सर्च-रिसर्च : अकेले हैं, तो क्‍या गम हैं!

सर्च-रिसर्च : अकेले हैं, तो क्‍या गम हैं!

तुम्ही आजची ३१ डिसेंबरची पार्टी कोणकोणत्या मित्रांबरोबर साजरी करायची, या विचारात असणार... मात्र, जपानमध्ये एकट्याने पार्टी करण्याचा ट्रेंड रूढ होत असून, ‘हितोरी’ म्हणजे प्रत्येक गोष्ट एकट्यानेच साजरी करण्याकडे नागरिकांचा कल वाढतो आहे. खरेतर दशकापूर्वी जपान्यांना कोणतीही गोष्ट एकट्याने करणे अपमानास्पद वाटायचे आणि कॉलेज किंवा ऑफिसमध्ये एकट्याने जेवणाची वेळ आल्यास ते बाथरूमच्या पोर्चमध्ये जाऊन जेवण करत. याला ‘बेंजो मेशी’ म्हणजेच टॉयलेट लंच असेही म्हटले जायचे...मग जपानी नागरिकांच्या वागणुकीत एवढ्या मोठ्या बदलाचे कारण काय... 

जपानमध्ये घडलेल्या या बदलासंदर्भात टोकियोतील नोमुरा रिसर्च इन्स्टिट्यूटमधील संशोधक मोटोको माटेसुशिता म्हणतात, ‘‘जपान छोटासा देश आहे. एकत्र राहणे ही प्रत्येकाची गरज आहे. आमच्यावर एकत्र राहण्यासाठी लहानपणापासूनच दबावही टाकला जातो. मात्र, सोशल मीडियाचा वापर वाढल्यानंतर तुमच्या मित्रयादीतील मित्रांच्या संख्येला खूप महत्त्व आले. त्याचा उलटा परिणाम लोक आता एकट्याने राहण्यावर झाला आहे! त्याच्या जोडीला सर्वांशी चोवीस तास संपर्कात ठेवणाऱ्या सोशल मीडियामुळेच ‘ओहितोरिस्मा’ म्हणजेच एकट्याने पार्टी करण्याची संस्कृती रुजू लागली.

मी २०१५ ते २०१८ दरम्यान १० हजार लोकांच्या केलेल्या सर्वेक्षणातून जपानी लोक लग्न करणे, मुलाला जन्म देणे या सामाजिक दबावालाही जुमानेसे झाले आहेत. अतिशय कमी लोकांना लग्न आणि मुलांमध्ये रस आहे. अनेकांना मूल असले तरी घटस्फोट घेण्यात काहीच गैर वाटत नाही. लग्न झालेल्यांपैकी अनेकांना आपल्या पत्नीपासून महत्त्वाच्या गोष्टी लपवणे योग्यच वाटते. याचाच परिणाम म्हणून जपानमध्ये एकट्याने आनंद लुटण्यासाठी ‘हितोरी बार’ सुरू झाले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘सोलो’ ट्रेंड जगभरातच 
जगभरात जन्मदर घटत आहे, लग्नाचे वय वाढतंय आणि वृद्धांची संख्याही वाढते आहे. त्यातून अनेक देशांत एकटे राहणाऱ्यांचे प्रमाणही वाढतंय. युरोमॉनेटर या लंडनमधील संस्थेच्या २०१९मध्ये प्रकाशित अहवालानुसार, २०००ते २०३० दरम्यान जगभरात एकटे राहणाऱ्यांचे प्रमाण १२८ टक्‍क्‍यांनी वाढणार आहे. जगभरात सुपर सोलो समाज, म्हणजेच कधीही लग्न न करणारे किंवा घटस्फोटानंतर एकटे राहणाऱ्यांचे प्रमाण वाढत जाईल. मात्र, एकट्याने पार्टी करणे हा ट्रेंड जपानमध्ये सर्वांत आधी सुरू झाला, ही क्रांती चर्चेचा विषय आहे. जपानमध्ये ‘पार्टी ऑफ वन’ हा हॅशटॅग लोकप्रिय होत आहे. अनेक जण एकट्याने राहात असल्याचे जाहीर करीत आहेत. अगदी कराओकेसारखा जपानमधील सर्वांत मोठा टाइमपासचा कार्यक्रमही सोलो होत असून, सिंगल पर्सन कराओकेच्या मागणीत ३०ते ४०टक्के वाढ झाली आहे. याआधी जपानमधल्या मोठ्या कराओके मजल्यांची जागा आता फोन बुथच्या आकाराच्या पर्सनल रेकॉर्डिंग स्टुडिओंनी घेतली आहे. हा ट्रेंड अमेरिका आणि युरोपमधील काही देशांतही आहे, मात्र जपानमधील बदल लक्षणीय आहे.

जपानमध्ये १८९९नंतर प्रथमच सर्वांत कमी म्हणजे केवळ ८ लाख ६४हजार मुले जन्माला आली. देशात एकच व्यक्ती असलेल्या घराची संख्या१९९५च्या २५टक्‍क्‍यांवरून आता ३५टक्‍क्‍यांवर पोहोचली. एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठांची संख्याही जपानमध्ये सर्वाधिक आहे. यासंदर्भात काझुशिसा आराकावा या संशोधक म्हणतात, ‘‘जपानी नागरिकांना गोष्टी एकट्याने करण्याची सवय आधीपासूनच आहे. देशातील या एकट्या राहणाऱ्यांच्या खरेदी करण्याच्या शक्तीकडे डोळेझाक करून चालणार नाही. देशातील १५वर्षांपुढील ५०टक्के लोक २०४०पर्यंत एकटे राहात असतील. या ग्राहकांचा विचार केल्याशिवाय बाजारात कोणालाच जम बसवता येणार नाही...’’ 

एकंदरीतच, ‘अकले हैं, तो क्‍या गम हैं’ ही वृत्ती जपानबरोबरच जगभरातच वाढण्याची शक्‍यता दिसते.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com