सर्च-रिसर्च : तुळशीचं (आर्थिक) माहात्म्य 

डॉ. अनिल लचके
Monday, 30 November 2020

तुळशी विवाह संपन्न झाला, की दीपावलीच्या उत्सवाची सांगता झाली, असं समजलं जातं. भारतातील घरांपुढं तुळशी वृंदावन असणं, ही जगातील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. घर छोटंसं असलं, तरी तिथं पत्र्याच्या डब्यात तुळशीचं एखादं रोपटं डौलदारपणे उभं असतं. तुळशीमधून भरपूर ऑक्‍सिजन बाहेर पडतो, असं म्हणतात. तुळशीचं शास्त्रीय नाव ‘ओसिमम्‌ बेसिलिकम्‌’ आहे.

तुळशी विवाह संपन्न झाला, की दीपावलीच्या उत्सवाची सांगता झाली, असं समजलं जातं. भारतातील घरांपुढं तुळशी वृंदावन असणं, ही जगातील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. घर छोटंसं असलं, तरी तिथं पत्र्याच्या डब्यात तुळशीचं एखादं रोपटं डौलदारपणे उभं असतं. तुळशीमधून भरपूर ऑक्‍सिजन बाहेर पडतो, असं म्हणतात. तुळशीचं शास्त्रीय नाव ‘ओसिमम्‌ बेसिलिकम्‌’ आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपल्याला धार्मिक-पौराणिक दृष्टीनं ‘तुळशी माहात्म्या’ची ओळख आहे. आता तुळशीमधील उपयुक्त तेलामुळे आणि रसायनांमुळे तुळशीचं आर्थिक माहात्म्यसुद्धा लक्षात आलंय. तुळशीचे काळी आणि हिरवी, असे प्रकार नेहमी दिसतात. तथापि, तुळशीमध्ये ज्ञान, भू, श्वेत, लक्ष्मी, रान, राम, कापूर, नील, रक्त आणि श्रीकृष्ण असे बरेच वाण आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रसायननिर्मितीच्या क्षेत्रामध्ये तुळशीचा उपयोग होतो. या वनस्पतीमधील लिनॅलूल, रोसमारीनिक आणि उरसोलीक आम्ल वेदनाशामक म्हणून उपयुक्त आहे. अल्फा-लिनोलेनिक आम्ल तर आरोग्यदायक ओमेगायुक्त आहे. लिनॅलूलचा उपयोग साबण, शाम्पू आणि डिटर्जंट सुगंधीत करण्यासाठी होतो. गॅस क्रोमॅटोग्राफी तंत्राने पृथक्करण केल्यावर तुळशीत बाष्पनशील तेलांचे अस्तित्व आढळून आले आहे. त्यातील युजेनॉल, बीटा इलेमीन, बीटा कॅलियोफायलीन आणि जर्म्याकरीन महत्त्वाचे आहे. तुळशीच्या तेलामधील लिनॅलूलचं रासायनिक प्रक्रिया साधून ॲनेथॉलमध्ये रूपांतर केलं जातं. त्याचा वास आल्हाददायक आहे. ते खाद्यान्न प्रक्रियेमध्ये, सौंदर्यप्रसाधनांत, काही औषधांमध्ये आणि  माऊथ वॉशमध्ये वापरलं जातं. कारण त्याची चव गोडसर आणि चांगली असल्यानं ताजंतवानं वाटतं. ग्राइप वॉटरच्या प्रकारात त्याचा एक घटक म्हणून उपयोग  होतो. तुळशीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, झिंक, ताम्र इत्यादी खनिज द्रव असतात. तथापि, ऋतुमानाप्रमाणं तुळशीमधील घटकांचं प्रमाण बदलत असतं.    

उत्तर प्रदेशातील शेतकरी पुदिनासारख्या दिसणाऱ्या मिंट नामक निर्यातमूल्य असलेल्या पिकाचं उत्पन्न घेतात. त्यापासून पेपरमिंटच्या स्वादाची निर्मिती होते. शेतकरी मिंटच्या तेलाची निर्मिती करण्यासाठी ‘मिंट डिस्टिलेशन’ यंत्रणा वापरतात. तीच यंत्रणा तुळशीच्या पानांसाठी वापरून युजेनॉल किंवा अन्य बाष्पनशील तेलाची निर्मिती करता येते. युजेनॉल म्हणजे लवंगाचं तेल. युजेनॉल दाताच्या डॉक्‍टरांना वेदनाशामक आणि जिवाणूरोधक औषध म्हणून उपयुक्त असतं. सुगंधद्रवनिर्मिती आणि खाद्यान्न-प्रक्रियेमध्ये युजेनॉलचा वापर होतो. लवंग आणि दालचिनीपासून युजेनॉल मिळवलं जायचं. पण, हे दोन्ही पदार्थ तुळशीच्या तुलनेत महाग आहेत.

इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च या संस्थेची एक शाखा म्हणजे डिरेक्‍टोरेट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लॅन्ट्‌स (आनंद, गुजरात). त्यांनी नुकतेच तुळशीचे दहा प्रकार काटेकोरपणे तपासले तेव्हा डॉस-१ या वाणात जास्त प्रमाणात युजेनॉल आढळलं. यामुळे स्वस्त किमतीत युजेनॉल तयार होऊ शकेल. त्यासाठी तुळशीच्या पानांमधून प्रथम वाफ सोडली जाते. त्यामुळे त्यातील घटक वेगळे होतात. नंतर उर्ध्वपतन करून तेल वेगळं करतात.

त्याचा रंग जर्द पिवळा असतो. मंजिऱ्यांपासून १८ टक्के हिरवट पिवळं तेल मिळू शकतं. तुळशीमधील अनेक रसायनं खाद्यान्न प्रक्रिया उद्योगात नैसर्गिक ‘प्रिझर्वेटिव्ह’ म्हणून उपयुक्त पडतात. आपल्या शरीरात सतत ‘फ्री रॅडिकल’ म्हणून ओळखले जाणारे अपायकारक पदार्थ तयार होत असतात. त्यांना निष्प्रभ करण्यासाठी खाद्यपदार्थांमार्फत ‘अँटिऑक्‍सिडंट्‌स’ घटक शरीरात जाणं गरजेचं आणि हिताचं असतं. तुळशीमधील ‘अँटिऑक्‍सिडंट’ घटक उत्कृष्ट असल्याचं सिद्ध झालं आहे. जगात तुळशीचे अनेक वाण असल्यामुळे रसायननिर्मितीच्या दृष्टीनं त्याचं संशोधन चालू असतं. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial Article write dr anil lachake on tulsi