हवामानबदल : उष्णतेची शहरी बेटे

संतोष शिंत्रे
Friday, 14 August 2020

भारतातील बत्तीस टक्के इतके लोक, जे जागतिक लोकसंख्येच्या सात टक्के आहेत, ते शहरांमध्ये राहतात. ‘आयआयटी खडगपूर’मधील शास्त्रज्ञांच्या एका समूहाने ४४ भारतीय शहरांच्या २००० ते २०१७ या काळातील सर्व ऋतूंमधील तापमानाचा अभ्यास केला. त्यातून यातील बहुतांश शहरे जागतिक तापमानवाढीमुळे ‘अर्बन हीट आयलंड’ ( यूएचआय) बनली असल्याचे स्पष्ट झाले. तापमानाच्या या मोजण्या उपग्रहाधारित आणि अचूक होत्या.

भारतातील बत्तीस टक्के इतके लोक, जे जागतिक लोकसंख्येच्या सात टक्के आहेत, ते शहरांमध्ये राहतात. ‘आयआयटी खडगपूर’मधील शास्त्रज्ञांच्या एका समूहाने ४४ भारतीय शहरांच्या २००० ते २०१७ या काळातील सर्व ऋतूंमधील तापमानाचा अभ्यास केला. त्यातून यातील बहुतांश शहरे जागतिक तापमानवाढीमुळे ‘अर्बन हीट आयलंड’ ( यूएचआय) बनली असल्याचे स्पष्ट झाले. तापमानाच्या या मोजण्या उपग्रहाधारित आणि अचूक होत्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दाट लोकवस्तीच्या शहरांच्या मुख्य भागाचे तापमान त्याच्या काहीशा बाहेर असणाऱ्या उपनगरी भागांपेक्षा २ अंश सेल्सिअसने जास्त असणे म्हणजे ते शहर ‘उष्णतेचे बेट’ झाले आहे, असे म्हटले जाते. असे बेट होणे हे मुख्यत्वे चार कारणांसाठी धोक्‍याचे असते. असे झाल्याने त्या शहराची उर्जेची (पंखे, वातानुकूलन यासाठी) गरज अनाठायी वाढून बसते. अशा शहरात हवाप्रदूषक पदार्थ अधिक प्रमाणात उत्सर्जित होतात, तसेच हरितगृह वायूंचे उत्सर्जनही जास्त होते. परिणामी मानवी आरोग्य ढासळते आणि पाण्याच्या गुणवत्तेवर खूप वाईट परिणाम होतो.

उष्णतेसाठी कारणीभूत घटक
रस्ते, पदपथ, छपरे आदींच्या बांधकामासाठी वापरले जाणारे काँक्रिट, अस्फाल्ट (टार), विटा हे सर्व पदार्थ उष्णता शोषून घेणारे असतात. तसेच ते अ-पारदर्शी असल्याने ते प्रकाश परावर्तित करीत नाहीत. ग्रामीण भागातील बांधकामाच्या साहित्यापेक्षा या सर्वच सामग्रीची उष्णता वहन करण्याची क्षमताही पुष्कळ जास्त असते. खेरीज ग्रामीण भागात (अद्याप तरी) मोकळ्या जागा, वृक्ष शहरांपेक्षा अधिक असल्यानेही ते कमी उष्ण राहतात. वृक्षांमधील बाष्पोच्छ्ववास प्रक्रियेमुळेही उष्णता वाढण्यास तेथे प्रतिबंध होतोच. शहरी भागात असे साहित्य वापरल्याने सांडपाण्यात आणि तेथून शहरानजीकच्या तळी, तलाव यांमध्ये गरम पाणी सोडले जाते. त्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. या अभ्यासात एकेकाळी शहरांतर्गत सुंदर जलाशय असलेली भोपाळ, बेंगळूर, हैदराबाद, श्रीनगर अशी अनेक शहरे आपले सौंदर्य गमावून बसली आहेत हे नोंदवले आहे. ‘यूएचआय’मध्ये रूपांतरित झालेल्या अनेक शहरांमधील हवेची गुणवत्तादेखील ढासळते. औद्योगिक आणि वाहनांचे निघणारे धूर, सूक्ष्म धूलिकण यांचे प्रमाण वाढल्याने असे होते. जास्त तापमान फायदेशीर असणारे मुंग्या, पाली, सरडे असे प्राणी वाढतात.

छपरे हरित केल्यास फायदा 
हे टाळण्याचे दोन मुख्य उपाय सांगता येतात. पहिला म्हणजे छपरे अधिक हरित करणे. फिक्‍या रंगाचे काँक्रिट वापरणे हा एक भाग. टारमध्ये चुनखडीचे छोटे गोळे टाकून हे सध्या करता येते. रस्त्यांचा पृष्ठभाग काळ्याऐवजी राखाडी अथवा गुलाबीसर रंगाचा केल्याने काळ्यापेक्षा असे पृष्ठभाग मुळात उष्णता कमी शोषतात आणि प्रकाश परावर्तितही जास्त करतात. दुसरा उपाय म्हणजे शास्त्रशुद्ध रीतीने केलेली आणि पुढील काळातही व्यवस्थित देखभाल होणारी वृक्षांची शहरांमध्ये लागवड. अहवाल असे सांगतो की कोलकाता, पुणे, गुवाहाटी ही अद्याप वृक्षराजी टिकून असणारी शहरे ‘यूएचआय’ होण्यापासून तूर्त वाचली आहेत.

शास्त्रशुद्ध वृक्षलागवडीचे लाभ
प्रतीकात्मकतेपलीकडे जाऊन शास्त्रशुद्ध वृक्षलागवड केल्यास काय फायदे होतात ते आपण Treepeople.org/tree-benefits या संकेतस्थळाच्या पानावर पाहू शकतो. हवामानबदल रोखणे, प्रदूषक वायू आणि सूक्ष्म धूलिकण शोषून घेणे, वातानुकूलनाचा खर्च ५० टक्‍क्‍यांपर्यंत कमी होणे, जलप्रदूषण कमी होणे, मातीची धूप कमी होणे, वाहतुकीशी संबंधित भयात्कारी आवाज कमी होणे, परिसर सौंदर्यशास्त्रदृष्ट्या अधिक चांगला होणे, लोकांना एकत्र येऊन काही काम करण्याचे प्रेरणा मिळणे असे ते २२ फायदे आहेत. आपले शहर ‘यूएचआय’ न बनण्याचा हा सर्वोत्तम उपाय म्हणता येईल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article santosh shintre on Climate change