भाष्य :  ‘कोरोना’ची भीती नको, दक्षता हवी

डॉ. प्रदीप आवटे
Thursday, 30 January 2020

चीनमधील कोरोना विषाणूच्या उद्रेकाची दखल घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. तेव्हा ‘कोरोना’बाबत भीती बाळगण्याची गरज नाही; मात्र दक्षता घ्यायला हवी. असे उद्रेक रोखण्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेइतकीच जनतेची भूमिका महत्त्वाची असते, हे लक्षात घेतले पाहिजे.

चीनमध्ये नवीन कोरोना विषाणूमुळे आजारी पडलेल्या रुग्णांची संख्या पाच हजारांच्या घरात गेली आहे, तर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या शंभरावर गेली आहे. चीनमध्ये जवळपास अठरा शहरे आणि पाच कोटी लोकसंख्या एक प्रकारे क्वारंटाईन केली गेली आहे. चीनबाहेर जवळपास इतर चौदा देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोरोना हे खरे म्हणजे विषाणूच्या एका समूहाचे नाव आहे. समान वैशिष्ट्ये असणाऱ्या आणि साधारणपणे एकसारखे गुणधर्म असणारे विविध विषाणू एका समूहामध्ये समाविष्ट केले जातात. कोरोना हा असाच एक विषाणू समूह. साध्या सर्दी-खोकल्यापासून ते सार्स किंवा मर्स यासारख्या गंभीर आजाराला कोरोना विषाणू कारणीभूत असतात. परंतु, या वेळी चीनमधील वुहान शहरात जो कोरोना विषाणू आढळून आला, तो मात्र यापूर्वी आढळलेल्या सहा-सात प्रकारच्या कोरोना विषाणूपेक्षा वेगळा आहे. कारण, त्याची जनुकीय रचना इतर कोणत्याही पूर्वीच्या कोरोना विषाणूंशी मिळतीजुळती नाही. त्यामुळेच या नव्या विषाणूला नोवेल कोरोना व्हायरस २०१९(nCov) असे नामाभिधान प्राप्त झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खरे म्हणजे, वाढत्या आंतरराष्ट्रीय दळणवळणामुळे आणि जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे संपूर्ण जग हे एक ‘ग्लोबल व्हिलेज’ झाले आहे. त्यामुळे साथीच्या रोगांच्या बाबतीत बोलावयाचे तर जगाच्या एका टोकाला असणारा कोणताही संसर्गजन्य आजार जगाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचायला फारसा वेळ लागत नाही. नवीन कोरोना विषाणूबाबतही हे तितकेच खरे आहे. भारताचे चीनबरोबर व्यापार, संस्कृती आणि शिक्षणविषयक उत्तम संबंध आहेत. ज्या वुहान शहरात कोरोनाचा उद्रेक सुरू झाला, त्या शहरातच किमान सातशे ते आठशे भारतीय विद्यार्थी वैद्यकीय, तसेच इतर शिक्षणासाठी राहत आहेत. सध्या सुटी असल्याने यातील बरेच विद्यार्थी आपल्या घरी परतत आहेत. या मुलांची वैद्यकीय शिक्षणाची पार्श्वभूमी आणि ती जिथे शिकत आहेत त्या शहरातली साथीच्या रोगाची परिस्थिती लक्षात घेता नवीन कोरोना विषाणू भारतापर्यंतदेखील येऊ शकतो, ही शक्‍यता अगदीच नाकारता येत नाही. सुरुवातीच्या काळात या विषाणूची मनुष्यापासून मनुष्यास प्रसार होण्याची क्षमता मर्यादित आहे, असे निरीक्षण होते. तथापि, गेल्या आठवड्यात हाती आलेल्या माहितीनुसार रुग्णांना उपचार देणाऱ्या रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांपैकीही अनेक जण या आजाराने ग्रस्त झाल्याचे दिसून आले. त्यामुळे हा आजार मनुष्यापासून मनुष्यास होऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे.

प्रतिबंधासाठीची उपाययोजना 
नवीन कोरोना विषाणूच्या उद्रेकाची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने याबाबतीत तातडीची पावले उचलली आहेत. मुंबईसह देशातील वीस आंतरराष्ट्रीय विमानतळांवर कोरोनाबाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग सुरू करण्यात आले आहे. याबरोबरच या आजाराचे निदान करण्याच्या सुविधा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे, तसेच देशभरातील इतर १२ प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध करण्यासाठी आवश्‍यक पावले उचलण्यात आली आहेत. विमानतळांवरील स्क्रीनिंगमध्ये बाधित क्षेत्राला भेट देऊन येणारे जे प्रवासी आढळत आहेत, त्यांची माहिती संबंधित राज्यांना आणि जिल्ह्यांना देण्यात येत आहे. त्या माध्यमातून या व्यक्तींचा पुढील किमान २८ दिवसांकरिता दैनंदिन पाठपुरावा करण्यात येत आहे. याशिवाय, विमानतळावरील थर्मल स्क्रीनिंगमध्ये काही व्यक्तींना कोरोना विषाणूची संशयित लक्षणे आढळली, तर त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना विषाणू आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, न्यूमोनिया अशी लक्षणे मुख्यत्वेकरून आढळतात. सर्वसाधारणपणे हा आजार हा हवेवाटे शिंकण्या-खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात, त्यातून पसरतो. हा प्राणिजन्य आजार आहे. मात्र, नक्की कोणत्या प्राण्यापासून हा नवा विषाणू माणसाकडे आला, याबाबत सध्या खात्रीशीर माहिती नाही.

