सर्च रिसर्च : आता मागोवा लिथियमचा

Battery
Battery

लिथियम हे एक धातुवर्गीय मूलद्रव्य आहे. महाविस्फोटातून विश्वनिर्मिती झाली, तेव्हा जी दोन-चार मूलद्रव्ये तयार झाली त्यातील एक म्हणजे लिथियम. निसर्गामध्ये आढळणारा हा एक मऊ, चंदेरी आणि हलका धातू आहे. तो सुरीने सहज कापता येतो. इंग्लंडच्या विल्यम ब्रॅंडे यांनी २०० वर्षांपूर्वी प्रथम लिथियम धातू वेगळा काढून दाखवला. ग्रीक भाषेत लिथॉस म्हणजे दगड. हे मूलद्रव्य प्रथम दगडात सापडलं होतं म्हणून त्याला लिथियम नाव पडलं. ते शुद्ध करण्यासाठी विद्युत विच्छेदन (इलेक्‍ट्रोलिसिस) पद्धत वापरली होती. या धातूंमधून विजेचे किंवा उष्णतेचे वहन सुलभतेने होते. तो रासायनिक दृष्टीने अत्यंत क्रियाशील आहे. हवेतील पाणी आणि ऑक्‍सिजनशी तो क्रिया करून जळू शकतो. यामुळे लिथियम शुद्ध स्वरूपात सापडत नाही. हवेत तो ठेवला तर जळून जाईल आणि त्याचा स्फोटदेखील होऊ शकतो. त्याची ज्योत लालबुंद असते. हवेशी संपर्क येऊ नये म्हणून लिथियम पॅराफीन, पेट्रोलियम जेली  किंवा अन्य तेलात ठेवावा लागतो. त्याची घनता पाण्याच्या निम्मी आहे. 

औद्योगिक क्षेत्रात लिथियमचं महत्त्व सतत वाढत आहे. ॲल्युमिनियम-लिथियम मिश्रधातू हलके आणि मजबूत असल्याने वेगवान रेल्वे इंजिनात आणि विमानाच्या काही भागात वापरतात. उष्णतारोधक काच किंवा काही मृत्तिके (सिरॅमिक्‍स) बनवण्यासाठी लिथियमचा उपयोग होतो. यापासून उत्तम लिथियम स्टिरीएटनामक वंगण तयार करतात. मानसिक विकारांवर उपयुक्त ठरणारी गुणकारी औषधे तयार करताना लिथियमचा उपयोग होतो.

बहुतेक सगळ्या मोबाइल (स्मार्ट) फोनमध्ये, कॅमेऱ्यात, घड्याळात आणि लॅपटॉप संगणकात लिथियम आयॉन बॅटरीचा उपयोग केलेला असतो.

तथापि, सध्याच्या काळात लिथियमचा सर्वात महत्त्वाचा उपयोग बॅटरीवर धावणाऱ्या इलेक्‍ट्रिक मोटारींसाठी होणार आहे. याला इव्ही (इलेक्‍ट्रिक व्हेईकल) म्हणतात. स्कूटर, रिक्षा, टॅक्‍सी आदी वाहने लिथियम आयॉन बॅटरीवर चालावीत, अशी सरकारची अपेक्षा आणि त्यादृष्टीने प्रयत्न चालू आहेत. कारण ही बॅटरी पुनर्भारित (रिचार्जेबल) असते.              

अणुऊर्जानिर्मितीसाठी युरेनियम हे एक महत्त्वाचे मूलद्रव्य आवश्‍यक असते. भारताच्या अणुऊर्जा आयोगाची एक शाखा अणुखनिज संचालनालय म्हणून ओळखली जाते. ही संस्था देशांतर्गत मिळू शकणाऱ्या युरेनियमच्या किंवा थोरियमसारख्या मूलद्रव्यांच्या शोधात असते. युरेनियमचे खनिज मिळते तेव्हा ते शुद्ध स्वरूपात नसते. त्यात इतर मूलद्रव्ये असू शकतात.

साहाजिकच त्याच्या उपयुक्ततेसाठी काटेकोरपणे संशोधन करावे लागते. युरेनियमच्या साठ्याचा शोध घेताना क्वचित एखादे वेगळेच मूलद्रव्य हाती लागते. गेल्या काही महिन्यांमध्ये या प्रयोगशाळेचे काही संशोधक दक्षिण कर्नाटकातील एका जिल्ह्यात खनिजांचा मागोवा घेत होते. हे स्थान म्हैसूरजवळ असणाऱ्या मंड्या शहराजवळ आहे. येथील काही भागात संशोधकांना लिथियमचे साठे असल्याचे आढळून आले. आतापर्यंत त्यांना अर्धा कि. मी. रुंद आणि पाच कि. मी. लांब एवढ्या चिंचोळ्या पट्ट्यामध्ये लिथियम ऑक्‍साईड असल्याचा शोध लागला. हे खनिज तेथे अंदाजे तीस हजार तीनशे टन असावे असा प्राथमिक अंदाज आहे. त्याचे शुद्धीकरण केल्यावर त्यामधून सुमारे चौदा हजार शंभर टन उपयुक्त लिथियम मिळू शकेल. मात्र हा साठा काही फार मोठा आहे, असं नाही. कारण भारताने गेल्या वर्षी (किमान सुमारे) ९३ कोटी डॉलर खर्च करून लिथियम बॅटरींची आयात केली होती. अर्जेंटिना, बोलिव्हिया, चिली, चीन येथे मोठ्या प्रमाणात लिथियम मिळतं. अफगाणिस्तानात एक मोठा साठा सापडलेला आहे.

भारताला परदेशातून मोठ्या प्रमाणात लिथियम आयात करावे लागते. पण आता आपल्या देशात लिथियम मिळू शकेल, हे लक्षात आलंय. शोधा म्हणजे सापडेल, असं म्हणतात; म्हणूनच लिथियमचा मागोवा आपले संशोधक घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com