सर्च-रिसर्च : अन्नधान्यावरील जागतिक संकट

Tol-Attack
Tol-Attack

भारतासह संपूर्ण आफ्रिकेतील अनेक देशांत यावर्षीच्या सुरुवातीपासूनच टोळधाडीने हाहाकार माजविला. हजारो हेक्‍टरवरील उभ्या पिकांचे नुकसान करून तिने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला. शास्त्रीय भाषेत ‘शिस्टोसेक्रा ग्रिगेरिया’ नाव असलेला हा कीटक झुंडीच्या स्वरूपात आल्यास त्याला जगातील सर्वांत घातक कीटक मानले जाते. कारण हा कीटक तीन महिन्यांत संख्येने वीस पट वाढतो आणि एका चौरस किलोमीटर परिसरात त्यांची संख्या आठ कोटींपर्यंत पोचते...

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टोळधाड धोकादायक ठरण्यात त्यांचा पीक नष्ट करण्याचा धडाका कारणीभूत ठरतो. एका चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले हे आठ कोटी टोळ ३५ हजार लोकांच्या जेवणाइतके अन्न फस्त करतात. या वर्षी केनिया, इथोपिया, युगांडा, सोमालिया, भारत, पाकिस्तान, इराण, येमेन, ओमान व सौदी अरेबिया या देशांत टोळधाड आली होती. अशा प्रकारे अनेक देशांत एकाच वेळी टोळधाड आल्यास त्याला ‘प्लेग’ म्हणतात. केनियासारख्या अविकसित देशात अशी टोळधाड आल्यास त्याच्या आर्थिक परिणामांबरोबरच लोकांच्या मानसिकतेवरही मोठा विपरीत परिणाम होत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. या देशात महिलांचा शेतीत मोठा सहभाग असल्याने त्यांना मोठा फटका बसतो, तर या टोळांना पळवून लावण्यासाठी मुले हाकारे देतात. या दोन घटकांवर टोळधाडीचा परिणाम दिसतो.

टोळधाडीवरील उपायांची दिशा
केनियातील निसर्गसंवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञ मोसेस म्युली यांच्या मते, ‘‘टोळधाड रोखण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीचा उपयोग मुख्यत्वे केला जातो. ही रसायने शेतकऱ्यांपर्यंत थेट पोचवली जातात. मात्र, ‘कोरोना’काळात लॉकडाउनमुळे वितरण साखळी विस्कळित होऊन कीटकनाशके शेतकऱ्यांपर्यंत पोचू शकली नाहीत. त्याचबरोबर ही रसायने पिकांवर फवारल्यास ती पर्यावरण व मानवासाठी हानिकारक ठरतात. याला पर्याय म्हणून ड्रोनचा वापर केला जातो. ड्रोन टोळधाडीचा माग घेतात व शेतात येण्याआधीच रसायनांचा फवारा करून त्यांचा नायनाट करतात.

त्याचबरोबर इलेक्‍ट्रिक ग्रीडमध्ये कंपने निर्माण करून त्याचा उपयोग टोळांना घाबरवण्यासाठी केला जातो. हे ग्रीड शेतात पसरवून विजेच्या धक्‍क्‍याने टोळांना मारण्याचे प्रयोगही काही ठिकाणी केले जातात. मात्र, हा प्रयोग टोळधाड छोटी असल्यासच उपयोगी ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे.

बुरशीचा जैविक अस्त्रासारखा वापर करून टोळांना ठार मारण्याचा प्रयोगही केला जातो. यासाठी बुरशीवर आधारित मेटार्हीझिअम ॲक्रिडमसारखे कीटकनाशक वापरले जाते. या कीटकनाशकांमुळे पर्यावरणाची फारशी हानी होत नाही, मात्र त्यामुळे टोळांना मारण्यासाठी अधिक काळ लागत असल्याने पारंपरिक कीटकनाशकांच्या तुलनेत पिकांचे अधिक नुकसान होते.

हवामानाच्या अंदाजाप्रमाणे टोळधाडीचा अंदाज वर्तविणारी केंद्रे उभारल्यास शेतकऱ्यांना आगाऊ माहिती मिळून टोळधाडीच्या मुकाबल्यासाठी सज्ज होता येते. लांबलेल्या दुष्काळानंतर मोठा पाऊस आल्यास टोळधाडीची शक्‍यता वाढते. अशी स्थिती निर्माण झाल्यास ही केंद्रे शेतकऱ्यांना माहिती देतील व त्यांना फवारणीसाठी अधिक वेळ मिळेल.’’

संयुक्त राष्ट्रसंघात शाश्वत विकासाच्या प्रकल्पावर काम करणारे संशोधक इझ्रा योगो यांच्या मते, ‘‘हवामानातील टोकाच्या बदलांमुळे भविष्यात टोळधाडींची संख्या वाढण्याची भीती आहे. उदा. भारतीय समुद्रांतील वादळानंतर पश्‍चिम आशियातील देशांत टोळांसाठी प्रजननाची अनुकूल स्थिती निर्माण झाली व त्याचा फटका या देशांना बसला. अशी पोषक स्थिती वारंवार निर्माण झाल्यास जगभरात टोळधाडी वाढतच जातील. लवकरच सुगी येणाऱ्या भागात जाऊन टोळ अंडी घालतात व पिकांवर हल्ला करतात.’’ थोडक्‍यात, हवामानबदलाचा उपयोग करून येणाऱ्या या टोळधाडी जगभरात अन्नधान्याचा प्रश्न तीव्र करणार, असे दिसते.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com