सर्च-रिसर्च : शरीरात आणखी एक नवा अवयव

Salivary-glands
Salivary-glands

मानवाच्या डोक्यामध्ये (चेहऱ्याच्या मागच्या बाजूला) एका नव्या अवयवाचा शोध शास्त्रज्ञांना लागला आहे. लाळग्रंथींच्या स्वरूपात असलेला हा छोटासा अवयव अनेक शतकांपासून शास्त्रज्ञ-डॉक्टरांपासून आत्तपर्यंत लपून राहिला होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पीएसएमए पेट/सीटी या अत्याधुनिक यंत्राव्दारे कर्करोगाच्या एका रुग्णाचे स्कॅनिंग करत असताना नेदरलँडमधील डॉक्टरांना या नवा अवयवाचा शोध लागला. कर्करोगाच्या गाठी समजण्यासाठी हे स्कॅनिंग करण्यापूर्वी रुग्णाला किरणोत्सारी द्रव असलेले ग्लुकोजचे इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे कर्करोगाच्या गाठी स्कॅनमध्ये ‘उजळलेल्या’ दिसतात. या स्कॅनमध्ये नासोफरीनॅक्स भागात (मृदूटाळूवरील भाग) आत्तापर्यंत कधीही न दिसलेला भाग दिसून आला. मुख्य लाळग्रंथीच्या बाजूला या दोन नव्या ग्रंथी असल्याचे दिसून आले.

याबाबत नेदरलँडच्या कॅन्सर इन्स्टिट्यूटमधील ऑन्कोलॉजिस्ट वाऊटर व्होगेल म्हणाले, ``प्रत्येकाला लाळग्रंथींच्या तीन जोड्या असतात. परंतु, त्या भागात नव्याने आढळलेल्या ग्रंथी नाहीयेत. नासोफरीनॅक्सच्या भागात ज्या लाळग्रंथी किंवा श्लेष्मल ग्रंथी असतात त्या सूक्ष्मदर्शकातूनच दिसू शकतात. श्लेष्मल त्वचेखाली त्या पसरलेल्या असतात. त्यामुळे नव्याने आढळलेल्या ग्रंथींमुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले.``

इथे आहेत नव्या ग्रंथी
पचनासाठी आपल्याला लाळेची गरज असते. पॅराटॉईड, सबमँडीब्युलर आणि सबलिंग्युलर या ग्रंथींमधून लाळ स्रवते. याशिवाय लाळ स्रवणाऱ्या छोट्या छोट्या हजारभर ग्रंथीही असतात. त्या सर्व आपल्या तोंडामध्ये विखुरलेल्या असतात. सूक्ष्मदर्शकाशिवाय या छोट्या-छोट्या ग्रंथी दिसत नाहीत. नव्याने सापडलेल्या ठळकपणे दिसणाऱ्या चौथ्या ग्रंथी आहेत.  नाकाच्या मागे आणि टाळूच्या वरच्या भागात, मानवी डोक्याच्या मध्याच्या जवळ आहेत. 

ॲमस्टरडॅम विद्यापीठातील शल्यचिकित्सक मॅथिज वॉल्स्टार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या नव्या ग्रंथींचा अभ्यास केला. नव्या अवयाबाबत ते म्हणाले,` या ग्रंथींच्या स्थानावरून त्यांना ट्युबेरिअल ग्लँड असे त्यांना म्हणता येऊ शकेल.  या साठी १०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्या सर्वांचे पीएसएमए पेट/सीटी स्कॅन करण्यात आले. सर्वांमध्ये या नव्या ग्रंथी आढळून आल्या. तसेच एक महिला व एका पुरुषाची प्रत्यक्ष शारीरिक तपासणी करण्यात  आली त्यातही या पेशी आढळून आल्या. आतापर्यंतच्या वैद्यकीय पाहणीत या ग्रंथी आढळून आल्या नव्हत्या.``

नव्या अवयवाबाबत अधिक संशोधन होण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली आहे. कर्करोगावरील उपचार करताना याचा शोध लागला आहे. कर्करोगावरील उपचारामुळे लाळ ग्रंथींवर परिणाम होतो का हे नव्याने तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. रेडिएशन उपचार घेणाऱ्या ७२३ रुग्णांची प्राथमिक माहिती नव्या ग्रंथींच्या शोधानंतर गोळा करण्यात आली. त्यावेळी ट्युबेरिअल ग्रंथींवर परिणाम होऊन त्याचा विपरीत परिणाम रुग्णावरही होत असल्याचे दिसून आले आहे. आता कोणत्या औषधांमुळे लाळग्रंथींवर परिणाम होतो, ते तपासावे लागणार आहे.  या संशोधनाची माहिती रेडिओथेरपी अँड ऑन्कोलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com