सावधगिरी बाळगण्याची गरज
कोरोना, स्वाइन फ्लू, क्षयरोग यांसारखे सगळेच आजार हे हवेवाटे शिंकण्या-खोकण्यातून जे थेंब उडतात त्यातून पसरतात. शिंकताना खोकताना हातरुमाल नाका-तोंडावर धरणे, हात वारंवार धुणे, असे साधेसुधे नियम पाळून आपण या आजारांना दूर ठेवू शकतो. कोरोना हा प्राणिजन्य विषाणू आहे, हे लक्षात घेतले तर मांसाहार घेणाऱ्यांनी पूर्णपणे शिजलेले आणि आरोग्यदायी मांस खाणे आवश्‍यक आहे. असे उद्रेक रोखण्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेइतकीच महत्त्वाची भूमिका सर्वसामान्य जनतेची असते. आपण १८ जानेवारीपासून विमानतळांवर स्क्रीनिंग सुरू केले. पण, त्यापूर्वी जे लोक कोरोनाबाधित भागातून भारतात आले, त्यांनी एक सामाजिक जबाबदारी म्हणून स्वतःहून पुढे येण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास करणारी ही मंडळी सांपत्तिकदृष्ट्या श्रीमंत गटातील आहेत. अनेकांना सरकारी रुग्णालयात दाखल होणे आवडत नाही. पण, या आपत्तीसदृश परिस्थितीत कोरोनाचा उद्रेक रोखण्यात प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. चीनमधून येणारा प्रत्येक प्रवासी म्हणजे कोरोनाचा रुग्ण, अशा नजरेने पाहण्याची गरज नाही. चीनमधून येणाऱ्या प्रवाशांशी आपण कसे वागतो आहोत, हेही महत्त्वाचे आहे. या प्रवाशांना वाळीत टाकल्याप्रमाणे वागवणे किंवा त्यांना आपल्या कामावर रुजू होऊ न देणे योग्य नाही. काही कार्यालयप्रमुखांनी, ‘तुम्हाला कोरोना नाही, असे वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन या; मग तुम्हाला रुजू करून घेतो,’ असे सांगितले. हे लोक मग नाहक या रुग्णालयामधून त्या रुग्णालयाकडे न मिळणाऱ्या प्रमाणपत्रासाठी फिरत राहिले. असे वागणे चुकीचे आहे. आपण फार तर अशा प्रवाशांना दोन आठवड्यांची पगारी रजा देऊन घरी थांबण्यास सांगू शकतो. पण, त्यांना असा शारीरिक व मानसिक त्रास देणे नियमाला धरून नाही. बाधित भागातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचा पुढील २८ दिवसांकरिता पाठपुरावा आरोग्य विभाग करीत आहे. त्यांच्यात कोरोना आजाराची अगदी सौम्य लक्षणे आढळली, तर त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करून त्यांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात येते आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने घाबरून जायचे कारण नाही.

वातावरणातील बदल, जंगलतोड, वाढते शहरीकरण, वाढलेले आंतरराष्ट्रीय दळणवळण या सगळ्यांचा परिणाम साथीच्या रोगाच्या परिस्थितीवर होतो आहे. आपली प्रतिकारशक्ती अबाधित ठेवणं, आरोग्यदायी सवयी लावणे, हेच व्यक्तिगत पातळीवर आपण करू शकतो. तेव्हा कोरोना उद्रेकाची भीती नको, दक्षता मात्र हवी. सार्वजनिक आरोग्य हा आपला प्राधान्याचा विषय असला पाहिजे, आपल्याला आणखी अद्ययावत संसर्गजन्य आजारांची रुग्णालये उभी करावी लागतील, तसेच पर्यावरण रक्षणाची शपथ घ्यावी लागेल. नव्याने आलेला हा विषाणू, ‘भाई... कुछ करो ना,’ हेच तर सांगतो आहे.

( लेखक महाराष्ट्र आरोग्यसेवेत राज्य सर्वेक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr pradeep Awate article coronavirus