पर्यावरण : अंदमानचा तापता समुद्र

योगिराज प्रभुणे
Friday, 30 October 2020

वातावरणातील बदलांचा परिणाम हा पृथ्वीवरील प्रत्येक घटकावर होत आहे. जमिनीवर, बर्फाच्छादित प्रदेशावर, हिमशिखरांवर तो जसा होतोय, तसाच परिणाम आता समुद्राच्या खोल पाण्यातही होत असल्याचे शास्त्रज्ञांनी शोधनिबंधात मांडले आहे. भारत हा द्वीपकल्प आहे. त्याच्या तीनही बाजूंना अथांग समुद्र आहे. पूर्व आणि पश्‍चिम अशी मिळून जवळपास साडेसात हजार किलोमीटरची किनारपट्टी भारताला लाभलेली आहे.

वातावरणातील बदलांचा परिणाम हा पृथ्वीवरील प्रत्येक घटकावर होत आहे. जमिनीवर, बर्फाच्छादित प्रदेशावर, हिमशिखरांवर तो जसा होतोय, तसाच परिणाम आता समुद्राच्या खोल पाण्यातही होत असल्याचे शास्त्रज्ञांनी शोधनिबंधात मांडले आहे. भारत हा द्वीपकल्प आहे. त्याच्या तीनही बाजूंना अथांग समुद्र आहे. पूर्व आणि पश्‍चिम अशी मिळून जवळपास साडेसात हजार किलोमीटरची किनारपट्टी भारताला लाभलेली आहे. पूर्वेला बंगालचा उपसागर, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पश्‍चिमेला अरबी समुद्र यांनी भारतीय द्वीपकल्पाला वेढले आहे. त्यामुळे पर्यावरणीय दृष्ट्या समुद्र हा भारतासाठी अत्यंत संवेदनशील घटक ठरतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पण, नेमके याच घटकांत बदल होत असल्याचे निरीक्षण नोंदले आहे. अंदमान आणि निकोबार बेटाच्या परिसराला अंदमानचा समुद्र म्हटले जाते. सर्वसाधारणतः बाराशे मीटरपेक्षा जास्त खोल असलेल्या भागाला ‘खोल समुद्र’ असे म्हणतात. अशा अंदमान समुद्राच्या खोल पाण्याचे तापमान वाढले आहे. बंगालच्या उपसागराच्या तुलनेत सुमारे २ अंश सेल्सिअसने हे तापमान वाढल्याची नोंद ‘इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इनफॉर्मेशन सर्व्हिसेस’ (आयएनसीओआयएस) यांनी केली. अंदमानचा खोल समुद्र उबदार ठेवण्यात महासागरीय प्रक्रियेची भूमिका कायमच रहस्यमय राहिलेली आहे, असेही त्यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे.  

समुद्रातील तापमान बदल
समुद्राच्या पृष्ठभागावर सूर्याची किरणे थेट पडत असल्याने तेथील पाणी उबदार असणे स्वाभाविक असते. पण, खोल समुद्राचे तापमान हे पृष्ठभागाच्या तुलनेत थंड असते. त्यामुळे हवामान बदलाला समुद्र कसा प्रतिसाद देतो याचा अभ्यास, विश्‍लेषण महत्त्वाचे ठरते. त्यासाठी केलेल्या अभ्यासातून अंदमानाच्या खोल समुद्राचे तापमान वाढल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. या अभ्यासानुसार, अंदमानच्या खोल समुद्रातील तापमानाच्या व्यवस्थापनासाठी अंतर्गत भरती आणि उभ्या हालचालींमधून होणारे पाण्याचे मिश्रण याची महत्त्वाची भूमिका असते. पश्‍चिम बंगालच्या उपसागराच्या तुलनेत अंदमान समुद्रात या हालचालींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खोल समुद्रातील पाण्याचे तापमान वाढल्याचे निरीक्षण नोंदले असल्याची माहिती संस्थेने प्रसिद्ध केली आहे. 

खोल समुद्रातील तापमानाच्या व्यवस्थापनावर तेथील जलचर, वनस्पती यांचा अधिवास अवलंबून असतो. पाण्याचे तापमान वाढल्याचा थेट परिणाम त्यांची परिसंस्था उद्धवस्त होण्यावर होतो. खोल समुद्रातील पाण्याचे अभिसरण, रासायनिक गुणधर्मावर होणारा परिणाम, विघटन करणारे सूक्ष्मजीव या सर्व घटकांवर या तापमान वाढीचा थेट परिणाम होत असतो. त्यामुळे सागरी तापमानवाढ हा पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरतो. इतकेच नाही तर, जैव-रासायनिक प्रक्रियेतही तापमानाचा परिणाम होऊन त्यात बदल होण्यास सुरवात होते. अंदमानच्या खोल समुद्रातील पाण्याची तुलना बंगालच्या उपसागराशी केल्यानंतर हा फरक स्पष्ट होतो. समुद्रातील वायू पाण्यात विरघळण्याच्या प्रक्रियेचेही संतुलन तापमान वाढीमुळे बिघडत असते. 

वातावरणातील बदलाचा समुद्रावर होणारा परिणाम यातून अधोरेखित होतो. पण, ही तर सुरवात आहे. भविष्यातदेखील या समुद्रात होणारे बदल सातत्याने टिपावे लागणार आहेत. पृथ्वीवरील इतर समुद्रांच्या तुलनेत अंदमानच्या समुद्रात हे बदल वेगाने होत असताना दिसतात. त्यामुळे या समुद्रात दीर्घकालीन होणाऱ्या बदलांचे विश्‍लेषण करण्यासाठी भौतिक, रासायनिक आणि जैविक प्रारूप उभे करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. यापूर्वी वातावरणातील बदलांचा समुद्रावर होणारा दुष्परिणाम पूर्वीपेक्षाही भयंकर असल्याचे निरीक्षणातून नोंदले गेले आहे. खोल समुद्र आणि किनारपट्टीजवळचा समुद्र या दोन्ही ठिकाणी हे बदल होत आहेत. हे बदल रोखण्यासाठी मानवाने स्वतःमध्ये जाणीवपूर्वक बदल केला पाहिजे. वाहनांमधून होणाऱ्या प्रदूषण नियंत्रणापासून ते हरित ऊर्जा वापरापर्यंत प्राधान्य हीच आता काळाची गरज आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article yogiraj prabhune on environment