esakal | सर्च-रिसर्च : चार मूलद्रव्यांचे नामकरण 
sakal

बोलून बातमी शोधा

सर्च-रिसर्च : चार मूलद्रव्यांचे नामकरण 

आपल्या सभोवतालच्या सर्व दृश्‍य-अदृश्‍य गोष्टी कोणत्या तरी मूलद्रव्यांनी तयार होतात. हायड्रोजनपासून युरेनियमपर्यंतची मूलद्रव्ये पृथ्वीवर आढळतात. मूलद्रव्यांच्या तक्‍त्यामधील युरेनियमचा क्रमांक ९२ आहे, तर त्यानंतरची मूलद्रव्ये कृत्रिम पद्धतीने तयार करावी लागतात. मॉस्कोव्हियम, लिव्हरमोरियम, टेनेसियम आणि ओगॅसन ही चार मूलद्रव्ये तक्‍त्यात स्थिरावली आहेत. नंतरची दोन लवकरच तयार होतील. अर्थातच, ती मूलद्रव्ये मानवनिर्मित असून, ‘जड’ आहेत. युरेनियमच्या पुढची मूलद्रव्ये कशी असतील, याबद्दल संशोधकांना कुतूहल वाटते.

सर्च-रिसर्च : चार मूलद्रव्यांचे नामकरण 

sakal_logo
By
डॉ. अनिल लचके

आपल्या सभोवतालच्या सर्व दृश्‍य-अदृश्‍य गोष्टी कोणत्या तरी मूलद्रव्यांनी तयार होतात. हायड्रोजनपासून युरेनियमपर्यंतची मूलद्रव्ये पृथ्वीवर आढळतात. मूलद्रव्यांच्या तक्‍त्यामधील युरेनियमचा क्रमांक ९२ आहे, तर त्यानंतरची मूलद्रव्ये कृत्रिम पद्धतीने तयार करावी लागतात. मॉस्कोव्हियम, लिव्हरमोरियम, टेनेसियम आणि ओगॅसन ही चार मूलद्रव्ये तक्‍त्यात स्थिरावली आहेत. नंतरची दोन लवकरच तयार होतील. अर्थातच, ती मूलद्रव्ये मानवनिर्मित असून, ‘जड’ आहेत. युरेनियमच्या पुढची मूलद्रव्ये कशी असतील, याबद्दल संशोधकांना कुतूहल वाटते. एकाच वेळी तीन प्रयोगशाळांमध्ये ‘जड’ मूलद्रव्यांची निर्मिती करून त्यांचे गुणधर्म तपासण्याचे काम सुरू झाले. या प्रयोगशाळा डुबना (रशिया), लॉरेन्स बर्कले (अमेरिका) आणि जीएसआय (जर्मनी) येथे आहेत. ही मूलद्रव्ये किरणोत्सर्गी असल्याने अस्थिर असतात. काहींचे अर्ध आयु एक सेकंदाहून कमी आहे; मात्र काही स्थिर आहेत. प्लुटोनियमचे अर्ध आयु २४१०० वर्षे, तर अमेरिसियमचे समस्थानिक ७३७० वर्षे आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

