सर्च-रिसर्च :  रंगुनी रंगात पांढऱ्या...

राहुल गोखले
Thursday, 16 July 2020

उन्हाळ्यात एखाद्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला तर त्याला कमी गरम होते, कारण गडद रंगांच्या तुलनेत पांढरा रंग सूर्यप्रकाशाचे अधिक परावर्तन करतो. हीच संकल्पना भिंतींना किंवा छताला रंग देण्याच्या बाबतीत लागू होते. ज्या प्रदेशांत उष्णता जास्त आहे त्या प्रदेशांत छताला बाहेरच्या बाजूने पांढरा रंग दिला, तर छत आणि पर्यायाने त्याखालील खोली तापण्याचे प्रमाण कमी होते आणि साहजिकच आत काहीसा थंडावा राहतो.

उन्हाळ्यात एखाद्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला तर त्याला कमी गरम होते, कारण गडद रंगांच्या तुलनेत पांढरा रंग सूर्यप्रकाशाचे अधिक परावर्तन करतो. हीच संकल्पना भिंतींना किंवा छताला रंग देण्याच्या बाबतीत लागू होते. ज्या प्रदेशांत उष्णता जास्त आहे त्या प्रदेशांत छताला बाहेरच्या बाजूने पांढरा रंग दिला, तर छत आणि पर्यायाने त्याखालील खोली तापण्याचे प्रमाण कमी होते आणि साहजिकच आत काहीसा थंडावा राहतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र हा पांढरा रंग आणखीही काही भूमिका बजावतो आणि ती म्हणजे ज्याला रेडिएटिव्ह कूलिंग म्हणतात त्या प्रक्रियेस हातभार लावतो. एखादा पदार्थ जेव्हा विशिष्ट तरंगलांबीची (इन्फ्रारेड) ऊर्जा शोषून घेतो आणि त्या बदल्यात अशा तरंगलांबीची ऊर्जा बाहेर फेकतो, ज्यायोगे तापमानात घट होते, त्या प्रक्रियेस रेडिएटिव्ह कूलिंग म्हणतात आणि पांढरा रंग यासाठी ओळखला जातो. मात्र तरीही आता उपलब्ध पांढरे रंग हे काही शंभर टक्के प्रभावी आहेत असे नाही आणि त्यांच्या क्षमतेलादेखील मर्यादा आहेत. लॉस एंजेलिसमधील कॅलिफोर्निया विद्यापीठातील काही संशोधकांनी आता प्रयोगांती असे सिद्ध केले आहे की पांढऱ्या रंगाच्या रासायनिक मिश्रणात काही बदल केले तर हाच पांढरा रंग अधिक कार्यक्षम बनविता येतो.

पांढऱ्या रंगामुळे ऊर्जेची बचत
आता जे पांढरे रंग उपलब्ध आहेत त्यांची क्षमता सूर्यप्रकाशाचे परावर्तन ८५ टक्के इतके करण्याची आहे. उरलेली सुमारे १५ टक्के विकिरणे या रंगांमधील रसायने शोषून घेतात. मात्र या संशोधकांनी असे दाखवून दिले आहे, की याच पांढऱ्या रंगाच्या रासायनिक मिश्रणात योग्य ते बदल केले तर हीच परावर्तनाची क्षमता थेट ९८ टक्‍क्‍यांपर्यंत जाऊ शकते. याचाच सरळ अर्थ असा की हा पांढरा रंग छताला बाहेरच्या बाजूने देण्यात आला तर विकिरणे शोषली जाण्याचे प्रमाण कमी होईल आणि इमारत किंवा खोली आतून अधिक थंड होईल. याचा चांगला परिणाम म्हणजे वातानुकूलन यंत्रणेवरील ताण कमी होईल आणि ऊर्जेची बचत होईल. यासाठी या संशोधकांनी रंगाच्या मिश्रणात काही फेरफार केले. आता जे रंग उपलब्ध आहेत त्यांत टिटॅनियम ऑक्‍साईडचा वापर केला जातो. हे रसायन इन्फ्रारेड विकिरणांचे परावर्तन करण्यात सक्षम असले, तरीही अल्ट्राव्हायोलेट तरंगलांबीच्या विकिरणांचे मात्र ते शोषण करते.

परिणामतः इमारत किंवा खोलीचे तापमान कमी ठेवण्यात मर्यादा पडतात. या ऐवजी या संशोधकांनी दोन निराळे पदार्थ पांढरा रंग बनविताना वापरले- एक, बेरियम सल्फेट आणि दुसरा म्हणजे टेफ्लॉनची भुकटी. यातील बेरियम सल्फेट हा तसा किमतीला किफायतशीर पदार्थ. या दोन्ही पदार्थांचा परिणाम असा झाला की हे पांढरे रंग अल्ट्राव्हायोलेट तरंगलांबीच्या विकिरणांचेदेखील परावर्तन करू लागले. साहजिकच जेवढे परावर्तन अधिक, तेवढी तो रंग छताला लावलेल्या इमारती अधिक शीतल. याखेरीज रंग तयार होताना त्यात बाईंडर म्हणून काही बहुवारिके वापरली जातात. तीदेखील उष्णता शोषतात. हा नव्या पद्धतीचा पांढरा रंग बनविताना संशोधकांनी या बाइंडरचे प्रमाणदेखील कमी करावे असे सुचविले आहे.

संशोधनाचे परिणाम दूरगामी 
ज्याला कूल-रूफ तंत्रज्ञान म्हणतात अशा तंत्रज्ञानाचा वापर आणि पुरस्कार अनेक महानगरपालिका आणि सरकारे करू लागली आहेत. उष्णता कमी राखण्याचा उपयोग थेट ऊर्जा बचतीमध्ये होणार असल्याने आणि या प्रयोगाच्या संशोधकांनी सुचविलेले मार्ग पेंट आणि कोटिंग उद्योगांना आत्मसात करणे सहज शक्‍य असल्याने या संशोधनाचे परिणाम दूरगामी होतील अशी खात्री या संशोधकांना वाटते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article rahul gokhale on white colour