सर्च-रिसर्च : ऑक्‍सिमीटरचा ‘वर्णभेद’?

डॉ. जयंत गाडगीळ
Saturday, 12 September 2020

विज्ञानातील संशोधक नसलेले पत्रकारही सजग असले, तर सर्वसामान्यांचे प्रबोधन करू शकतात याचे एक छान उदाहरण वाचनात आले. बोस्टनच्या एका पत्रकार महिलेच्या नवऱ्याच्या रक्तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण मोजावे लागले. ते एरवी गंभीर न वाटणारे, पण कमी ऑक्‍सिजनचे प्रमाण दाखवत होते. तांत्रिकदृष्ट्या रुग्णालयात दाखल करावे एवढे गंभीर नव्हते. पण प्रत्यक्ष लक्षणे गंभीर वाटल्याने तिने ऑक्‍सिमीटरच्या अचूकपणाचा पाठपुरावा चालू केला. तिचा पती गौरेतर वर्णीय होता.

विज्ञानातील संशोधक नसलेले पत्रकारही सजग असले, तर सर्वसामान्यांचे प्रबोधन करू शकतात याचे एक छान उदाहरण वाचनात आले. बोस्टनच्या एका पत्रकार महिलेच्या नवऱ्याच्या रक्तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण मोजावे लागले. ते एरवी गंभीर न वाटणारे, पण कमी ऑक्‍सिजनचे प्रमाण दाखवत होते. तांत्रिकदृष्ट्या रुग्णालयात दाखल करावे एवढे गंभीर नव्हते. पण प्रत्यक्ष लक्षणे गंभीर वाटल्याने तिने ऑक्‍सिमीटरच्या अचूकपणाचा पाठपुरावा चालू केला. तिचा पती गौरेतर वर्णीय होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपल्या बोटातून अवरक्त प्रकाशलहरी आणि लाल प्रकाशलहरी ऑक्‍सिमीटर पाठवते. बोटातून आरपार जाऊन या लहरी दुसऱ्या बाजूला जातात. तेथे त्या यंत्रातील सेन्सर त्या लहरींचे प्रमाण मोजतात. आपल्या रक्तात ऑक्‍सिजन जातो, तेव्हा त्याचे ऑक्‍सिहिमोग्लोबिन या लालबुंद पदार्थात रुपांतर होते. हा पदार्थ लाल लहरी काही प्रमाणात शोषून घेतो. जितके रक्तातील ऑक्‍सिहिमोग्लोबीनचे प्रमाण जास्त, तितक्‍या जास्त लाल प्रकाशलहरी शोषल्या जातात. त्यामुळे बोटाच्या दुसऱ्या बाजूला येणाऱ्या लाल प्रकाशलहरी कमी दिसतात.  ऑक्‍सिमीटरमध्ये सर्वसाधारण किती ऑक्‍सिजन असेल तर किती लाल लहरी आरपार जातात, याचा अभ्यास करून त्याची मापनाशी सांगड घातलेली असते. या यंत्रासाठी ज्या चाचण्या घेतात, त्या अनेकदा युरोप व अमेरिकेसारख्या प्रगत देशांत असलेल्या गौरवर्णीयांच्या आधाराने घेऊन त्याला नॉर्मल मानतात. मात्र फक्त ऑक्‍सिहिमोग्लोबिन हा एकच पदार्थ या लाल प्रकाशलहरी शोषून घेऊ शकतो, असे नाही. मानवी त्वचेचा रंग ठरतो, तो त्या त्वचेत असणारी मेलॅनिनसारखी रंगद्रव्ये, कमी- जास्त प्रमाणात असतात त्याप्रमाणे त्वचा काळी, गोरी, निमगोरी, गहूवर्णीय अशी ठरते. ही रंगद्रव्येसुद्धा अवरक्त व लाल प्रकाशलहरी वेगवेगळ्या प्रमाणात शोषून घेतात. त्यामुळे ऑक्‍सिमीटरमध्ये जेव्हा जास्त प्रकाशलहरी शोषल्या गेल्या असतात, तेव्हा ते यंत्र असा अर्थ लावते, की या माणसाच्या रक्तात ऑक्‍सिजनचे प्रमाण जास्त आहे.

खरेतर त्वचेच्या रंगामुळे शोषलेल्या लहरींची त्यात दखल घेतलेली नसते. त्यामुळे पुरेसा ऑक्‍सिजन आहे असे वाटते, तेव्हा खरेतर प्रत्यक्षात ऑक्‍सिजनची पातळी यंत्रात दाखवल्यापेक्षा कमी असते. म्हणून त्या पत्रकार महिलेच्या नवऱ्याची यंत्रावरची ऑक्‍सिजन पातळी नॉर्मल दिसत नसताना तो प्रत्यक्षात रुग्णालयात दाखल करण्याइतका गंभीर अवस्थेत होता. तिने या विषयावरील शोधनिबंध शोधले, तेव्हा २००५पासून यावर संशोधकांनी काम केलेले आहे, असे कळाले. मात्र याची जाण सर्वसामान्य लोकांनाच नव्हे, तर वैद्यकीय क्षेत्रात असे मोजमाप करणाऱ्यांनाही नाही. म्हणून तिने यावर लेख लिहिला. 

आपल्याला प्रश्न पडेल, की नेमकी किती त्रुटी राहात असेल? तर आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या ऑक्‍सिमीटरमध्ये ७ ते ९ एककाने हे कमी आढळते. साधारणपणे ९० ते १००च्या दरम्यान आकडा हा रक्तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण नॉर्मल आहे असे मानतात. तर एरवी घाबरायचे कारण नाही, पण जी सीमारेषेवरील व्यक्ती असेल ती खरे तर कमी ऑक्‍सिजन असणारी म्हणून त्यादृष्टीने वैद्यकीय उपचार करावे लागतील. खबरदारीचा उपाय म्हणून आता आपल्याकडे बरेच जण ऑक्‍सिमीटर घरीच ठेवू लागले आहेत. विशेष उजळवर्ण असणाऱ्यांच्या बाबतीत हा आकडा शंभरपेक्षा जास्त जाताना अनेकांना आढळला असेल. (खरेतर १०० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऑक्‍सिजन ही संकल्पनाच अर्थहीन आहे.) खरी समस्या अशी की आपण सरसकट सगळ्यांच्या ऑक्‍सिजन पातळीतून ८ किंवा ९ किंवा कोणताही विशिष्ट आकडा वजा करू शकत नाही.

युरोपपमध्ये गौरवर्णीय व गडद रंगाचे अशी दोन टोके असली, तरी भारतात मात्र वंशांच्या सरमिसळीमुळे त्वचेचा रंग खूप वेगवेगळा असतो. काही सौंदर्यप्रसाधने गौर, मध्यम, गडद असा तीन वर्णांच्या लोकांसाठी वेगवेगळी असतात, तसे विविध वर्णांच्या लोकांसाठी वेगवेगळे ऑक्‍सिमीटर व्यवहार्य नाहीत. मात्र यामुळे एकदम हडबडून घाबरून जायचे कारण नाही. काळजी करू नये, काळजी घ्यावी आणि वैद्यकीय व्यावसायिकांनीही याची जाण ठेवावी, एवढाच त्या पत्रकार महिलेचाही लेख लिहिताना उद्देश होता.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Dr Jayant Gadgil on Oxymeter