युरेनियमनंतरची मूलद्रव्ये उपयुक्त असू शकतात. अणुभट्टीसाठी इंधन म्हणून सोन्यापेक्षा जड असणारे प्लुटोनियम कित्येक टन बनवले जाते. अमेरिसियम (क्रमांक ९५), नेपच्युनियम आणि क्‍युरियम (क्र. ९६) ही मूलद्रव्ये काही किलोग्रॅमपर्यंत तयार झालेली आहेत. बर्केलियम, आइन्स्टाईनियम, कॅलिफोर्नियम काही ग्रॅम तयार आहेत. रुदरफोर्डियम (क्र. १०४), हाहनियम (१०५), सीबॉर्गनियम (१०५), नील्सबोहरियम (१०७), हासियम (१०८), माइटनेरियम (१०९), डॉर्मस्टॅड्‌ट्‌÷िटयम (११०), राँटजेनियम (१११), कोपर्नेसियम (११२), निहोनियम (११३) आणि फ्लेरोव्हियम (क्रमांक ११४) ही कृत्रिम किरणोत्सर्गी मूलद्रव्ये अतिअस्थिर असली तरीही संशोधकांनी त्यांचे बरेच संशोधन केले आहे. मानवनिर्मित जड मूलद्रव्य तयार करणे जिकिरीचे आहे. ते झाल्यानंतर लगेच त्याचे रूपांतर वेगळ्या मूलद्रव्यांमध्ये होते. त्यामुळे नवीन कृत्रिम मूलद्रव्य तयार केल्याचा वैज्ञानिक पुरावा सादर करणे सोपे नाही. खरेच मूलद्रव्य तयार झालेय, याची खातरजमा ‘इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड केमिस्ट्री’ (आययूपीएसी) या संस्थेकडे करावी लागते. ती सिद्धता झाल्यावरच मूलद्रव्याचे नाव मंजूर होते. ११५ ते ११८ या चार मूलद्रव्यांची नावे मंजूर झालेली आहेत. मॉस्कोव्हियमचे (क्र. ११५) फक्त १०० अणू तयार झाले आणि त्यांचे अर्धे आयु ०.६५ सेकंद आहे.

मात्र, किरणोत्सर्जनामुळे त्याचे रूपांतर थोड्या अवधीत निहॉनियममध्ये झाले असणार. मॉस्कोमध्ये रेड स्क्वेअर आहे. इथेच ‘जॉइंट इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्‍लिअर रिसर्च’ आहे. त्यावरून ‘मॉस्कोव्हियम’ नाव देण्यात आले. 
लिव्हरमोरियमचे (क्र. ११६) अर्धे आयु केवळ ५३ मिलिसेकंद असल्यामुळे त्याचे रूपांतर फ्लेरोव्हियममध्ये होते. लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरीच्या कर्तबगारीबद्दल या मूलद्रव्याचे नाव लिव्हरमोरियम दिलेले आहे. टेनेसिन हे ११७ क्रमांकाचे मूलद्रव्य असून, त्याचे नाव टेनेसीमधील युनिव्हर्सिटी ऑफ टेनेसी आणि ओक रिज नॅशनल प्रयोगशाळेवरून दिलेले आहे. ‘ओगॅनेसन’ हे ११८ क्रमांकाचे मूलद्रव्य दुबना (रशिया) येथे तयार करण्यात आले. जिवंत व्यक्तीचे नाव मूलद्रव्याला द्यायचे नाही, असे धोरण ‘आययूपीएसी’चे होते.

यामुळे अमेरिसियमसह अनेक मूलद्रव्ये घडवणाऱ्या ग्लेन सीबॉर्ग यांचे नाव त्यांनी एकाही मूलद्रव्याला देऊ केले नव्हते. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे नाव १०६ क्रमांकाच्या (सीबॉर्गनियम) मूलद्रव्याला दिले गेलेय. अनेक ‘सुपर हेवी’ मूलद्रव्ये शोधून काढण्यात युरी ओगॅनेसियन यांचे मोठे श्रेय आहे. ते जिवंत असून, ८७ वयाचे आहेत. त्यांचे नाव मात्र ११८ क्रमांकाच्या मूलद्रव्याला दिलेले आहे. रशियाने त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट पण काढले आहे. नजीकच्या काळात ११९ आणि १२० क्रमांकाची मूलद्रव्ये घडवण्यात येतील. त्यांची तात्पुरती नावे एका-फ्रांसियम आणि एका-रेडियम आहेत. त्यांचे अस्तित्व मंजूर झाल्यावर त्यांची अधिकृत नावे आपल्याला कळतीलच!

Edited By - Prashant Patil