सर्च-रिसर्च :  ‘कोरोना’ नियंत्रणाचे चिनी रहस्य

प्रा. शहाजी मोरे
Saturday, 5 September 2020

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची सुरुवात सर्वप्रथम चीनच्या वुहान प्रांतामध्ये झाली व तो जगभर पसरला. परंतु मार्चअखेरनंतर मात्र चीनने नियंत्रण मिळवले, असे म्हणता येते. कारण चीनमधील बाधितांची संख्या त्यानंतर नगण्य प्रमाणात वाढली. अधूनमधून चीनमध्ये बाधित सापडल्याच्या बातम्या येत असतात, परंतु अन्य देशांत जशी बाधितांची संख्या वाढत जाते, तशी बाधितांची संख्या चीनमध्ये वाढल्याची बातमी नंतर येत नाही.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची सुरुवात सर्वप्रथम चीनच्या वुहान प्रांतामध्ये झाली व तो जगभर पसरला. परंतु मार्चअखेरनंतर मात्र चीनने नियंत्रण मिळवले, असे म्हणता येते. कारण चीनमधील बाधितांची संख्या त्यानंतर नगण्य प्रमाणात वाढली. अधूनमधून चीनमध्ये बाधित सापडल्याच्या बातम्या येत असतात, परंतु अन्य देशांत जशी बाधितांची संख्या वाढत जाते, तशी बाधितांची संख्या चीनमध्ये वाढल्याची बातमी नंतर येत नाही. आता तर चीनमध्ये परिस्थिती सुरळीत होत चालल्याची, पार्ट्या सुरू असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध होत आहेत.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोकसंख्येच्या बाबतीत चीन जगात पहिल्या क्रमांकावर असूनसुद्धा, बाधितांच्या संख्येबाबत मात्र अन्य देशांच्या तुलनेत तो खूप खाली आहे. इतर देशांच्या बाबतीत मात्र परिस्थिती उलट आहे. अमेरिकेचा लोकसंख्येच्या बाबतीत तृतीय क्रमांक असून, बाधितांच्या संख्येत व दगावलेल्या रुग्णांच्या संख्येत मात्र प्रथम क्रमांकावर आहे. जगात सहाव्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला ब्राझील बाधितांच्या व मृतांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर, तर जगात दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला भारत बाधितांच्या संख्येत तृतीय क्रमांकावर आहे.

परंतु लोकसंख्येच्या बाबतीत चीन पहिल्या क्रमांकावर असूनसुद्धा बाधितांच्या किंवा मृतांच्या संख्येत पहिल्या दहा देशांतही नाही. येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे चीनमधून बातमी बाहेर येते ती खरीच असते, असे जग फारसे मानत नाही. त्यात चीनमध्ये लोकशाही नसल्यामुळे सर्वच गोष्टींवर सरकारचे प्रचंड नियंत्रण असते. त्यामुळे अन्य मार्गाने बातमी बाहेर येण्याची शक्‍यता नाही.  ‘कोरोना’च्या लागणीमध्ये सर्वत्र एक पद्धत आहे, ती म्हणजे प्रथम काही भागांत साथ वाढत जाते, नंतर कमी होत जाते व नंतर नवीन भागात ती वाढत जाते. परंतु चीनमध्ये असे काही झाल्याचे जगाला माहित नाही. अमेरिका, ब्राझील व भारतात असेच घडून येत आहे, परंतु चीनच्या संख्येबाबत मात्र गूढ आहे.

साथीच्या प्रारंभी जगाने चीनवर आगपाखड केली ; परंतु जगाला ‘कोविड-१९’ची साथ देणाऱ्या चीनने साथ कशी नियंत्रणात ठेवली याचा जग विचार करीत नाही. खरी गरज आहे ती चीनने या साथीवर नियंत्रण मिळवले असेल, तर ते कसे मिळवले याचा त्वरित व सखोल अभ्यास करण्याची. असा अभ्यास केला तो हाँगकाँग विद्यापीठातील शास्त्रज्ञ बेन्जामिन कौलिंग व सहकाऱ्यांनी. त्यांनी केलेल्या संशोधनानुसार एका बाधितापासून दुसऱ्या व्यक्तीस लागण होण्याचा काळ खूप कमी करण्यात चीनने यश मिळवले आहे. या काळाला ‘सिरियल इंटर्व्हल’ म्हणतात. चीनमध्ये हा काळ कमी करण्यासाठी एक बाधित आढळला की लगेच त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे विलगीकरण करण्यात येते, असे कौलिंग आपल्या शोधनिबंधात नमूद करतात. त्यासाठी अत्यंत प्रभावी ‘काँटॅक्‍ट ट्रेसिंग’, अलगीकरण, विलगीकरण काटेकोरपणे अमलात आणले जाते. असे केल्यामुळे एका बाधितापासून जवळजवळ आठ दिवस त्याच्या संपर्कातील व्यक्तींना लागण होण्याची शक्‍यता असते ती  फक्त २.६ दिवसांवर आणली.

त्यामुळे अडीच दिवसानंतर बाधित व्यक्तीमुळे इतरांना लागण होऊ शकत नाही. कारण बाधित व्यक्ती इतरांच्या संपर्कातच येत नाही. त्यामुळे लागणीचे चक्र मंदावते किंवा थांबते. त्यामुळे एका बाधितामुळे किती व्यक्तींना लागण होऊ शकते ती संख्या म्हणजे रिप्रॉडक्‍शन नंबर (आर नॉट ) कमीत कमी होऊ शकतो, तेही कोणतेही औषधे न वापरता. यामुळेच चीनने या साथीवर नियंत्रण मिळवले असावे, असे या शास्त्रज्ञांचे गृहीतक आहे. या संशोधनाविषयी त्यांनी प्रख्यात शोधपत्रिका ‘सायन्स’च्या जुलैच्या अंकात ‘सिरियल इंटर्व्हल ऑफ सार्स- कोव्ह-२ वॉज शॉर्टन्ड ओव्हरटाईम बाय नॉनफार्मास्युटिकल इंटरव्हेन्शन्स’ या शीर्षकाचा शोधनिबंध लिहिला आहे. हेच चीनमधील साथनियंत्रणाचे रहस्य आहे. जग यातून काही धडा घेणार आहे काय?

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shahaji more on The Chinese secret of corona control