सर्च-रिसर्च : तापमानवाढीशी झुंजणारे गाव

महेश बर्दापूरकर
Wednesday, 4 March 2020

जागतिक तापमानवाढ आणि त्याचे दुष्परिणाम आता आपल्या आजूबाजूला दिसायला सुरुवात झाली आहे. समुद्राचे वाढणारे तापमान आणि हिमनद्यांचे वितळण्याचे वाढलेले प्रमाण, यांमुळे नवनवी संकटे येऊ घातली आहेत. नॉर्वे आणि उत्तर ध्रुवाच्या मध्यावर असलेल्या स्वालबार्ड प्रांतातील लाँगइअरबाइन या जगातील सर्वांत उत्तर टोकाला असलेल्या २३०० लोकवस्तीच्या गावाला तापमानवाढीचा सर्वाधिक फटका बसला आहे. गावाच्या ऋतुचक्रात झालेल्या मोठ्या बदलामुळे येथील पर्यटनाला मोठी झळ बसली आहे.

जागतिक तापमानवाढ आणि त्याचे दुष्परिणाम आता आपल्या आजूबाजूला दिसायला सुरुवात झाली आहे. समुद्राचे वाढणारे तापमान आणि हिमनद्यांचे वितळण्याचे वाढलेले प्रमाण, यांमुळे नवनवी संकटे येऊ घातली आहेत. नॉर्वे आणि उत्तर ध्रुवाच्या मध्यावर असलेल्या स्वालबार्ड प्रांतातील लाँगइअरबाइन या जगातील सर्वांत उत्तर टोकाला असलेल्या २३०० लोकवस्तीच्या गावाला तापमानवाढीचा सर्वाधिक फटका बसला आहे. गावाच्या ऋतुचक्रात झालेल्या मोठ्या बदलामुळे येथील पर्यटनाला मोठी झळ बसली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लाँगइअरबाइनमधून दिसणारे ‘नॉर्दन लाइट्‌स’चे नेत्रसुखद दृश्‍य आणि ‘किंग ऑफ आर्क्‍टिक’ पोलर बेअरला पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येथे येतात. मात्र, गेल्या दहा वर्षांत स्वालबार्डच्या हवामानात मोठे बदल झाले असून, त्याचा सर्वाधिक फटका लाँगइअरबाइनला बसला आहे. उन्हाळा आणि हिवाळ्यातील कमाल तापमानामध्ये मोठी वाढ नोंदवली जात आहे, पावसाचे प्रमाण वाढले आहे आणि हिवाळ्यातील हिमवृष्टीचे प्रमाणही वाढले आहे. गावच्या वरील बाजूच्या डोंगरातील हिमस्खलनाचा सामना गावाला अनेकदा करावा लागला आहे. संशोधकांनी तापमानवाढीचा फटका प्रथम उत्तर ध्रुवाला बसेल आणि मग तो दक्षिण ध्रुवाकडे सरकेल, असे स्पष्ट केले आहे. ‘‘स्वालबार्डमधील तापमानवाढीचा दर जगाच्या सरासरीच्या पाचपट आहे.

लाँगइअरबाइनमध्ये सलग शंभर महिने सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदविले गेले आहे. हे जगातील सर्वाधिक वेगाने गरम होत असलेले गाव असल्याची नोंद करण्यात आली आहे. ही निरीक्षणे धोकादायक परिस्थितीची जाणीव करून देतात,’’ असे नॉर्वेच्या हवामानशास्त्र संस्थेतील शास्त्रज्ञ केटिल इसाक्‍सेन सांगतात. नॉर्वेने या गावातील हिमस्खलनावर मात करण्यासाठी अडथळे उभारण्यावर २०१८ पासून चार कोटी पौंड खर्च केले असून, साठ घरे सुरक्षित ठिकाणी हलवली आहेत. दुसऱ्या टप्प्यात आणखी १४२ घरे हलविण्यात येतील. सरकारने हिमस्खलनातून बचावासाठी गावात तीन अडथळे उभारले असून, सर्वांत मोठा अडथळा दहा मीटर उंच व दोनशे मीटर लांबीचा आहे. मात्र, प्रचंड उतार असल्यामुळे अडथळे उभारून सर्व गावांचे संरक्षण करणे शक्‍य नसल्याचे अधिकारी सांगतात. गावात दरवर्षी भेट देणाऱ्या तीस हजार पर्यटकांना मात्र या धोक्‍याची अद्याप कल्पना आलेली नाही. हे अडथळे गावच्या सौंदर्याला हानी पोचवतात, असे त्यांचे म्हणणे आहे.

गावातील घरांच्या पायालाही तापमानवाढीचा फटका बसतो आहे. येथील घरे ‘पर्माफ्रॉस्ट’ या गोठलेल्या मातीमध्ये पाया खोदून बांधली जातात. ही माती एक लाख वर्षांपूर्वी तयार झाल्याचे संशोधक सांगतात. मात्र, या भागातील पाचपट तापमानवाढीमुळे ही माती विरघळून चिखल होत आहे. त्यामुळे घरे खचण्याचा धोका असून, आता घरांच्या निर्मितीसाठी ‘पर्माफ्रॉस्ट’वर अवलंबून राहता येणार नाही, असे वास्तुविशारद सांगतात. नव्या घराच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर पोलादाचा वापर केला जात असून, डोंगरात अशी घरे बांधण्यासाठी अधिक कष्ट पडतात आणि खर्चही अधिक होतो. लाँगइअरबाइनमध्ये गेल्या वर्षी पाच ऑक्‍टोबरला सूर्य मावळला.

आता तो आठ मार्चला उगवेल. जोरदार हवा आणि अंधाराचा येथील गावकऱ्यांना कायमच सामना करावा लागतो. हवेपासून संरक्षणासाठी घरांच्या पोलादी चौकटीत आवश्‍यक बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर ही घरे बांधताना परिसरातील गवताच्या ८६ प्रजाती, झुडपे आणि शैवाल वाचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

‘आम्ही जमिनीचा वरचा थर हळुवारपणे काढून तो दुसरीकडे सुरक्षित ठेवला आहे. घरे बांधून झाल्यावर त्याचे पुनर्रोपण केले जाईल,’’ असे या प्रकल्पाच्या वास्तुविशारद इंगर टोल्लास सांगतात. हवामानबदलाचा सामना करण्यासाठी लाँगइअरबाइन संघर्ष करीत असून, भविष्यात सर्वांनाच या संघर्षासाठी तयार राहावे लागणार असल्याचा संदेश हे गाव देत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article mahesh badrapurkar on longyearbyen village