भाष्य : चिनी व्यवस्थेची कसोटी

भाष्य : चिनी व्यवस्थेची कसोटी

कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये हाहाकार उडाला असून, या विषाणूला रोखण्यासाठी तेथील सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. पण, केवळ एक आपत्ती एवढेच याचे स्वरूप नसून एकूणच राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, विचारसरणी आणि समाज यांच्यासमोर अलीकडच्या काळात जे व्यापक आव्हान उभे ठाकलेले आहे, त्याची लक्षणे कोरोना विषाणूच्या आपत्तीतून दिसत आहेत. काय आहेत ही आव्हाने?

गेल्या वर्षी म्हणजे २०१९ मध्ये कम्युनिस्ट क्रांतीनंतर स्थापन झालेल्या राज्याची सत्तरी आणि अर्थव्यवस्था खुली झाल्याची चाळिशीही साजरी करण्यात आली. ‘तिआन आन मेन’ चौकात विद्यार्थ्यांची जी ऐतिहासिक निदर्शने झाली, त्यालाही गेल्या वर्षी तीन दशके पूर्ण झाली. त्या घटनेची स्मृती साजरी करण्याचा प्रयत्न होण्याच्या शक्‍यतेने सरकार चिंतेत होते. आर्थिक सुधारणांनंतर चीनने विकासाचा मोठा पल्ला गाठला आणि अर्थव्यवस्थेचे आकारमान लक्षणीयरीत्या वाढविले. तरीही, समाजात प्रत्येक पातळीवर आपले सर्वंकष नियंत्रण कम्युनिस्ट पक्ष आणि सरकार यांनी ठेवले आहे. आर्थिकदृष्ट्या खुला; पण राजकीयदृष्ट्या बंदिस्त हे व्यवस्थेचे वैशिष्ट्य आजही कायम आहे. सध्याच्या बदलत्या जगातही या पोलादी रचनेला धक्का बसलेला नाही. लोकांवरील नियंत्रण निरंकुश स्वरूपाचे आहे. अशा प्रकारच्या राजकीय नियंत्रणामुळेच कोरोना विषाणूने निर्माण केलेल्या मोठ्या धोक्‍याविषयी लोक अंधारात राहिले. संकट आले आहे, ही गोष्ट स्वीकारण्यास पक्ष व सरकारने वेळ घेतला. त्यावर मात करण्यासाठी यंत्रणा पूर्ण ताकदीनिशी सक्रिय होण्यात त्यामुळे विलंब झाला. आर्थिक प्रगतीच्या झपाट्यामुळे अनेक गावे, जिल्ह्याची ठिकाणी येथे राजकीय जागरूकता वाढली आहे. त्यामुळेच, ज्या पद्धतीने एकूण कोरोना विषाणू संसर्गाचा प्रश्‍न स्थानिक नेत्यांनी हाताळला, त्याविषयी तीव्र नाराजी लोकांनी व्यक्त केली. प्रशासनाने जे ठरवले आहे, त्यापेक्षा कोणतेही वेगळे किंवा विरुद्ध मत स्वीकारण्याची मानसिकता पक्ष-प्रशासनात नाही. प्रशासनाच्या निर्णयातील विसंगती, त्रुटी दाखविण्याची लोकांना मुभा नाही. लोक इशारे देत असूनही प्रतिबंधात्मक उपाय तातडीने योजण्यात आले नाहीत. आजवर चिनी कम्युनिस्ट पक्षाला त्या देशातील सामाजिक-आर्थिक एकसंधतेचा फायदा झाला. त्यामुळे पक्षाच्या लोकांवरील नियंत्रणात फार अडथळे आले नाहीत. पण, हीच परिस्थिती पुढेही टिकेल, असे नाही. गेल्या काही दशकांत चीनने आर्थिक प्रगती वेगाने साधली. समृद्धीचा स्पर्श अनेकानेक समाजघटकांना झाला. चीनच्या या प्रगतीच्या यशोगाथेत हुवेई प्रांताचे खास स्थान आहे. पूर्व-पश्‍चिम जोडणाऱ्या यांग्त्झी नदीच्या आर्थिक विकास क्षेत्राच्या मोक्‍याच्या जागी हुवेई प्रांत आहे. एकूण देशांतर्गत उत्पन्नात (जीडीपी) या प्रांताचा वाटा लक्षणीय आहे. २०१९मध्ये हुवेईने साडेसात टक्के ‘जीडीपी’ नोंदवला. राष्ट्रीय सरासरी प्रमाणापेक्षा तो १.४ टक्‍क्‍यांनी जास्त आहे. या प्रांतातील उद्योग श्रमसघन आहेत. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर रोजगारसंधी या प्रांतात आहेत. शेती व उद्योग या दोन्हीत या प्रांतांची कामगिरी उल्लेखनीय आहे. सेवा क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या आपत्तीचे इथल्या अर्थव्यवस्थेवर होणारे दुष्परिणाम किती गहिरे असतील, याची कल्पना या माहितीवरून येईल. सध्या जो हाहाकार उडाला आहे, त्यामुळे आर्थिक विकास दर तळ गाठण्याची शक्‍यता दिसते.

