सर्च-रिसर्च : सापेक्षतावादाचा ‘साक्षात्कार’

एम-८७ दीर्घिकेच्या केंद्रातील कृष्णविवराची प्रतिमा.
एम-८७ दीर्घिकेच्या केंद्रातील कृष्णविवराची प्रतिमा.

‘मैं समय हूँ, मेरा जन्म सृष्टी के निर्माण के साथ हुआ था.....’ दूरदर्शनवरील ‘महाभारत’ मालिकेची सुरुवात करणाऱ्या ‘काळा’चे हे निवेदन सर्वांच्या स्मरणात असेल. अनादी अनंत असलेला ‘काळ’ही गुरुत्वाकर्षणानुसार सापेक्ष असतो, अशी मांडणी करणारा अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा सापेक्षतावादाचा सिद्धांत (जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हीटी) आजही अनेकांच्या बौद्धिक विश्‍वावर गारूड घालून आहे. सापेक्षतावादाच्या साक्षात्काराची अनुभूती देणारे एक निरीक्षण नुकतेच शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे. आइन्स्टाईनच्या सिद्धांताची अल्पशी पुष्टी या निमित्ताने पुन्हा एकदा झाली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

२०१९ च्या जुलै महिन्यात कृष्णविवराच्या आतील प्रतिमा मिळवण्यात शास्त्रज्ञांना यश आले. इव्हेंट होरायझोन टेलिस्कोपने ५.५ कोटी प्रकाशवर्षे दूर असलेल्या एम-८७ दीर्घिकेच्या केंद्रातील कृष्णविवराची प्रतिमा मिळवली. विश्‍वाच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या गुरुत्वाकर्षणाचा उत्तम नमुना म्हणजे कृष्णविवर! सापेक्षतावादाच्या सिद्धांतामधील गुरुत्वाकर्षणामुळे वक्र होणारे अवकाश आणि वेळ इथेच तर मिळतो. कालपर्यंत ज्याच्या तावडीतून प्रकाशकिरणही सुटू शकत नाही, अशा गूढ कृष्णविवरात डोकावणारी एक खिडकीच शास्त्रज्ञांना उपलब्ध झाली. विश्‍वाच्या निर्मितीचे रहस्य आणि आइन्स्टाईनच्या सापेक्षतावादाचे पुरावे या खिडकीतून डोकावल्यावर मिळणार आहेत. गेले वर्षभर शास्त्रज्ञ या कृष्णविवराच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. आतापर्यंत मिळालेल्या निरीक्षणानुसार कृष्णविवर ‘सापेक्षतावादा’चे पालन करत असल्याचे समोर आले आहे.

म्हणजेच अति गुरुत्वाकर्षणामध्ये प्रकाश आणि अवकाशाचे होणारे वर्तन, यामुळे काही अंशी का होईना स्पष्ट होताना दिसत आहे. जगभरातील शास्त्रज्ञांचा सहभाग असलेले हे संशोधन ‘फिजिकल लेटर रिव्ह्यू’ या शोधपत्रिकेत नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. आइन्स्टाईनने १९१५मध्ये सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला, तेव्हा त्यावर कोणी फारसा विश्‍वास ठेवायला तयार नव्हते. कारण आइन्स्टाईनचा हा सिद्धांत न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताला थेट आव्हान देत होता. गुरुत्वाकर्षण हे पृथ्वीच्या (ग्रह, तारे आदी) आत असलेले कोणते बल नसून, तिच्या वस्तुमानामुळे वक्र झालेले अवकाश आणि काळ यांचा परिणाम आहे, अशी मांडणी आइन्स्टाईनने केली. पुढे तर ते म्हणाले, की अवकाश वक्र झाल्यामुळे प्रकाशकिरणांचाही मार्ग बदलतो.

त्यांच्या या सिद्धांतावर वैज्ञानिक जगतात बरेच तर्क-वितर्क केले गेले. पण २९ मे १९१९ रोजी सर एडिंग्टन यांनी खग्रास सूर्यग्रहणाच्या दिवशी, सूर्याच्या मागून येणाऱ्या ताऱ्याच्या प्रकाशकिरणांचा मार्ग गुरुत्वाकर्षणामुळे वक्र झालेल्या अवकाशामुळे बदलल्याचे सिद्ध केले आणि वैज्ञानिक जगतात न्यूटननंतरचे महान शास्त्रज्ञ म्हणून अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा उदय झाला. एडिंग्टन यांच्या प्रयोगातून सापेक्षतावादाचा काही भाग सिद्ध झाला. कारण आपल्या सूर्याचे गुरुत्वाकर्षण सापेक्षतावादाचे सगळेच कंगोरे सिद्ध करण्यासाठी पुरेसे नव्हते.

या सिद्धांताची अधिक पडताळणी करण्यासाठी कृष्णविवरासारख्या प्रचंड वस्तूमानातून (सूर्याच्या वस्तूमानापेक्षा दोन पटीने अधिक) निर्माण होणारे गुरुत्वाकर्षण आवश्‍यक होते. मागील वर्षी मिळालेल्या कृष्णविवराच्या आतील प्रतिमेने सापेक्षतावादाच्या पुढच्या पडताळ्याची संधी उपलब्ध करून दिली.

शास्त्रज्ञांनी हीच संधी साधत ‘सेकंड ऑर्डर’ गणितीय पडताळ्यांची चाचणी केली आणि ती काही अंशी यशस्वीही झाली. कृष्णविवरामध्ये अवकाश आणि काळाचे वर्तन सापेक्षतावादाचा पडताळा देत असल्याचे स्पष्ट होते. तरीही अधिक स्पष्ट करण्यासाठी या कृष्णविवराचे गुरुत्वाकर्षणही पुरेसे नसल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. यासाठी आपल्या आकाशगंगेच्या केंद्रकातील महाकाय कृष्णविवराची प्रतिमा मिळवणे आणि त्याची निरीक्षणे घेणे गरजेचे आहे.

म्हणजे त्यातून आइन्स्टाईनच्या सापेक्षतावादाची अधिक पडताळणी तर होईलच, पण त्याचबरोबर विश्‍वनिर्मितीच्या कोड्यातील एखादे रहस्यही सुटेल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com