्वात येणाऱ्या अद्ययावत लायगो डिटेक्‍टरच्या साहाय्याने, ज्यात हिंगोली जिल्ह्यात उभारण्यात येणारा भारताचा लायगो इंडिया या डिटेक्‍टरचा देखील समावेश आहे.

सर्च-रिसर्च : आदिम विश्‍वाची नवी खिडकी

विश्वाची निर्मिती कशी झाली असावी, सुरुवातीचे विश्व नक्की कसे होते, कोण आधी तयार झाले, कसे तयार झाले, का तयार झाले, असे एक ना अनेक प्रश्‍न मानवी मनाला नेहमी भेडसावत असतात. या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न अगदी आदिम काळापासून केला गेला. आजवर ही प्रक्रिया अखंड चालू आहे. विश्‍वाची निर्मिती शोधण्यासाठी अनेकांनी समोर दिसणाऱ्या घटनांच्या आधारे कल्पनांच्या जहाजाला शिडाचे वारे घालून उंच नेले. तर, कोणी निरीक्षणाच्या आधारे तार्किक मांडणी केली. यातूनच काही अंधश्रद्धा, श्रद्धा विकसित झाल्या. असे जरी असले तरी विज्ञानाने प्रत्यक्ष पुराव्याच्या आधारे आणि तार्किक मांडणीतून विश्वाच्या निर्मितीची मांडणी केली आहे. मागच्याच शतकात मांडण्यात आलेला ‘बिग-बॅंग’चा सिद्धांत त्यापैकीच एक. जगातील बहुतेक शास्त्रज्ञ आणि जाणकार या सिद्धांताची पुष्टी करतात. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘बिग-बॅंग’चा निकटचा संबंध येतो तो गुरूत्वाकर्षणाशी आणि गुरुत्वाकर्षण म्हटले तर आइन्स्टाईनने मांडलेल्या गुरूत्वीय लहरी ओघानेच आल्या. आइन्स्टाईनच्या भाकीतानंतर तब्बल शंभर वर्षांनी २०१५ मध्ये प्रथमच गुरूत्वीय लहरींची प्रत्यक्ष निरीक्षणे मिळविण्यात शास्त्रज्ञांना यश आले, साऱ्या जगात आनंदाची लाट पसरली. कारण, ही घटना मानवी इतिहासाला कलाटणी देणारी ठरणार आहे. गॅलिलिओने दुर्बिणीचे तोंड आकाशाकडे करत लावलेल्या शोधांना आणि त्यानंतर खगोलशास्त्राच्या झालेल्या प्रगतीला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व या शोधाला आहे. कारण विश्वाच्या रामरगाड्याबद्दल अधिकची आणि दृष्टीपलिकडील माहिती यामुळे मिळणार आहे. मुळात गुरूत्वीय लहरी या विद्युतचुंबकीय लहरी नाहीत. त्यामुळे एक नवे अनिर्बंध माध्यम आपल्याला मिळाले आहे. ज्याद्वारे आपण विश्वाचा अभ्यास करू शकतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

विश्वामध्ये वस्तुमान असलेल्या कोणत्याही घटकापासून, वस्तूंपासून किंवा त्यांच्या धडकेतून गुरूत्वीय लहरी उत्पन्न होतात. अवकाश आणि वेळेच्या माध्यमातून या लहरी विश्‍वात प्रवास करतात. अतिशय सूक्ष्म असलेल्या या लहरींना पकडण्यासाठी किंवा संग्रहित करण्यासाठीचे तंत्रज्ञान आपल्याकडे नव्हते, परंतु, लायगोच्या माध्यमातून आपल्याला हे शक्‍य झाले आहे. २०१५ मध्येच या लहरी शोधल्या गेल्या. तेव्हापासून रोज अशी निरीक्षणे घेण्यात येत आहेत. १.३ अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या दोन महाकाय कृष्णविवरांची धडक यात शोधण्यात आली. यावर संशोधनेही चालू आहेत. परंतु आपल्याला शोधायचे आहे विश्वाच्या अगदी सुरवातीच्या घटना! त्या आहेत जवळजवळ १३.८ अब्ज प्रकाशवर्षे दूर किंवा जुन्या! गुरुत्वीय लहरी जरी आता शोधता येत असल्या तरी एवढ्या लांबवरच्या किंवा प्राचीन विश्वातील लहरी शोधणे मोठे आव्हान आहे. त्यासाठी अगदी अद्ययावत आणि प्रचंड संवेदनशील लायगो डिटेक्‍टरची गरज आहे. हे शोधण्यासाठीच्या तंत्रज्ञानाबरोबरच त्यासाठी आवश्‍यक गणितीय मॉडेल तयार करणेही गरजेचे आहे. अमेरिकेतील एमआयटीच्या संशोधकांनी या आदिम किंवा अतिप्राचीन विश्‍वातील क्षीण गुरूत्वीय लहरी शोधण्याचे तंत्र विकसित केले आहे. या संबंधीचा शोधनिबंध ‘फिजिकल रिव्ह्यू लेटर’ या शोधपत्रिकेत प्रकाशित झाला आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुढील दशकात अस्तित्वात येणाऱ्या अद्ययावत लायगो डिटेक्‍टरच्या साहाय्याने, ज्यात हिंगोली जिल्ह्यात उभारण्यात येणारा भारताचा लायगो इंडिया या डिटेक्‍टरचा देखील समावेश आहे. अशा अद्ययावत डिटेक्‍टरच्या साहाय्याने अगदी सुरुवातीच्या विश्वातील कृष्णविवरे, न्यूट्रॉन स्टार, सुपरनोव्हा इत्यादी अवकाशीय घटनांची नोंद घेणे शक्‍य होणार आहे. पर्यायाने अगदी सुरुवातीच्या विश्वाचे चित्र अधिक स्पष्टपणे आपल्यासमोर उभे राहील आणि आपली विश्वाकडे बघण्याची क्षमताही यामुळे वाढणार आहे. येता काळ हा अवकाशीय संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या शोधांचा राहणार असून, लायगो इंडियाद्वारे या आंतरराष्ट्रीय संशोधनात आपलेही बरोबरचे किंवा त्यापेक्षा अधिक योगदान असणार आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टॅग्स :India