हुवेई प्रांताच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला, तर साऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम तर होईलच; पण भविष्यातील विकासदराविषयीचे अंदाजही बदलावे लागतील. विविध प्रकल्पांची पूर्तता रखडेल. वेळापत्रके नव्याने करावी लागतील. पायाभूत सुविधा, इमारतींचे बांधकाम, उत्पादन प्रकल्प यांच्या योजना लांबणीवर तर पडतीलच; परंतु त्याहीपेक्षा चिंतेची बाब म्हणजे, चीनमधील मागणीवर परिणाम होण्याचा धोका आहे. मागणी-पुरवठा संतुलन बिघडेल. उपभोग्य खर्चाला लोक कात्री लावतील. देशातील उपभोग्य वस्तूंवरील खर्चात कपात होणे, हा धोका निश्‍चितच मोठा आहे. चीनने आर्थिक सुधारणांना हात घातल्यानंतर जे प्रगतीचे उच्चांक गाठले होते, ते निर्यातप्रधान प्रारूपावर आधारलेले होते. मात्र, अलीकडे जगातील मागणी कमी झाली, त्याचबरोबर नवे स्पर्धकही तयार झाले. त्यामुळे चिनी व्यवस्थेला आपला मोहरा वळवावा लागत आहे, तो देशांतर्गत बाजारपेठेकडे. तेथील विस्तारलेला मध्यमवर्ग लक्षात घेता, बाजारपेठ तिथे अस्तित्वात आहेच; परंतु तेथेही मागणी कमी झाली आणि ग्राहकांनी हात आखडता घेतला, तर चिनी राज्यकर्त्यांपुढे मोठाच प्रश्‍न उभा राहील.

चीनमध्ये वसंतोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्याला पारंपरिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. या महोत्सवाच्या काळात कौटुंबिक मेळावे होतात. त्या वेळी एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू भेट देण्याची पद्धत तेथे आहे. या प्रथेमुळे मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. खासगी स्तरावर होणाऱ्या या खरेदीचा उद्योग-व्यापाराला चालना मिळण्यास चांगला उपयोग होतो. २०१९ मधील वसंतोत्सवात एक लाख कोटी युआन एवढे उत्पन्न किरकोळ वस्तू उद्योग आणि खाद्यपदार्थ पुरवठा करणाऱ्या (केटरिंग) उद्योगाने मिळविले होते. त्यावरून वसंतोत्सवाच्या आर्थिक आनुषंगिक फायद्याची कल्पना येते. कोरोना विषाणूच्या संसर्गाने हे सारे चित्र पालटले आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीचा केवळ हुवेई प्रांतातच नव्हे, तर साऱ्या देशावर परिणाम झाला आहे. वाहतूक, खाद्यपदार्थ सेवा, पर्यटन, किरकोळ वस्तू उत्पादन, मनोरंजन, बांधकाम क्षेत्र या उद्योगांना मोठा फटका बसला आहे. हुवेई प्रांताच्या जीडीपीमध्ये या क्षेत्राचा वाटा ४३ टक्के आहे.

चिनी राज्यकर्त्यांपुढील आव्हान कितपत व्यापक आहे, हे यावरून कळते. विषाणूच्या फैलावाला आळा घालण्यास सर्वोच्च प्राधान्य तर द्यावे लागेलच; त्याचबरोबर स्थानिक पातळीवर ठिकठिकाणी जो असंतोष निर्माण झाला आहे, तोही कौशल्याने हाताळावा लागेल. ज्या भागात स्थानिक अधिकाऱ्यांविषयी कमालीचा असंतोष आहे, त्यांच्या बदल्या कराव्या लागतील. एप्रिल २००३मध्ये ‘सार्स’च्या फैलावाचे संकट चीनवर कोसळले होते. त्या वेळीही माहिती लवकर देण्यात ढिसाळपणा केल्याबद्दल बीजिंगचे महापौर, तसेच चीनचे आरोग्यमंत्री यांना बडतर्फ करण्यात आले होते. पण, त्या वेळच्या संकटात ज्या चुका झाल्या होत्या, त्यापासून चीनने काही धडा घेतला आहे, असे दिसत नाही. संकटाची व्याप्ती आणि त्यासंबंधात आढळून आलेले गैरव्यवस्थापन अतिशय गंभीर असून, त्याचे परिणाम हुवेईपुरते मर्यादित नाहीत. जनतेतील नाराजी सर्वदूर आहे. विशिष्ट प्रतिमेमुळे चीन संकटाचे खरे आकडे जगाला सांगतो आहे किंवा नाही, याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. हे खरेच आहे, की अनेक गावांमध्ये अनेकांनी प्राण पणाला लावून विषाणुसंसर्ग पसरू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. या त्यागाचा आणि कामाचा पक्ष आणि सरकारविषयी अभिमान निर्माण करण्यासाठी उपयोग करून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. पण, या वेळचे आव्हान सोपे नाही. व्यवस्थेत अस्वस्थता आणि निराशा निर्माण झाली आहे. एकूणच, सध्याच्या परिस्थितीत एकीकडे देशांतर्गत आणि दुसरीकडे जागतिक दबावाची परिस्थिती चिनी नेतृत्व कसे हाताळते, यावर बरेच काही अवलंबून आहे.

( लेखक चीनचे अभ्यासक व तेथील ‘पेकिंग युनिव्हर्सिटी’त सिनिअर फेलो आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com