सर्च-रिसर्च : ‘कोरोना’वर ‘यूव्ही’चा मारा

डॉ. अनिल लचके
Thursday, 9 July 2020

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अनेक जण बाजारातून आणलेल्या वस्तू काही काळ दारात ठेवतात. नंतर पॅकिंगसह पाण्याने धुतात. स्टेनलेस स्टील, प्लॅस्टिक, पादत्राणे, काच, पुठ्ठा, लाकूड आणि कागदावर विषाणूचे अस्तित्व दोन ते सात दिवसांनीदेखील आढळलेय. नळाचे पाणी दहा दिवस झाकून ठेवल्यावर त्यातील ९९.९ टक्के विषाणू नष्ट झाले. गाळलेल्या पिण्याच्या पाण्यात विषाणूचे अस्तित्व नव्हते. हे प्रयोग ‘सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’मार्फत केले होते.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अनेक जण बाजारातून आणलेल्या वस्तू काही काळ दारात ठेवतात. नंतर पॅकिंगसह पाण्याने धुतात. स्टेनलेस स्टील, प्लॅस्टिक, पादत्राणे, काच, पुठ्ठा, लाकूड आणि कागदावर विषाणूचे अस्तित्व दोन ते सात दिवसांनीदेखील आढळलेय. नळाचे पाणी दहा दिवस झाकून ठेवल्यावर त्यातील ९९.९ टक्के विषाणू नष्ट झाले. गाळलेल्या पिण्याच्या पाण्यात विषाणूचे अस्तित्व नव्हते. हे प्रयोग ‘सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’मार्फत केले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोणत्याही पृष्ठभागावर कोरोनावर्गीय विषाणूंचे अस्तित्व काही काळ असते. तरी ते संसर्ग करण्याएवढे सक्षम असतीलच असे नाही. कारण बाह्य तापमानाचा आणि आर्द्रतेचा परिणाम त्यांच्या सक्षमतेवर होतो. थंड हवेत विषाणू टिकतात, पण ७० अंश से. तापमानाला निष्प्रभ होतात. विषाणूच्या बाह्यावरणातील जैविक रसायने साबणाच्या पाण्याने निघून जातात. कोरोनाबाधित व्यक्ती आपल्या जवळपास खोकली, थुंकली किंवा शिंकली तर संसर्ग होण्याची शक्‍यता वाढते.

कारण एका शिंकेवाटे निदान ३००० अतिसूक्ष्म थेंब वातावरणात तरंगतात. यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावलाच पाहिजे. व्यक्ती-व्यक्तींमधील संपर्क कमी केला, तरी अन्यत्र विषाणूंचा प्रादुर्भाव झालेला असतोच. त्यावर काय उपाय?

खाद्यान्न-प्रक्रिया, औषधनिर्मिती उद्योग, शस्त्रक्रिया किंवा दंतोपचाराची उपकरणे, पर्सनल प्रोटेक्‍शन इक्विपमेंट (पीपीई) जंतूविरहित करावे लागतात. विमान किंवा बसने प्रवास करताना संसर्ग होऊ शकतो. कपडे, प्रवासाच्या वस्तू वगैरे निर्जीव गोष्टी लवकर आणि रसायनमुक्त पद्धतीने जंतूविरहित करण्यासाठी संशोधक प्रयत्नशील आहेत.

त्यासाठी अतिनील (यूव्ही) किरणांचा उपयोग करण्याचे प्रयोग होत आहेत. सूर्यप्रकाशात यूव्ही-ए, यूव्ही-बी आणि यूव्ही-सी असे तीन प्रकारचे अतिनील किरण असतात. त्यांची तरंग लांबी २०० ते ४०० नॅनोमीटर असते. वसुंधरेवरील ओझोनचे छत्र जीवसृष्टीला उपकारक आहे. ते यूव्ही-सी किरणे शोषून घेते. यूव्ही-सी किरणांची तरंग लांबी १०० ते २८० नॅनोमीटर असून, ती जीवसृष्टीला घातक आहेत. सुदैवाने यूव्ही-सी आपल्यापर्यंत येऊन पोचत नाहीत. या किरणांच्या साहाय्याने प्रयोगशाळेतील उपकरणे निर्जंतुक करता येतात. हे गेली शंभर वर्षे माहिती आहे. पण आता कमी विद्युतदाब (कमी ऊर्जा) वापरून जास्त परिणामकारक यूव्ही-सी झोत तयार करणारे लाईट इमिटिंग डायोडचे (एलइडीचे) ‘दिवे’ तयार करण्यात यश आले आहे.           

काही कंपन्यांनी यूव्ही-सी किरण प्रक्षेपित करणारी उपकरणे तयार केली आहेत. त्यात यूव्ही-सी प्रक्षेपित करणाऱ्या ‘एलईडी’चा वापर केलाय. यूव्ही-सीच्या माऱ्यामुळे सूक्ष्मजीवांच्या डीएनए (जेनेटिक मटेरियल) मध्ये बरेच बदल होतात. परिणामी ९० टक्‍क्‍यांहून जास्त अपायकारक जीवाणू,विषाणू झपाट्याने निष्प्रभ होतात. या किरणांची भेदक-शक्ती तीव्र असल्यामुळे कोरोनाचे विषाणू नाश पावतात. या उपकरणांचा उपयोग रुग्णालयातील उपकरणे, पीपीई आणि कपडे निर्जंतुक करण्यासाठी होईल. यूव्ही-सी एलईडी ‘दिवे’ विमानांमध्ये, बसमध्ये लावता येतील आणि प्रवासी उतरण्याच्या आधी आणि नंतर निर्जंतुकीकरणाकरिता ते मिनिटभर लावले जातील. एखाद्या छोट्या बोगद्यात यूव्ही सी दिव्यांच्या ‘माळा’ लावून त्यातून बस हळूहळू नेली तर ती बाहेरूनही निर्जंतुक होईल. साहाजिकच ही वाहने कमी खर्चात आणि कमी वेळेत अंतर्बाह्य निर्जंतुक होतील. मात्र सुरक्षिततेसाठी माणसाच्या अंगावर ती किरणे पडणार नाहीत, अशी व्यवस्था करावी लागेल. या पद्धतीमध्ये रसायनांचे प्रदूषण होणार नाही आणि भौतिकी पद्धतीने, स्वस्तात ‘कोविड-१९’सारख्या विषाणूंचा नाश करता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr anil lachake on UV