सर्च-रिसर्च : ऑक्‍टोपसचे सेन्सर

octopus-sensor
octopus-sensor

आठ भुजा असलेला सागरी प्राणी म्हणजे ऑक्‍टोपस! त्याला अष्टपाद, अष्टभुजा, तर कोकणात ‘मकाली’ असे नाव आहे. आपल्या लेखापुरते तरी ऑक्‍टोपसला आपण ‘मकाली’ असे म्हणूया, कारण समुद्राचे तज्ज्ञ असलेल्या कोळी बांधवांनी हे नाव दिले आहे. मकालीच्या आठ भुजांबद्दल मानवाला पूर्वीपासून आकर्षण आहे. फुटबॉलचे जागतिक सामने भरवणाऱ्या ‘फिफा’तर्फे प्रत्येक सामन्यावेळी मकालीची भविष्यवाणी प्रसिद्ध व्हायची. असो, तो आपल्या चर्चेचा विषय नाही. शास्त्रज्ञांनी मकालीच्या भुजांमध्ये असलेल्या शोषक अवयवांमध्ये आढळणाऱ्या सेन्सरचा शोध घेतला आहे.

मकालीच्या भुजा अतिशय सफाईदारपणे भक्ष्य पकडतात, हालचाल करतात, आक्रमणसुद्धा करतात. अतिशय संवेदनशील असलेल्या या भुजा नक्की काम कसे करतात, याबद्दल शास्त्रज्ञांना कुतूहल होते. या संशोधनाने त्यातील काही उत्तरे तरी मिळाली आहेत. अर्थात, हे संशोधन जरी मकालीसंबंधी असले, तरी गंध, वस्तू इत्यादींसंबंधीच्या संवेदनांचे विश्‍लेषण करणाऱ्या सजीवांतील सेन्सरबद्दल अधिकची माहिती यातून मिळणार आहे.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मकालीच्या भुजांवरील जैवयांत्रिकीसंबंधी (बायोमॅकॅनिकल) अनेक संशोधने झाली आहेत. पण प्रथमच त्यातील जैवरेणूंबद्दलची (बायोमॉलिक्‍युल) माहिती समोर आली आहे. हार्वड विद्यापीठाच्या संशोधकांनी मकालीच्या मज्जासंस्थेसंदर्भात केलेले हे संशोधन ‘सेल’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. अष्टभुजांवरील शोषकांमध्ये (सक्‍शन कप) पेशींच्या पडद्याखाली सेन्सरचे आख्खे कुटुंब सापडले आहे. अद्वितीय असलेल्या या सेन्सरमध्ये जैविक रेणू असून, ते पाण्यातही विरघळत नाहीत. अशा नावीन्यपूर्ण शोषकांना शास्त्रज्ञांनी ‘केमोटॅक्‍टाईल रिसेप्टर’ असे नाव दिले आहे. हे शोषक निश्‍चित करतात की, अष्टभुजांनी पकडलेली वस्तू भक्ष्य आहे की खडक! 

जैवरेणूंची विविधता 
शोषकांमधील या जैवरेणूंमध्ये म्हणजेच सेन्सरमध्ये मोठ्या प्रमाणावर विविधता आहे. त्यामुळेच सेन्सरद्वारे मिळालेली सूचना मज्जासंस्थेपर्यंत पोचवली जाते. पुढे ती मकालीच्या मेंदूला कळवली जाते. त्या आधारे मकाली पुढचे निर्णय घेतो. एकाच वेळी मकालीचे हात, पाय किंवा शरीर म्हणून काम करणाऱ्या या भुजा खूपच स्मार्ट आहेत. यामुळे त्यांची ही सेन्सर यंत्रणा अतिशय जटिल आणि खूप कार्यक्षम असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. ‘केमोटॅक्‍टाईल रिसेप्टर’च्या शोधामुळे भविष्यात जेली फिश, स्किड्‌स आदी कणा नसलेल्या (अपृष्ठवंशीय) सागरी जीवांच्या संदेश वहन प्रणालीबद्दल अधिक माहिती मिळणार आहे.

शोषकांमध्ये केमोटॅक्‍टाईल रिसेप्टर सापडल्यानंतर शास्त्रज्ञांनी त्यावरील अधिक अध्ययनाला सुरवात केली. तो गंध कसा ओळखतो, त्याची संवेदनशीलता किती आहे. मकालीच्या भुजांमध्ये दोन तृतीयांश मज्जातंतू (न्यूरॉन्स) असतात. कारण प्रत्येक भुजा स्वतंत्रपणे कार्य करत असते. तिला प्रत्येक वेळी मेंदूची परवानगी घ्यायची गरज नाही. विकेंद्रित व्यवस्था! असो. आता शास्त्रज्ञांनी सेन्सर म्हणून कार्य करणाऱ्या पेशींच्या विश्‍लेषणाला सुरवात केली. म्हणजे नक्की कोणती पेशी कोणत्या गोष्टींचा गंध घेते आणि निश्‍चित करते की ते सोडायचा आहे की खायचं आहे! प्रयोगशाळेतील प्रयोगातून कोणती पेशी हा निर्णय घेते याचा शोधही शास्त्रज्ञांनी घेतला. 

संबंधित संशोधनातून प्रथमच जलीय प्राण्यांमध्ये जैवरासायनिक सेन्सर कसे कार्य करतात, यावर प्रकाश पडला आहे. केमोटेक्‍टाईल रिसेप्टरबद्दल अधिक संशोधन करण्याची गरज शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यातून आजवर माहीत नसलेल्या जैविक रसायनांची ओळख माणसाला होणार आहे. ही जैविक रसायने आणि त्यावर आधारित गुंतागुंतीची यंत्रणा भविष्यात मानवाच्या उपयोगात नक्की येणार आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com