esakal | सर्च-रिसर्च : शतपावली करेल शतायुषी
sakal

बोलून बातमी शोधा

Walking

रात्रीचे जेवण झाल्यावर शतपावली करावी म्हणजे खाल्लेले अन्न चांगले पचते, आरोग्य चांगले राहते, असे जुनेजाणते लोक सांगतात. आधुनिक जीवनशैली आणि आहाराची बदलेली पद्धत यामुळे शहरातील ‘रनिंग ट्रॅक’सह गावातील रस्त्यांवर ‘मॉर्निंग वॉक’साठी किंवा फिरायला जाणारे जागरूक नागरिक मोठ्या संख्येने दिसतात.

सर्च-रिसर्च : शतपावली करेल शतायुषी

sakal_logo
By
सम्राट कदम

रात्रीचे जेवण झाल्यावर शतपावली करावी म्हणजे खाल्लेले अन्न चांगले पचते, आरोग्य चांगले राहते, असे जुनेजाणते लोक सांगतात. आधुनिक जीवनशैली आणि आहाराची बदलेली पद्धत यामुळे शहरातील ‘रनिंग ट्रॅक’सह गावातील रस्त्यांवर ‘मॉर्निंग वॉक’साठी किंवा फिरायला जाणारे जागरूक नागरिक मोठ्या संख्येने दिसतात.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लोकांच्या रोजच्या गरजा ओळखून त्यावर ऑनलाइन ‘सोल्युशन’ देणाऱ्या ‘गुगल’बाबाने रोजच्या पावलांचा हिशेब देणाऱ्या ‘ॲप’ची निर्मिती केली आहे. आज ‘इथ’पासून ‘तिथं’पर्यंत ‘इतके’ पायी चाललो, असा लेखाजोखा मांडणारा स्टेट्‌सही ‘टेक्‍नोसॅव्ही’ मंडळी ठेवतात. पण खऱ्या अर्थाने असे चालणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असते काय? नक्की रोज किती चालायला हवे? यासंबंधी कोणते शास्त्रीय अध्ययन झाले आहे काय? म्हणजे निदान ‘शास्त्र असतं ते’ असे म्हणायला आपण मोकळे!

‘रोज दहा हजार पावले चालले म्हणजे आरोग्य उत्तम राहते’, असा अलिखित रोखठोक ‘सल्ला’ जगभर देण्यात येतो. परंतु जगभर मान्य असलेल्या या सहजसोप्या व्यायामाविषयी आता शास्त्रज्ञांनी प्रश्‍न उपस्थित केला आहे. ‘आरोग्य उत्तम राहण्यासाठी रोज दहा हजारच पावले चालले पाहिजे असे काही नाही. रोज ८ ते १२ हजार पावलांच्या दरम्यान चालले तरी ते उत्तम ठरेल,’ असे एका शोधनिबंधात स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजे अगदी मोजून मापून दहा हजार पावले चालण्याचा अट्टाहास कमी होईल. ‘अमेरिकन मेडिकल असोसिएशन’च्या शोधपत्रिकेत नुकताच यासंदर्भातील शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. 

जास्त चाला, जास्त जगा
अमेरिकेत २००३ ते २००६ दरम्यान राष्ट्रीय मृत्यू निर्देशांकाची एका संशोधनाच्या आधारे तपासणी करण्यात आली. रोजच्या चालण्याचा व्यक्तीच्या आरोग्यावर किती परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यासाठी ४० वर्षे वय असलेल्या ४८५० लोकांची या संशोधनासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या चालण्याच्या प्रमाणात दर सात दिवसांनी वाढ करण्यात आली. त्यातून प्राप्त झालेली माहिती निश्‍चितच लाभदायी आहे. रोज आठ हजार पावले चालल्यामुळे संबंधित व्यक्तीमध्ये ५१ टक्के मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या आरोग्य समस्यांचा धोका कमी झाला, तर रोज बारा हजार पावले चालणाऱ्या व्यक्तीमध्ये हाच धोका १४ टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाला. कर्करोग आणि हृदयविकाराच्या रुग्णांसाठी रोज चालणे जास्त आरोग्यदायी असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. रोज किती चालावे असा ‘थम्ब रूल’ नाही. कारण व्यक्तीचे वय, खाण्याची पद्धत, राहण्याचे ठिकाण, ‘बीएमआय,’ सवयी आदी बाबींवर चालल्यामुळे होणारे फायदेही अवलंबून असतात. नियमितपणे चालणे आरोग्याला हितकारी असल्याचे संशोधनातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. चालण्याचा आणि आरोग्याचा सहसंबंध अधिक विस्तृतपणे समजण्यासाठी सखोल संशोधन होणे गरजेचे आहे.

सर्वसामान्य व्यक्तीला सहजसोपा असणारा चालण्यासारखा व्यायाम प्रकार आरोग्यासाठी अधिक लाभदायी कसा ठरेल, यासंबंधी होणारे संशोधन उपयुक्त ठरणार आहे. दुर्धर आजार असलेल्या रूग्णांनी डॉक्‍टरांकडून चालण्यासंदर्भात अधिक माहिती घेणे गरजेचे आहे. जेणेकरून चालण्याचे जास्तीत जास्त फायदे संबंधित व्यक्तीला मिळतील. एकंदरीत हृदयविकार, कर्करोग आदी आजारांवर जास्तीत जास्त चालणे आरोग्यदायी ठरणार आहे. पण, त्याचबरोबर निरोगी आयुष्य जगण्यासाठी रोज चालणे शंभर टक्के लाभदायी ठरेल यात शंका नाही.