
जगातील कानाकोपऱ्यात ‘कोविड- १९’ विषाणूने लोकांना भयभीत केलेय. हा एकदम आला कोठून? होता कोठे? अजून किती विषाणू आहेत? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. जीवसृष्टीला प्राणघातक असणारे दहा लाख प्रकारचे विषाणू आहेत, असे संशोधक स्टीफन मॉर्स म्हणतात. यामधील तीन लाख वीस हजार विषाणू सस्तन प्राण्यांना घातक असतात. स्पॅनिश फ्ल्यू, एन्फ्लुएन्झा, रेबीज, निपाह, सार्स, डेंगी, इबोला, एचआयव्ही या विषाणूंनी मानवाला बेजार केलेय. प्रतिकारशक्तीच्या जोरावर जीवसृष्टी विषाणूंपासून जमेल तेवढा बचाव करते. आता ‘कोविड- १९’ विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरलेय.
जगातील कानाकोपऱ्यात ‘कोविड- १९’ विषाणूने लोकांना भयभीत केलेय. हा एकदम आला कोठून? होता कोठे? अजून किती विषाणू आहेत? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. जीवसृष्टीला प्राणघातक असणारे दहा लाख प्रकारचे विषाणू आहेत, असे संशोधक स्टीफन मॉर्स म्हणतात. यामधील तीन लाख वीस हजार विषाणू सस्तन प्राण्यांना घातक असतात. स्पॅनिश फ्ल्यू, एन्फ्लुएन्झा, रेबीज, निपाह, सार्स, डेंगी, इबोला, एचआयव्ही या विषाणूंनी मानवाला बेजार केलेय. प्रतिकारशक्तीच्या जोरावर जीवसृष्टी विषाणूंपासून जमेल तेवढा बचाव करते. आता ‘कोविड- १९’ विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरलेय.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
या विषाणूची साथ पसरण्यासाठी चीनच्या वुहान शहरातील ‘वेट’ (म्हणजे ओले) मार्केट कारणीभूत आहे, असे म्हणतात. गजबजलेल्या ‘वेट मार्केट’मध्ये स्वस्तात सुटा भाजीपाला आणि मांसाहारी पदार्थ मिळतात. अनेक जिवंत प्राणीही मिळतात. चिनी लोक वटवाघूळही खातात. सस्तन प्राण्यांमधील वटवाघूळ हा एकमेव आकाशात उडणारा प्राणी आहे. तो उडताना शरीरात प्रचंड प्रमाणात ऊर्जानिर्मिती करतो. त्याचबरोबर ‘फ्री रॅडिकल’ नामक अत्यंत क्रियाशील, पण पेशींना इजा करणारी रसायने तयार होतात. तेथे विषाणूंना वाढायची आयतीच संधी मिळते. साहजिकच वटवाघळाच्या शरीरात नानाविध विषाणू मोठ्या प्रमाणात वस्ती करतात. त्या विषाणूंचा हल्ला निष्प्रभ करण्यासाठी वटवाघळांची प्रभावी प्रतिकारशक्ती उपयोगी पडते. त्या विषाणूंमधील एक ‘कोविड’चा विषाणू आहे.
वुहानच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’मधील संशोधकांना चीन आणि म्यानमारच्या सरहद्दीजवळील डोंगराच्या गुहेमध्ये काही वटवाघळे दिसली. त्यांच्या शरीरातील एका विषाणूला त्यांनी ‘बीटा कोरोना’ असे नाव दिले. त्याचे आणि सध्याच्या ‘कोविड- १९’मध्ये ९६ टक्के साम्य आहे. मात्र त्याच्या पृष्ठभागावर बोथट, पण तरी काटेरी वाटणारे ‘स्पाईक प्रोटिन’ नव्हते. या ‘काट्यां’ना रिसेप्टर बायडिंग डोमेन (आरबिडी) म्हणतात. आरबिडी नसल्यामुळे मानवी पेशीमध्ये या विषाणूला ‘प्रवेश बंद’ असतो. पेशीच्या आत प्रवेश करायचा असेल तर स्पाईक प्रोटिन प्रथम पेशींच्या आवरणावरील ‘एसीई-२’बरोबर संलग्न होते (म्हणजे चिकटते). मगच (कोविड-१९) विषाणू पेशीमध्ये शिरून बेसुमार वाढायला लागतो. हाँगकाँग आणि गवांगझो येथील संशोधकांना एका खवल्या मांजराच्या शरीरात ‘कोविड-१९’सारखा काटेरी विषाणू सापडला. मुंग्या खाणाऱ्या खवल्या मांजराचे शास्त्रीय नाव ‘मॅनिस जावनिका’ (मलायन पॅंगोलीन) आहे. त्यांच्या मते वटवाघूळ आणि खवल्या मांजरात सापडणाऱ्या दोन भिन्न विषाणूंमधून जणू संकरित असावा असा ‘कोविड- १९’सारखा प्राणघातक वेगळाच विषाणू तयार झालाय. तो मानवाकडे थेट चालून आला. याचा अर्थ या दोन्ही प्राण्यांमधील विषाणूंच्या जनुकांची सरमिसळ झाली असणार.
म्हणजेच ‘कोविड-१९’ हा मानवनिर्मित ‘डिझाईन्ड’ किंवा ‘इंजिनियर्ड’ विषाणू नसावा, असा अर्थ त्यातून ध्वनित होतो. ऑस्ट्रेलियातील मेंझिज हेल्थ इन्स्टिट्यूटच्या नायजेल मॅकमिलन यांच्या मते ‘कोविड-१९’ नैसर्गिक आहे. हे निष्कर्ष ‘नेचर मेडिसिन जर्नल’ (मार्च २०२० ) मध्ये प्रकाशित झाले आहेत. अमेरिकेच्या सरकारी गुप्त यंत्रणेला सार्स-सीओव्ही- या साथीच्या रोगाचा स्रोत मूलतः प्रयोगशाळेत असून, तो मानवनिर्मित असावा असा संशय आहे.
जपानचे प्रो. तासुकु होंजो यांच्या नावाने एक संदेश जगभर ‘व्हायरल’ झालाय. त्यात म्हटलेय की नैसर्गिक विषाणू विशिष्ट तापमानात सक्षम असतो. ‘कोविड-१९’ एकाच वेळी जगातील बहुतेक सर्व तापमानाच्या देशांमध्ये धुमाकूळ घालतोय, याचा अर्थ तो कृत्रिम आहे. संदेशात पुढे म्हटलेय - ‘मी जे सांगतो, ते खोटे ठरल्यास माझे २०१८चे नोबेल पारितोषिक काढून घ्या!’ मात्र २० एप्रिल २०२० रोजी क्योटो युनिव्हर्सिटीच्या पत्रकात प्रस्तुतचा संदेश ‘माझा नाही’, असे प्रो. होंजोनी जाहीर केलेय. मूळ विषाणूचा प्रकार तोच असला, तरी त्यापासून उपप्रकार तयार करता येणे शक्य असते, असे काही जाणकारांचे मत आहे. ‘थिअरी’ काहीही असली, तरी आपण आपले शरीर नेहमीच सुदृढ ठेऊन प्रतिकारशक्ती सक्षम ठेवणे गरजेचे असून, त्यातच शहाणपणा आहे!