प्लॅस्टिकला पर्याय दृष्टिक्षेपात

योगिराज प्रभुणे
Friday, 13 November 2020

दरवर्षी तयार होणाऱ्या कचऱ्यापैकी ४० टक्के कचरा प्लॅस्टिकचा असतो. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी मलेशियातील सेन्स विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संशोधन हाती घेतले. हेमिसेल्युलोज हा एक नैसर्गिक बायोपॉलिमर आहे.

प्लॅस्टिक प्रदूषण ही पर्यावरणापुढची गंभीर समस्या आहे. प्लॅस्टिकबंदीसारख्या वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करूनही ही समस्या सोडवण्याच्या मुळापर्यंत आपण जाऊ शकलेलो नाही, ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावीच लागेल. प्लॅस्टिकचे विघटन होत नाही. वर्षानुवर्षे प्लॅस्टिक जसेच्या तसे राहते. त्यातून पर्यावरणाला धोका निर्माण होतो, हे वेगवेगळ्या प्रयोगांती सिद्ध झाले आहे. पण, प्लॅस्टिकला प्रभावी पर्याय निर्माण होणार नाही, तोपर्यंत प्लॅस्टिकबंदी कागदावरच राहणार, हे एव्हाना कळून चुकले आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक पॅकेजिंग ही काळाची गरज आहे. ही गरज नेमकेपणाने ओळखून पामतेलाच्या कचऱ्यापासून शास्त्रज्ञांनी पर्यावरणपूरक प्लॅस्टिक विकसित केले आहे. शास्त्रज्ञांना पामतेलाच्या उत्पादनातून निर्माण होणाऱ्या कचऱ्यात प्लॅस्टिक बनविण्याचे ६० टक्के गुणधर्म आढळले. अर्थात, त्याचे विघटन होऊ शकते, असा विश्वासही शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चाळीस टक्के कचरा प्लॅस्टिकचा  
फक्त एकदाच वापरून आपण प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा रॅपर्स टाकून देतो. एकेका शहरातून शेकडो टन प्लॅस्टिकचा कचरा जमा होतो. त्याची विल्हेवाट लावायची कशी, हा प्रश्न प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेसमोर आहे. दरवर्षी तयार होणाऱ्या कचऱ्यापैकी ४० टक्के कचरा प्लॅस्टिकचा असतो. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी मलेशियातील सेन्स विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संशोधन हाती घेतले. हेमिसेल्युलोज हा एक नैसर्गिक बायोपॉलिमर आहे. पॉलिसेकेराइड्‌स आणि प्रथिनांसारख्या नवीन पदार्थांपासून तो तयार केला जातो. शेती आणि जैवविघटक कचऱ्यात हेमिसेल्युलोज मोठ्या प्रमाणात आढळते. प्लॅस्टिक निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील हे आश्वासक बायोपॉलिमर आहे. कारण, ते लवचिक आहे. त्यात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते. पामतेलाच्या फळांमध्ये हा घटक आढळतो. त्याचा वापर ग्रीन पॅकेजिंगसाठी होऊ शकतो.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्वस्त आणि विघटन होणारे प्लॅस्टिक 
संशोधकांच्या एका पथकाने पामतेलाच्या फळांच्या रसामध्ये विविध प्रकारचे हेमिसेल्युलोज मिसळले. त्यातून वेगवगेळ्या जाडीचे बायोपॉलिमर प्लॅस्टिक तयार झाले. प्लॅस्टिकच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांशी ते मिळतेजुळते असल्याचेही यातून स्पष्ट झाले. त्यात ६० टक्के प्लॅस्टिकचे गुणधर्म आहेत. त्यामुळे जैवविघटन होणारे पॅकेजिंग साहित्य तयार करण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे दिसत आहे. स्वस्त आणि विघटन होणारे प्लॅस्टिक निर्माण करण्यासाठी हे संशोधन एक आशेचा किरण ठरू शकेल. पर्यावरणाचा वेगाने नाश करणाऱ्या प्लॅस्टिकला हा एक उत्तम पर्याय आहे. पामतेलाच्या उद्योगातील कचऱ्यापासून बायोपॉलिमरचे उत्पादन हे उद्योगाशी संबंधित जंगलतोड रोखत नसले तरी त्यापासून बनवलेल्या उत्पादनांचा वापर प्लॅस्टिकच्या प्रदूषणास रोखू शकतो. त्यातून पर्यावरणीय परिणाम लक्षणीय प्रमाणात कमी होऊ शकतात, असा विश्वास संशोधक व्यक्त करत आहेत. याचा उत्पादन खर्चही खूप कमी आहे. सध्या वापरले जाणारे प्लॅस्टिक आणि पेट्रोलियमवर आधारित पॉलिमरला हा ठोस पर्याय ठरू शकतो.  

... तर समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लॅस्टिक 
जगभरात उत्पादित होणाऱ्या प्लॅस्टिकपैकी एक तृतीयांश प्लॅस्टिकचा (१२८.८ टन) वापर फक्त पॅकेजिंगसाठी होतो, असे या संदर्भातील संशोधन अहवालात नमूद केलेले आहे. यापैकी ३० टक्के प्लॅस्टिकचा पुन्हा वापर होऊ शकत नाही. किंबहुना तो करता येत नाही. यापैकी बहुतांश प्लॅस्टिक समुद्रात टाकून दिले जाते. त्याचा थेट फटका समुद्रातील जलचरांना बसतो. ज्या वेगाने सध्या आपण समुद्रात प्लॅस्टिक टाकत आहोत, तो वेग कायम राहिल्यास येत्या तीस वर्षांमध्ये समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लॅस्टिक असेल, असा धोका या अहवालात नोंदविलेला आहे. या संभाव्य धोक्‍यापासून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी विघटन होणाऱ्या प्लॅस्टिकचा शोध ही काळाची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about alternative to plastic