सर्च-रिसर्च : महिलांची महिलांसाठीची भाषा!

महेश बर्दापूरकर
Wednesday, 7 October 2020

भाषा हे संपर्काचे सर्वांत मोठे साधन मानले जाते; मात्र एखाद्या समाजातील विशिष्ट वर्गातील महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवले गेल्यास त्यांनी एकमेकांशी संपर्क साधायचा तरी कसा? चीनमधील हुनान प्रांतातील महिलांपुढे हीच समस्या होती व त्याचे उत्तर त्यांनी आपली स्वतःची भाषा आणि तिची लिपी विकसित करून शोधले. गेल्या काही दशकांत मृत झालेल्या ‘नुशू’ या भाषेचे आता पुनरुज्जीवन होते आहे.

भाषा हे संपर्काचे सर्वांत मोठे साधन मानले जाते; मात्र एखाद्या समाजातील विशिष्ट वर्गातील महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवले गेल्यास त्यांनी एकमेकांशी संपर्क साधायचा तरी कसा? चीनमधील हुनान प्रांतातील महिलांपुढे हीच समस्या होती व त्याचे उत्तर त्यांनी आपली स्वतःची भाषा आणि तिची लिपी विकसित करून शोधले. गेल्या काही दशकांत मृत झालेल्या ‘नुशू’ या भाषेचे आता पुनरुज्जीवन होते आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हुनान हा चीनमधील ८० टक्के डोंगराळ भाग असलेला दुर्गम परिसर. येथेच ‘नुशू’ ही जगातील फक्त महिलाच वापरत असलेली भाषा जन्मली. ‘नुशू’ या चिनी शब्दाचा अर्थच ‘महिलांची लिपी’ असा आहे. या भाषेच्या जन्माचे कारण समाजाने त्यांना व्यक्त होण्यास केलेली मनाई हेच होते. भाषातज्ज्ञांच्या मते, या भाषेचा जन्म साँग काळात ( इ.स.९६० ते १२७९ ) झाला असावा. महिलांना शिक्षण नाकारलेल्या या काळात ही भाषा आईकडून मुलीकडे व एकमेकींच्या मैत्रिणीकडे जात विकसित होत गेली. या अशिक्षित महिला भाषेची लिपी पाहून, ती गिरवत भाषा शिकल्या व ती आजपर्यंत टिकून राहिली. बाहेरच्या जगाला या भाषेची ओळख झाली १९८०मध्ये. पुवेई हे छोटे गाव आता या भाषेच्या पुनरूत्थानाच्या कामात अग्रेसर आहे. या गावातील झिन हू यांच्या मते, ‘‘नुशू एकेकाळी चार तालुके आणि १८ खेड्यांमध्ये बोलली जात होती.

त्यानंतर तज्ज्ञांना १९८० मध्ये दोनशे वस्तीच्या पुवेई गावात ही भाषा लिहू शकणाऱ्या तिघी जणी सापडल्या व हे गाव ‘नुशू’चे केंद्रस्थान बनले. चिनी सरकारने २००६ मध्ये या भाषेला सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर केले व पुढील वर्षी या गावात भाषेत संग्रहालय उभारले गेले’’.    

‘नुशू’ ही बोली भाषा असून, ती डावीकडून उजवीकडे वाचतात. ही भाषा जिआंगयाँग प्रांतातील चार स्थानिक बोलीभाषांच्या संगमातून बनली आहे. तिची लिपी चिनी भाषेच्या लिपीपासून प्रेरणा घेऊन बनली आहे, मात्र ती अधिक लांबलचक, धाग्यासारखे स्ट्रोक्‍स असलेली व खालच्या बाजूला फराटे ओढलेली दिसते. तिच्या एकंदरीत रूपावरून या भाषेला ‘मॉस्क्‍युटो रायटिंग’ असेही म्हणतात. मैत्रिणीला भेट दिलेले रुमाल, हेअरबॅंड, हातपंखे आणि कमरेच्या पट्ट्यांवर ‘नुशू’मधील मैत्रीचे संदेश महिला एकमेकींना पाठवत. वृद्ध महिला स्वतःचे आत्मचरित्रात्मक गीत तयार करून आपल्या आयुष्यातील कष्ट किंवा संस्काराचे दोन शब्द पुढील पिढीतील महिलांना सांगत. चीनच्या ग्रामीण संस्कृती महिलांना आपले दुःख, कष्ट, शेतीतील अडचणी सांगण्यास परवानगी नव्हती. ‘नुशू’ने या कठीण काळात महिलांसाठी मैत्रिणी बनवण्याचे व दुःख सांगण्याचे माध्यम म्हणून काम केले.

भाषेच्या माध्यमातून मैत्री झालेल्या तीन- चार महिलांच्या गटाला ‘स्वॉर्न सिस्टर्स’ नावाने ओळखले जायचे. पुवेई गावात २०००मध्ये ‘नुशू’ शाळा सुरू झाली व झिन हू यांनी विद्यार्थ्यांना ही भाषा शिकवायला सुरुवात केली, संग्रहालयाला भेट देणाऱ्यांना भाषेची माहिती देण्यास सुरुवात केली व आशिया व युरोप खंडामध्ये या भाषेची माहिती देण्यासाठी दौरेही केले. त्यांच्या मते, ‘‘लोकांना ही भाषा शिकायला आवडते, कारण ही त्यांची एकमेवाद्वितीय अशी संस्कृती आहे.’’ झोऊ शुयोयी यांनी या भाषेवर १९५०च्या दशकात काम केले, मात्र माओंच्या राज्यात त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागली. मात्र, २००३मध्ये त्यांनी ‘नुशू’चे भाषांतर करून पहिला शब्दकोश तयार केला. आता प्रत्येक उन्हाळ्याच्या सुटीत पुवेईमधील संग्रहालयात ‘नुशू’चे वर्ग चालतात. ही भाषा लिहायला, उच्चारायला अवघड आहे. मात्र, आता ती व्यवहारात आणि पर्यटनाला चालना देण्यासाठीही वापरली जाते आहे. त्याचबरोबर जतन आणि वारसा म्हणूनही तिचे महत्त्व मोठे आहे. चीनमधील महिला सबलीकरणाचा उत्कृष्ट नमुना म्हणून ‘नुशू’ आणि तिच्या पुनरूत्थानाकडे संशोधक पाहत आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article mahesh badrapurkar on women